Encroachment On Vishalgad : विशाळगडावरील अतिक्रमण हटवण्यासाठी निधी देण्यात आला आहे ! – सुधीर मुनगंटीवार, सांस्कृतिक कार्यमंत्री

मुंबई : राज्यातील ऐतिहासिक वारसा टिकला पाहिजे, यासाठी सांस्कृतिक विभागाकडून प्रयत्न चालू आहेत. राज्यातील ३८६ वास्तू पुरातत्व विभागाकडे घेण्यात आल्या आहेत. विशाळगडावरील अतिक्रमण हटवण्यासाठी निधी देण्यात आला आहे, अशी माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

सुधीर मुनगंटीवार

राज्यशासनाचा सांस्कृतिक कार्य विभाग आणि पुरातत्व विभाग यांच्या वतीने ‘महाराष्ट्रातील वारसा संवर्धन आणि व्यवस्थापन’ या विषयावर रवींद्र नाट्य मंदिर येथे आयोजित चर्चासत्रामध्ये सुधीर मुनगंटीवार यांनी वरील माहिती दिली. या वेळी पुरातत्व विभागाचे संचालक डॉ. तेजस गर्गे, पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या संचालिका मीनल जोगळेकर हे मान्यवर उपस्थित होते.

सुधीर मुनगंटीवार पुढे म्हणाले, ‘‘महावारसा’ योजनेतून राज्यशासन पुरातन वास्तूंचे संवर्धन करत आहे. यासाठी व्यावसायिक सामाजिक दायित्व निधीद्वारे (सीएस्आर फंड) संवर्धनाचे काम चालू आहे. येत्या ४-५ वर्षांत पुरातन वास्तू चांगल्या व्हाव्यात, असा आमचा मानस आहे. पुरातन वास्तूंचे जतन, संवर्धन आणि संरक्षण करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या निधीत ३ टक्के निधी राखून ठेवला आहे.

ऐतिहासिक वास्तूंची माहिती लोकांपर्यंत पोचवण्यासाठी ‘वेब पोर्टल’ सिद्ध व्हावे !

ऐतिहासिक स्थळांचे पावित्र्य राखले गेले पाहिजे, यासाठी सर्व घटकांनी एकत्र येऊन आणि समन्वय राखून प्रयत्न केले पाहिजे. पुरातन वास्तू संवर्धन क्षेत्रात काम करणारे तज्ञ आणि शासकीय यंत्रणा यांनी वास्तूचे संवर्धन आणि संरक्षण करतांना माहिती लोकांपर्यंत पोचवली पाहिजे. त्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर केला पाहिजे. यासाठी ‘वेब पोर्टल’ सिद्ध व्हावे, अशी अपेक्षाही मुनगंटीवार यांनी या वेळी व्यक्त केली.