मुंबई – मध्य रेल्वे प्रशासनाने लोकलगाड्यांमधील गर्दीचे व्यवस्थापन, तसेच ‘शून्य मृत्यू’ मोहीम हाती घेतली आहे. यासाठी मुंबई महानगरातील संस्थांना कार्यालयीन वेळेत पालट करण्याचे आवाहन केले आहे. या मोहिमेला सर्वप्रथम सकारात्मक प्रतिसाद मुंबईतील मुख्य टपाल मास्तर कार्यालयाने दिला. नोव्हेंबर २०२३ मध्ये कामकाजाच्या वेळा पालटण्याचा निर्णय टपाल कार्यालयाने घेतला. आता या निर्णयाची कार्यवाही केली आहे. टपाल कार्यालयातील ११५ पैकी ६९ अधिकारी, कर्मचारी हे मध्य रेल्वेवरून येत असल्याने, त्यांच्या कार्यालयीन वेळेत पालट केला जाईल. त्यामुळे सकाळी ९ ते सायंकाळी ५ ठराविक चौकटीतील कामाची वेळ लवकरच बदलणार आहे. मध्य रेल्वेने मुंबईतील ५०० संस्थांना कार्यालयीन वेळा पालटण्याचे निवेदन पाठवले. या वेळी सर्वप्रथम मुंबईतील टपाल मुख्यालयानेही (जीपीओ) कामकाजाच्या वेळा पालटण्याचा निर्णय घेतला. मुंबई महानगरात ५६२ टपाल कार्यालये आहेत.