हिंदु राष्ट्र येण्यापासून आता कुणीही रोखू शकणार नाही ! – जगद्गुरु परमहंसाचार्य, तपस्वी छावणी, अयोध्या, उत्तरप्रदेश

अयोध्येतून ‘सनातन प्रभात’चे विशेष वार्तांकन 

जगद्गुरु परमहंसाचार्य

अयोध्या, २१ जानेवारी (वार्ता.) – मुसलमान आणि ख्रिस्ती मोठ्या प्रमाणात घरवापसी (हिंदु धर्मात पुनर्प्रवेश) करत आहेत. ज्यांचे पूर्वज सनातनी हिंदू होते, ज्यांना बळजोरीने धर्मांतर करण्यात केले, असे वाट चुकलेले लोक हिंदु धर्मात घरवापसी करत आहेत. मानवतावादाचा भगवा सगळीकडे फडकत आहे. प्रभु श्रीराम आले आहेत. आता हिंदु राष्ट्र येण्यापासून कुणीही रोखू शकणार नाही, असा विश्‍वास अयोध्या येथील तपस्वी छावणीचे पीठाधीश्‍वर जगद्गुरु परमहंसाचार्य यांनी दैनिक ‘सनातन प्रभात’ला दिलेल्या विशेष मुलाखतीच्या वेळी व्यक्त केला.

या वेळी जगद्गुरु परमहंसाचार्य म्हणाले,

१. प्रत्येक जण ‘प्रभु श्रीरामाचा जन्म कुठे झाला होता ?’, याविषयी ‘गुगल’वर माहिती शोधत आहे. हिंदू अन्य पंथियांच्या लोकांनाही श्रीरामाचे महत्त्व सांगत आहेत. ‘भगवान श्रीराम कोण होते ?’, हे जाणण्याची दुर्लभ संधी आता मिळाली आहे.

२. मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्री रामललाचा प्राणप्रतिष्ठेच्या महामहोत्सवामुळे अयोध्यानगरी, संपूर्ण भारतात आणि जगामध्येही हर्ष उल्हासाचे वातावरण आहे. सर्व जाती आणि पंथांचे लोकही उत्साहीत आहेत, प्रसन्न आहेत. सर्वजण २२ जानेवारीला होणार्‍या प्रभु श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याच्या प्रतीक्षेत आहेत.

३. हा रामराज्याचा आरंभ आहे. त्रेतायुगातील रामराज्याची चर्चा कलियुगातही चालू आहे.

२२ जानेवारीच्या मुहूर्ताचे महत्त्व !

२२ जानेवारी या दिवशी श्री रामललाच्या मूर्तीच्या अभिषेकसाठी ८४ सेकंदाचा शुभ मुहूर्त आहे. ज्यामध्ये प्रभु श्रीरामाच्या मूर्तीचा अभिषेक केला जाणार आहे. हा शुभमुहूर्त दुपारी १२.३० पासून चालू  होईल. ८४ सेकंदामध्येही ४ सेकंद अत्यंत महत्त्वाचे आहेत. त्यावेळी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी श्रीरामाला काजळ लावतील. तिथूनच प्रभु श्रीराम आशीर्वाद देण्यास चालू करतील. त्यावेळेस प्रभु श्रीराम प्राणप्रतिष्ठित होतील. त्या आधी संपूर्ण सिद्धता केली जाईल. हे अत्यंत अद्भूत आहे. या क्षणासाठी, या शुभ वेळेसाठी ५०० वर्षांपासून लोकांनी संघर्ष केला, आपल्या प्राणांचीही आहुती दिली, असे जगद्गुरु परमहंसाचार्य यांनी सांगितले.

‘सनातन प्रभात’च्या कार्याचे कौतुक !

जगद्गुरु परमहंसाचार्य यांनी ‘सनातन प्रभात’च्या कार्याचे कौतुक केले आणि ‘सनातन प्रभात’ला शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले की, सनातन प्रभात अधिकाधिक हिंदूंनी वाचावे आणि इतरांनाही त्यासाठी प्रेरित करावे.