१. जन्मोत्सवापूर्वी जाणवलेली सूत्रे
‘२२.५.२०२२ या दिवशी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवानिमित्त रथोत्सव साजरा करण्यात आला. त्याच्या ५ दिवस अगोदर मी सेवा करत असलेल्या ठिकाणी मी देवपूजा करत होते. तेव्हा मला प.पू. रामानंद महाराज यांनी गायलेल्या भजनातील पुढील ओळी सारख्या आठवत होत्या.
‘माझी देवपूजा । पाय तुझे गुरुराया ।।
गुरुचरणांचे ध्यान । तेचि माझे संध्यास्नान ।।’
वरील ओळी म्हटल्यानंतर मी ‘परम पूज्यांचा विजय असो’, असा जयघोष करायचे. तेव्हा मला पुष्कळ आनंद होऊन माझ्या डोळ्यांतून भावाश्रू यायचे. ‘परात्पर गुरुदेव आपल्यासाठी किती करतात ! यासाठी सतत कृतज्ञताभावात रहायला पाहिजे’, असे वाटून ‘याच स्थितीत रहावे’, असेच मला वाटायचे.
२. जन्मोत्सवादिवशी
अ. पाच दिवसांनंतर म्हणजे परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवाच्या दिवशी (२२.५.२०२२ या दिवशी) परात्पर गुरुदेव श्रीविष्णूचा वेष धारण करून रथात बसले. तेव्हा ‘आकाशातून देवीदेवता त्यांच्यावर सोन्यामोत्यांच्या पुष्पांची वृष्टी करत आहेत’, असे मला वाटत होते.
आ. परात्पर गुरुदेवांच्या गोड हसण्याने आणि टाळमृदुंगाच्या नादाने आश्रमात चैतन्याच्या लहरी येत होत्या. मलाही ‘कार्यक्रमात सहभागी झालेल्या साधकांसमवेत मान डोलवत नाचावे’, असे वाटत होते.
इ. परात्पर गुरुदेवांचा जयघोष करतांना माझ्या डोळ्यांतून भावाश्रू वहात होते. गुरुदेवांचे मधुर हसणे लहान बाळाप्रमाणे असल्यामुळे सगळे साधक भावाश्रूंमध्ये न्हाऊन निघाले होते. सभोवतालची झाडे-वेली, पक्षी आणि फुलझाडे फारच आनंदी वाटत होती. वातावरण चैतन्यमय झाले होते.
ई. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ या परात्पर गुरुदेवांच्या समोर दोन्ही बाजूला बसल्या होत्या. त्यामुळे वातावरण अधिक चैतन्यमय झाले होते. परात्पर गुरुदेव रथारूढ झाल्यामुळे ‘लवकरच हिंदु राष्ट्र येणार’, असे मला वाटत होते. रथाला असणारे घोडेही खरे असल्याचे वाटून तेही आनंदी दिसत होते.
परात्पर गुरुदेव, माझ्याकडून हे दोन शब्द लिहून घेतलेत, त्यासाठी तुमच्या सुकोमल चरणी कोटीशः कृतज्ञता !’
– सौ. आवडू देसाई (वय ६६ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२८.५.२०२२)
या अंकात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |