लाल समुद्रातील हुती आतंकवाद्यांचा हैदोस !

१. व्यापारी जहाजांवरील हुती आतंकवाद्यांच्या आक्रमणांमुळे प्रचंड व्यावसायिक हानी

सध्या इस्रायल आणि हमास यांचे युद्ध चालू असून ते थांबण्याची लक्षणे दिसत नाहीत. या युद्धात आता हुती बंडखोर किंवा आतंकवादी यांनी प्रवेश केला आहे. ते लाल सुमुद्रात व्यापारी जहाजांवर ड्रोन आणि क्षेपणास्त्रे यांच्या साहाय्याने आक्रमण करत आहेत. त्यामुळे व्यापारी जहाजांची मोठी हानी होत आहे. याचा भारतावरही मोठा परिणाम होत आहे; कारण या लाल समुद्रातून भारताचा २० टक्के व्यापार चालतो. हुती आतंकवाद्यांनी हैदोस घातल्याने भारताची महासागरी सुरक्षा धोक्यात आली आहे. ही आक्रमणे होत असल्याने अनेक जहाजे ही लाल समुद्रातून युरोपकडे जाण्याऐवजी ते ‘केप ऑफ गुड होप’ येथे जात आहेत, म्हणजे आफ्रिकेच्या खालची किनारपट्टी आहे तेथून लांब वळसा घेऊन ते युरोपमध्ये जाण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे प्रवास ७-८ दिवसांनी वाढतो, तसेच व्ययही ३० ते ४० टक्यांनी वाढतो. त्यामुळे जागतिक व्यापार महाग होत आहे, तसेच विम्याचे दरही वाढले आहेत.

हुती आतंकवादी

२. भारताची उपाययोजना

भारताचा अनुमाने २० टक्के व्यापार लाल समुद्राच्या मार्गे होतो. भारताचा व्यापार हा दुर्दैवाने २० टक्के भारताच्या जहाजांमधून आणि अन्य विदेशी जहाजांमधून होतो. त्यामुळे भारताची जहाजे नेमकी कुठली आहेत, हे कळत नाही आणि हुती आतंकवादी त्यांच्यावर आक्रमण करत आहेत. अशाच आक्रमणात भारताकडे येणार्‍या २ जहाजांची मोठी हानी झाली आहे. ही हानी टाळण्यासाठी भारताने भारतीय नौदलाला अरेबियन समुद्रात तैनात केले आहे. याखेरीज भारताने १ जहाज लाल समुद्रातही तैनात केले आहे. आफ्रिकेच्या सागरी तटाजवळही १-२ युद्धनौका ठेवल्या आहेत. त्यांनी सोमाली बंडखोरांपासून एका जहाजाला सोडवले होते. अशा प्रकारे तेथे नौदलाच्या नौका तैनात करून भारतीय जहाजांना सुरक्षा मिळण्याची अजिबात शक्यता नाही. स्वत:चे रक्षण करण्यापुरते त्यांचे ‘एअर डिफेन्स कव्हर’ (हवाई दलाच्या माध्यमातून संरक्षण) मर्यादित असते. त्या नौका मोठ्या असतील, तर त्या अधिक मोठ्या भागाची सुरक्षा करू शकतात; पण प्रत्येक जहाजाला सुरक्षा देणे अशक्य असते. त्यामुळे भारतीय नौदलाची जहाजे सगळीकडे गस्त घालत असली, तरी त्यांना भारतीय व्यापारी जहाजांना सुरक्षा प्रदान करणे शक्य नाही.

(निवृत्त) ब्रिगेडिअर हेमंत महाजन

३. हुती आतंकवाद्यांच्या नियंत्रणासाठी अन्य राष्ट्रांची उपाययोजना 

अमेरिकेच्या नेतृत्वाखाली १० देशांनी त्यांची जहाजे लाल समुद्रात तैनात केली आहेत. ही जहाजे थोड्या फार प्रमाणात साहाय्य करत आहेत; पण तेही १०० टक्के सुरक्षा पुरवू शकत नाहीत. त्यामुळे लाल सुमुद्रातून जाणारी ५० ते ७० टक्के वाहतूक बंद झाली आहे आणि ते लांबच्या असलेल्या आफ्रिकेच्या ‘केप ऑफ गुड होप’च्या जवळून पुढे जात आहेत. हेच भारतीय जहाजांच्या संदर्भातही होत आहे.

४. हुती आतंकवाद्यांवर नियंत्रण मिळवण्यात अडचणी

जगातील देश हुती आतंकवाद्यांच्या विरोधात बोलायला सिद्ध नाहीत. हुती जहाजांवर आक्रमण करत आहेत; कारण हुती हे हमासच्या बाजूने आहेत. त्यामुळे लोकांना वाटते की, ते पॅलेस्टिनला साहाय्य करत आहेत. वास्तविक ते पॅलेस्टिनला अजिबात साहाय्य करत नाहीत; परंतु त्यामुळे अनेक देश या मोहिमेत उघडपणे सहभागी होण्यास सिद्ध नाहीत. चीन आणि रशिया यांसारखे देश गप्प बसले आहेत. याखेरीज मध्यपूर्वेतील देश जसे की, सौदी अरेबिया, युएई हेही देश उघडपणे बोलायला सिद्ध नाहीत. ‘हुती हे शिया आहेत आणि सौदी अरेबिया, युएई हे देश सुन्नी आहेत. त्यामुळे शिया आणि सुन्नी देशांमध्ये एक मोठे युद्ध चालू होईल’, अशी त्यांना भीती वाटते. त्यामुळे जागतिक स्तरावरील प्रयत्न अर्धवट आहे. या सर्वांमुळे भारतीय व्यापारावरही मोठा परिणाम होत आहे.

भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. एस्.जयशंकर नुकतेच इराणच्या भेटीवर गेले होते. इराणचे हुती आतंकवाद्यांवर फार मोठे नियंत्रण आहे. हुतींना इराणकडून शस्त्रे मिळतात. त्यामुळे ‘भारतीय जहाजांवर आक्रमण करू नका’, असे इराणला सांगावे’, अशी भारताची उपाययोजना आहे. यात भारताला किती यश मिळेल, हे येणारा काळच सांगू शकेल.

 ५. हुतींविरोधातील उपाययोजनांमुळे भारताला यश मिळण्याची आशा

जग हुतींच्या विरोधात एकत्रितपणे लढण्यासाठी सिद्ध नाही. त्यामुळे भारतात महागाई वाढण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. हुती आतंकवाद्यांकडे क्षेपणास्त्रे आणि ड्रोन आहेत.  त्यामुळे आगामी काळात परिस्थिती अधिक गंभीर होऊ शकते. अमेरिका आणि ब्रिटन यांनी काही दिवसांपासून हुतींच्या तळांवर आक्रमण करण्यास प्रारंभ केला आहे. त्यामुळे त्यांची क्षमता थोडी न्यून होईल, तरी त्यांची क्षमता प्रचंड मोठी आहे. हुतींनी लाल समुद्रात जो हैदोस मांडला आहे, त्यामुळे भारताची महासागरी सुरक्षा धोक्यात आलेली आहे. ती कशी सुरक्षित करायचे, याविषयी भारताकडे सध्या तरी विशेष उपाययोजना दिसत नाही; पण मुत्सद्देगिरीचा वापर करून आणि इराणशी बोलून हुतींशी थेट संवाद साधून अन् त्या भागात भारतीय नौदलाची संख्या वाढवून भारत हुतींपासून सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न करत आहे.  आशा करूया की, यात भारताला यश मिळेल.

– ब्रिगेडियर हेमंत महाजन (निवृत्त), पुणे.