Iran Strike Pakistan : इराणकडून पाकच्या बलुचिस्तानमधील आतंकवादी संघटनेच्या तळावर आक्रमण !

तेहरान (इराण) – इराणने पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतातील जिहादी आतंकवादी संघटना ‘जैश उल-अदल’च्या २ तळांवर क्षेपणास्त्रे आणि ड्रोन यांद्वारे आक्रमण केले. यात २ लहान मुलांचा मृत्यू झाला, तर २ मुली घायाळ झाल्या, असा दावा  पाकिस्तानने केला आहे. पाकने त्या ठिकाणी आतंकवादी तळ होते आणि तेथील आतंकवादी यात ठार झाले, अशी कोणतीही माहिती दिलेली नाही. पाकिस्तानने या घटनेविषयी देशातील इराणच्या अधिकार्‍यांना बोलावले आहे. ‘परिणामांचे दायित्व पूर्णपणे इराणवर असेल’, असे त्यांना सांगण्यात आले आहे.

१. इराणची सरकारी वृत्तसंस्था ‘मेहर’च्या वृत्तानुसार कुहे सब्ज भागात जैश उल-अदलचा तळ हा सर्वांत मोठ्या तळांपैकी एक आहे. आक्रमणाविषयी पाकिस्तानने निवेदन प्रसारित केले आहे. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की, इराणने हवाई क्षेत्राचे उल्लंघन केल्यामुळे आम्ही तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला आहे. ही घटना संपूर्णपणे अस्वीकारार्ह आहे आणि त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात.

२. इराणने केलेल्या या आक्रमणापूर्वी त्याने इराकच्या अर्ध-स्वायत्त कुर्दिस्तान प्रदेशातील इस्रायलच्या मोसाद गुप्तचर संस्थेच्या मुख्यालयावर आक्रमण केले होते. याखेरीज इस्लामिक स्टेटच्या विरोधात सीरियामध्येही आक्रमण केले होते.

संपादकीय भूमिका

पाक म्हणजे आतंकवादी देश, अशी अधिकृत घोषणा जगाने करणे आवश्यक आहे. जगाने या माध्यमातून पाकिस्तानवर सर्व प्रकारे बहिष्कार घातला पाहिजे, तरच तो ताळ्यावर येईल !