श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या चरणांच्या ठिकाणी पंढरपूरच्या पांडुरंगाचे चरण दिसणे !

श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ

१. श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ साधकांना मार्गदर्शन करत असतांना भावजागृती होऊन त्यांच्या चरणांजवळ बसायला मिळणे

‘१०.७.२०२२ या दिवशी श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ सनातनच्या आश्रमात त्यांच्या सासूबाई सौ. माधुरी गाडगीळ यांच्या वाढदिवसानिमित्त आल्या होत्या. त्या आश्रमातून निघत असतांना त्यांना भेटण्यासाठी आणि त्यांचा निरोप घेण्यासाठी आम्ही सर्व साधक जमलो होतो. तेव्हा त्या साधकांना मार्गदर्शन करत मार्गिकेत उभ्या होत्या. त्यांचे मार्गदर्शन ऐकता यावे; म्हणून मी त्यांच्या शेजारी जाऊन उभी राहिले. ‘३ दिवसांनी येणार्‍या गुरुपौर्णिमेच्या (१३.७.२०२२) आधीच परात्पर गुरु डॉ. आठवले यांंच्या उत्तराधिकारी श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांचे दर्शन लाभत आहे’, असा विचार येऊन मी मनोमन कृतज्ञता व्यक्त करत होते. माझा कृतज्ञतेचा भाव जागृत होऊन मला रडू येत होते. तेथे व्यत्यय यायला नको; म्हणून मी खाली बसू लागले. मला खाली बसतांना पाहून श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) गाडगीळ माझ्या बाजूला सरकल्या. खाली बसतांना मी भिंतीचा आधार घेत हळूवार खाली बसत होते; पण त्या माझ्या बाजूला सरकल्याने मला त्यांच्या पायांचा आधार मिळाला. साधारण त्यांच्या गुढघ्यांपासून ते चरणांपर्यंत मी त्यांच्या पायांचा आधार घेत खाली बसले.

२. श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या चरणांजवळ बसल्यावर पंढरपूरच्या पांडुरंगाच्या चरणांना पकडल्याचे दृश्य दिसणे आणि मधेमधे ‘परात्पर गुरु डॉक्टरांचे चरण धरले आहेत’, असे वाटणे

श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांच्या पायांना स्पर्श होताच मला ‘मी पंढरपूरच्या विठ्ठलाच्या पायांना पकडले आहे’, असे वाटू लागले. मला ‘त्यांच्या साडीचा स्पर्श, म्हणजे विठ्ठलाच्या पितांबराचा स्पर्श आहे’, असेच वाटत होते, तसेच सकाळपासून मी विठ्ठलाचे भक्तीगीत ‘विठ्ठलाच्या पायी वीट झाली भाग्यवंत ।’ हे गुणगुणत होते. ते परत-परत मनात येऊन मला त्याच ओळी आठवत होत्या. त्यामुळे मला अजूनच गहिवरून येत होते. माझे डोळे बंद होते आणि मी नुसती रडत होते. मधेमधे मला ‘मी परात्पर गुरु डॉक्टरांचे चरण धरले आहेत’, असेही वाटत होते.

३. श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी साधकांना भावाश्रूंचे महत्त्व सांगणे

श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) गाडगीळ मला उद्देशून सर्वांना सांगत होत्या, ‘भावाश्रूंमध्ये आपली सर्व पापे धुवून निघतात. तेच महत्त्वाचे आहे; म्हणून भावाला फार महत्त्व आहे.’ आम्ही १ मास वारीत चाललो. त्या वेळी आमची अशीच स्थिती होती. आम्ही नुसते भावजागृतीमुळे रडतच होतो.’ हे ऐकता क्षणी मला ‘त्यांच्या चरणांच्या ठिकाणी पांडुरंगाचे चरण का दिसत आहेत ?’, याचा उलगडा झाला, तसेच मला ‘त्या एवढ्या उच्च कोटीच्या आहेत की, त्या पंढरपूरला पांडुरंगाचे दर्शन घ्यायला गेल्या आणि स्वतःच पांडुरंग होऊन आल्या, म्हणजे त्याच्याशी एकरूप झाल्या; म्हणून त्यांच्या जागी मला पांडुरंगाचे दर्शन झाले’, असे जाणवले.

४. श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांची प्रीती अनुभवणे

हा संपूर्ण कालावधी श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) गाडगीळ माझ्या शेजारी उभ्या होत्या आणि माझ्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवत होत्या. त्यांच्या प्रीतीने आणि चैतन्याने मी न्हाऊन निघत होते. नंतर त्या निघाल्या. तेव्हा मी त्यांच्या चरणांना स्पर्श करून उठले.

५. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी पांडुरंगाच्या चरणांना स्पर्श करण्याची साधिकेची इच्छा श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या चरणांचा स्पर्श तिला करवून देऊन पूर्ण करणे

काही दिवसांपूर्वी कु. श्रावणी पेठकर या साधिकेशी बोलतांना तिने मला सांगितले, ‘ती पंढरपूरजवळ रहात असल्याने तिने पंढरपूरच्या पांडुरंगाचे दर्शन घेतले आहे. एवढेच नाही, तर त्याच्या चरणांना स्पर्शही केला आहे.’ तेव्हा मला सहज वाटले होते, ‘ही किती भाग्यवान आहे ! मी तर विठ्ठलभक्त संतांचे जे केवळ ऐकले आहे, ते तिने अनुभवले आहे ! आपल्याला कधी मिळेल पांडुरंगाच्या चरणांना असा स्पर्श करायला ? मी तर कधी कुठे जात नाही.’ असे विचार माझ्या मनात सहज येऊन गेले आणि मी तो विषय सोडून दिला होता; पण परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी त्याची नोंद घेतली होती आणि मला त्याचा अनुभव देण्यासाठी नियोजनही केले. त्यांनी माझी ती छोटीशी इच्छा पूर्ण करण्यासाठी मला ही एवढी मोठी अनुभूती दिली.

परात्पर गुरु डॉक्टरांच्या कृपेमुळे मला ही अनुभूती आली, यासाठी त्यांच्या चरणी अनंत कोटी कृतज्ञता !’

– कु. मैथिली जोशी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

(६.८.२०२२)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक