Karnataka Congress Derogatory Statement : केंद्र सरकारकडे तांदूळ नसतांना सरकार धर्माच्या नावाखाली घरोघरी अक्षता वाटत आहे !

कर्नाटकमधील समाजकल्याण मंत्री एच्.सी. महादेवप्पा यांचे हिंदुद्वेषी वक्तव्य

कर्नाटकमधील समाजकल्याण मंत्री एच्.सी. महादेवप्पा

बेंगळुरू – केंद्र सरकारकडे ‘अन्नभाग्य’ योजनेसाठी तांदूळ नाहीत आणि हेच लोक धर्माच्या नावाखाली घरोघरी अक्षता वाटत आहेत, अशी टीका कर्नाटकचे समाजकल्याण मंत्री एच्.सी. महादेवप्पा यांनी केलीे. (अक्षता वाटप कार्यक्रम हा विहिंपचा आहे; मात्र काँग्रेसचे मंत्री भाजपद्वेषापायी केंद्र सरकारवर टीका करत आहेत, हे हास्यास्पद होय ! – संपादक)

‘उपोषण मुक्त कर्नाटक’ या उद्देशाने कर्नाटकातील काँग्रेस सरकारने दारिद्र्यरेषेखालील लोकांसाठी ‘अन्नभाग्य’ योजना चालू केली आहे. ‘या योजनेसाठी तांदूळ उपलब्ध होण्यासाठी राज्य सरकार निधी देऊन केंद्र सरकारकडून तांदूळ विकत घेत आहे. केंद्र सरकार मात्र धर्माच्या नावाखाली अक्षातांची पोटली घरोघरी पाठवत आहे. हे  धर्माच्या विरुद्ध आहे. (काँग्रेसवाला कधीपासून धर्म मानू लागले ? अन्य वेळी हिंदूंच्या देवता, धर्मग्रंथ आणि परंपरा यांना नावे ठेवायची आणि स्वतःला आवश्यक असतांना धर्माचे नाव घ्यायचे, अशा स्वार्थी काँग्रेसवाल्यांना जनता ओळखून आहे ! – संपादक) गरीब आणि भुकेला यांना अन्न पुरवणे, यापेक्षा मोठा धर्म आहे का ?’, असा प्रश्‍नही त्यांनी उपस्थित केला. ‘गरिबांना अन्न पुरवण्याच्या संदर्भातही राजकारण करण्याची अमानवीय प्रवृत्ती दाखवणारे धर्माविषयी बोलतांना पाहून हसावे कि रडावे ? हेच समजत नाही’, असेही ते म्हणाले. (काँग्रेस बहुतांश काळ भारतात सत्तेवर असूनही गरिबीचे निर्मूलन का झाले नाही ? याचे उत्तर प्रथम काँग्रेसने द्यावे ! – संपादक)