‘स्वभावदोष आणि अहं रूपी’ नदी पार करण्यासाठी परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी नावाडी बनून साहाय्य करणे आणि दुसर्‍या तिरावर असलेल्या श्रीकृष्णाकडे (मोक्षप्राप्तीकडे) घेऊन जाणे

स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया करण्यासंदर्भात कॅनडा येथील सौ. पूर्वा रोहित कुलकर्णी यांना सुचलेले विचार येथे दिले आहेत.

सौ. पूर्वा कुलकर्णी

१. प्रचंड वेगाने वहाणारी नदी पार करून देण्यासाठी एक नावाडी येणार असल्याचे श्रीकृष्णाने गोपीला सांगणे

‘नदी (स्वभावदोष आणि अहं) प्रचंड वेगाने (प्रबळ स्वभावदोष) वहात आहे. गोपीला (चंचल मनाला) श्रीकृष्णाकडे (मोक्षप्राप्तीकडे) जायचे आहे; पण ‘प्रचंड वेगाने वहाणार्‍या नदीला कसे पार करणार ? (प्रबळ स्वभावदोष आणि अहं यांच्यावर मात कशी करणार ?)’, असे तिला वाटते. एवढ्यात श्रीकृष्ण गोपीला हसून सांगतो, ‘‘काही क्षणातच एक नावाडी येईल आणि तो तुला माझ्यापर्यंत पोचवेल.’’

२. नावेतून नदी पार करण्यास साहाय्य करत असल्याने गोपीला नावाड्याप्रति अपार प्रीती आणि कृतज्ञता वाटणे 

श्रीकृष्णाच्या सांगण्याप्रमाणे एक नावाडी (परात्पर गुरु डॉ. आठवले) येतो आणि गोपीचा हात धरून त्याच्या नावेत बसवतो (स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया शिकवतो). नावेत (स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया करतांना) आरंभी गोपी घाबरते (प्रतिमा जपते); पण नावाड्यावर पूर्ण विश्वास ठेवून जसजशी ती नदी पार करू लागते, तशी तिची भीती (अहंभाव) नष्ट होते. मनात रहाते ती नावाड्याप्रति अपार प्रीती आणि कृतज्ञता !

३. नावाड्याने गोपीला नदी पलीकडे सोडणे

अनेक दिवस, महिने, वर्षे उलटतात; पण गोपी नावाड्याचा हात पूर्ण विश्वास आणि श्रद्धा ठेवून धरून ठेवते. ‘दुरून छोटीशी दिसणारी नदी (स्वभावदोष आणि अहं) किती मोठी आहे !’, हे तिला जाणवते. शेवटी तो क्षण येतो, नावाडी गोपीला नदी पलीकडे नेऊन सोडतो (६० टक्के आध्यात्मिक पातळी गाठते).

४. नावाडी न दिसल्याने श्रीकृष्णाने गोपीकडे पाहून गोड हसणे

गोपी अतिशय कृतज्ञताभावाने नावाड्याला म्हणते, ‘‘थांब, माझा कृष्ण इथेच आहे. त्याची तुझ्याशी भेट घालून देते.’’ नावाडी गोड हसून ‘बरं ’ असे म्हणतो. गोपी श्रीकृष्णाला शोधायला जाते. श्रीकृष्णाचा हात धरून त्याला नदीकाठी आणते. बघते तर काय ! नावाडी तिथे नसतोच ! ‘अरेच्चा ! कुठे गेला हा ?’, असा प्रश्न करत गोपी श्रीकृष्णाकडे बघते. त्यावर श्रीकृष्ण गोपीकडे पाहून तसाच गोड हसतो.’

– सौ. पूर्वा रोहित कुलकर्णी, कॅनडा (१५.७.२०२१)