Deportation Of Pastor Domnik : पास्टर डॉम्निक याला गोव्यातून हद्दपार करण्याच्या प्रक्रियेत हस्तक्षेप करण्यास उच्च न्यायालयाचा नकार !

पास्टर डॉम्निक आणि त्याची पत्नी जोआन यांनी याचिका मागे घेतल्याने त्यांच्या हद्दपारीची प्रक्रिया तडीस नेण्याचा मार्ग आता सुकर !

‘फाईव्ह पिलर्स’चर्चचा पास्टर डॉम्निक डिसोझा आणि त्याची पत्नी जीओन मास्कारिन्हास

पणजी, १७ जानेवारी (वार्ता.) : जादूटोणा आणि धर्मांतर केल्याच्या प्रकरणी गुन्हा प्रविष्ट झालेला सडये, शिवोली येथील ‘बिलिव्हर्स’च्या ‘फाईव्ह पिलर्स’ चर्चचा पास्टर डॉम्निक आणि त्याची पत्नी जोआन यांच्या विरोधात चालू असलेल्या हद्दपार (तडीपार) प्रक्रियेत हस्तक्षेप करण्यास मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपिठाने नकार दर्शवला आहे. ‘हद्दपारीचा आदेश काढण्यात आल्यानंतर पास्टर डॉम्निक न्यायालयात दाद मागू शकतात’, असे उच्च न्यायालयाने त्यांना सुचवले आहे.

पास्टर डॉम्निक याला १ जानेवारी या दिवशी पहाटे म्हापसा पोलिसांनी जादूटोणा करून धर्मांतर करणे, फसवणूक करणे आदी प्रकरणी तक्रार आल्यानंतर कह्यात घेतले होते. यानंतर २ दिवसांनी पास्टर डॉम्निक याची जामिनावर सुटका झाली होती. उत्तर गोवा पोलिसांनी पास्टर डॉम्निक आणि त्याची पत्नी जोआन यांना जादूटोणा करणे आणि इतरांच्या धार्मिक भावना दुखावणे, या प्रकरणी गोव्यातून तडीपार करण्याची शिफारस उत्तर गोव्याच्या जिल्हाधिकार्‍यांकडे केली आहे. त्यानंतर पास्टर डॉम्निक याने स्वत:च्या विरोधात चालू असलेली तडीपार करण्याची प्रक्रिया थांबवण्याचा आदेश प्रशासन आणि पोलीस यांना देण्याची मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपिठाकडे केली होती; मात्र न्यायालयाने या प्रक्रियेत हस्तक्षेप करण्यासा नकार दर्शवला. त्यामुळे या प्रकरणातील याचिका पास्टर डॉम्निक आणि त्याची पत्नी जोआन यांनी मागे घेतली आहे. याचिका मागे घेतल्याने आता त्यांच्या विरोधात चालू असलेली हद्दपारीची कारवाई तडीला जाण्याचा मार्ग सुकर झालेला आहे.

हद्दपारीच्या प्रकरणी पुढील सुनावणी १९ जानेवारीला

पास्टर डॉम्निक आणि त्याची पत्नी जोआन यांना गोव्यातून हद्दपार करण्याची प्रक्रिया उत्तर गोव्याच्या जिल्हाधिकार्‍यांसमोर चालू आहे. या प्रकरणी १२ जानेवारी या दिवशी पहिली सुनावणी झाली आहे. पुढील सुनावणी १९ जानेवारी या दिवशी होणार आहे.