डाव्या (साम्यवादी) विचारसरणीची विषवल्ली रोखण्‍यासाठी सजग राजकीय भूमिका आवश्यक ! – अभिजित जोग, प्रसिद्ध लेखक

पुणे येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘जिल्हास्तरीय हिंदु राष्ट्र अधिवेशन’ उत्साहात साजरे !

दीपप्रज्वलन करतांना डावीकडून प.पू. सद्गुरु रामनाथजी येवले महाराज, ब्रिगेडियर श्री. हेमंत महाजन (निवृत्त), श्री. सुनील घनवट, श्री. अभिजित जोग

पुणे, ८ जानेवारी (वार्ता.) – डाव्या शक्तींनी कुटुंब-व्यवस्था, धर्मसंस्था, देशप्रेम, संस्कृती ही आपली शक्तीस्थाने पोखरण्याची रणनीती आखली आहे. ईर्ष्या, द्वेष आणि अराजक हाच डाव्यांच्या विचारांचा गाभा आहे. चुकीच्‍या विचारांची मांडणी करून ते पोचवण्‍यासाठी आवश्यक परिसंस्‍था त्‍यांच्‍याकडे आहे. डाव्या विचारसरणीने केवळ आपल्या देशालाच नाही, तर संपूर्ण जगाला पोखरले आहे. त्यातून जगभर ते विध्वंस करत आहेत. भारताच्या भूमीतही या विषवल्लीची वाढ होत आहे. डाव्‍या विचारसरणीला रोखण्‍याची क्षमता भारत देशात आहे. हा देश सत्‍याचा असून धर्मावर चालणारा आहे, असे परखड मत लेखक, प्रसिद्ध ‘ब्रँड कन्सल्टंट’ अभिजित जोग यांनी व्यक्त केले. सेनापती बापट रोड येथील इंद्रप्रस्थ सभागृहामध्ये ७ जानेवारी या दिवशी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आयोजित ‘जिल्हास्तरीय हिंदु राष्ट्र अधिवेशन’ पार पडले. त्या वेळी ते बोलत होते.

या वेळी बांगलादेशी घुसखोरी : समस्या आणि उपाय, ‘ब्रेकिंग इंडिया’, अर्बन नक्षलवाद, वक्फ बोर्ड-देश आणि हिंदु धर्माच्या विरोधातील षड्यंत्र, हलाल जिहाद – अर्थव्यवस्थेवरील जिहादी आक्रमण, मंदिरांवरील आघात आणि संघटनेची आवश्यकता, गड-दुर्गांवर झालेले अतिक्रमण आदी विषयांवर मान्यवरांचे विस्तृत मार्गदर्शन लाभले. जिल्ह्यातील १४० हून अधिक हिंदुत्वनिष्ठांनी या कार्यक्रमाचा लाभ घेतला.

अधिवेशनाला उपस्थित डावीकडून सौ. अमृतकर, सद्गुरु स्वाती खाडये आणि पू. (सौ.) मनीषा पाठक आणि अन्य मान्यवर

अधिवेशनाच्या प्रारंभी प.पू. सद्गुरु रामनाथजी येवले महाराज, ब्रिगेडियर श्री. हेमंत महाजन (निवृत्त), श्री. अभिजित जोग, हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड संघटक श्री. सुनील घनवट यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर पुरोहित सर्वश्री धीरज कुलकर्णी, पुरोहित राघव कुलकर्णी, शार्दुल मणेरीकर गुरुजी यांनी वेदमंत्रपठण केले. श्री. विजय चौधरी यांनी शंखनाद केला. हिंदु जनजागृती समितीचे प्रेरणास्थान सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या ‘हिंदु राष्ट्र अधिवेशना’साठीच्या संदेशाचे वाचन श्री. महेश पाठक यांनी केले. अधिवेशनाचा उद्देश हिंदु जनजागृती समितीचे श्री. पराग गोखले यांनी सांगितला. यानंतर मान्यवरांचे मार्गदर्शन झाले.

सुराज्य स्वरूप हिंदु राष्ट्र स्थापण्यासाठी हिंदूंनो, संघटित व्हा ! – प.पू. सद्गुरु रामनाथजी येवले महाराज 

आपला भारत हा वैभवशाली देश होता. डच, पोर्तुगीज, इंग्रज, मोगल इत्यादी अनेक परकीय शक्तींनी भारताचे लचके तोडले. १९४७ या वर्षी स्वातंत्र्य मिळाले; पण सुराज्य मिळाले नाही. अनादी कालापासून चालत आलेली हिंदु संस्कृतीवर आधारित राज्यसंस्था म्हणजे सुराज्य ! या भूमीचा कण कण हिंदूंचा आहे; पण या भूमीवर आपला धर्म वाचण्यासाठी प्रत्येकाने जागृत व्हायला पाहिजे. हिंदूंना जागृत करण्याचे हे कार्य प.पू. डॉ. आठवले यांनी केले आहे. अनेक परकीय शक्तींनी आक्रमणे केली. आपली संपत्ती, संस्कृती नष्ट केली. आजही जिहादी शक्ती आक्रमणे करत आहेत. त्यांनी भारत नष्ट करण्यासाठी अनेक प्रयत्न केले, तरीही त्याचे अस्तित्व टिकून आहे; कारण आपला धर्म अध्यात्मावर आधारित आहे. आपणही धर्मासाठी आपले योगदान देणे आवश्यक आहे.

राजकीय इच्छाशक्तीच्या आधारे बांगलादेशी घुसखोरीचा कर्करोग समूळ नष्ट होऊ शकतो ! – ब्रिगेडियर हेमंत महाजन (निवृत्त)

बांगलादेशी घुसखोरांची समस्या गंभीर होत असून अर्बन नक्षलवाद, माओवाद, अंतर्गत घुसखोरी वाढत आहे. लाखो बांगलादेशी घुसखोर महाराष्ट्र, पुणे, मुंबई, संभाजीनगर, भिवंडी, मालेगाव येथे आहेत. जिथे रस्ते, मोठे पूल, मेट्रोची कामे चालू आहेत, तिथे काम करणारे अनेक कामगार हे बांगलादेशी आहेत. ज्यांना आधारकार्ड, शिधापत्रिका इत्यादी कागदपत्रे आपल्याकडीलच भ्रष्ट व्यवस्था उपलब्ध करून देते. राजकीय नेत्‍यांनी आपली सत्ता टिकवण्‍यासाठी घुसखोरी या गंभीर विषयाकडे नेहमीच कानाडोळा केला. त्‍यामुळे आज भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे. राजकीय इच्छाशक्ती निर्माण झाली आणि कायद्याची कठोर कार्यवाही झाल्यास बांगलादेशी घुसखोरीचा हा कर्करोग समूळ नष्ट होऊ शकतो.

वक्फ बोर्डाला एकही इंच भूमी आम्ही घेऊ देणार नाही ! – सुनील घनवट, हिंदु जनजागृती समिती

वक्फ बोर्डाने तमिळनाडूतील केवळ थिरुचेनथुराई हेच गाव नाही, तर ‘आजूबाजूची ७ गावे आणि २ सहस्र ५०० वर्षे जुने चंद्रशेखर स्वामी मंदिर ही आमची मालमत्ता आहे’, असा दावा केला आहे.  वक्फच्या माध्यमातून शांतताप्रिय हिंदूंना त्रास देण्याचा, त्यांचा मानसिक छळ करण्याचा, त्यांचे जीवन उद्ध्वस्त करण्याचा हा प्रकार आहे. महाराष्ट्रात सहस्रो एकर भूमी वक्फ बोर्डाच्या कह्यात गेली आहे. वक्फ बोर्डाला एकही इंच भूमी आम्ही घेऊ घेऊ देणार नाही आणि जी भूमी त्यांनी घेतली आहे, ती त्यांना सरकार जमा करायला लावू. वक्फ बोर्डाचा कायदा सरकारने त्वरित लागू करावा, असे आवाहनही त्यांनी या वेळी केले.

उपस्थित संत आणि मान्यवर

सनातनच्या धर्मप्रचारक सद्गुरु स्वाती खाडये, सनातन संस्थेच्या पू. (सौ.) मनीषा पाठक, चिंतामणी प्रासादिक दिंडी आणि तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे प्रमुख व्यवस्थापक ह.भ.प. दत्तात्रय चोरघे महाराज, ह.भ.प. रामनाथजी येवले महाराज, ह.भ.प. भाऊसाहेब मापारी महाराज, ह.भ.प. बाळासाहेब महाराज जाधव, ह.भ.प. रामचंद्र पेनोरे महाराज यांची वंदनीय उपस्थिती लाभली.

देव्हार्‍याची मांडणी पहातांना जिज्ञासू
मार्गदर्शन करताना श्री. अभिजित जोग
ह.भ.प. सद्गुरु येवले महाराज
मार्गदर्शन करतांना श्री. रवींद्र पडवळ
परिसंवाद डावीकडून सर्वश्री ऋषिकेश कामठे, विजय नरेला, चैतन्य तागडे, श्रीकांत बोराटे, गणेश ताकवणे आणि कु. प्राची शिंत्रे
अधिवेशनाला उपस्थित संत आणि सद्गुरु
ग्रंथप्रदर्शन
मार्गदर्शन करतांना श्री. रुखमंगद पोतदार
मार्गदर्शन करतांना ब्रिगेडियर (निवृत्त) हेमंत महाजन