आज ८.१.२०२४ या दिवशी श्रीमती उषा मोहे यांच्या निधनानंतरचा दहावा दिवस आहे. त्या निमित्ताने…
रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात रहाणार्या श्रीमती उषा मोहे (आध्यात्मिक पातळी ६२ टक्के आणि वय ८१ वर्षे) यांचे ३०.१२.२०२३ या दिवशी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांचा मृत्यू आणि मृत्यूत्तर प्रवास यांचे श्री गुरुकृपेने झालेले सूक्ष्म परीक्षण येथे लेखबद्ध केले आहे.
१. स्वतःच्या मृत्यूची पूर्वसूचना मिळणे
मोहेकाकूंची आंतरिक साधना चांगली चालू असल्यामुळे त्यांच्यावर भगवंताची अखंड कृपा होती. भगवंताच्या कृपेमुळे त्यांच्या मनात मृत्यूविषयी भय नव्हते. त्यांच्यावरील भगवंताच्या प्रेरणेमुळे त्यांना स्वतःच्या मृत्यूची पूर्वसूचना मिळाल्यामुळे त्यांनी मृत्यूला सामोरे जाण्याची सिद्धता आधीच केली होती.
२. आंतरिक साधनेमुळे भगवंताच्या अखंड अनुसंधानात राहून आनंदाची अनुभूती घेणे
मोहेकाकूंची आंतरिक साधना चांगली असल्यामुळे त्यांचे भगवंताशी सतत अनुसंधान चालू होते. त्यामुळे त्या सतत आनंदाची अनुभूती अनुभवत होत्या. त्यामुळे त्यांना पाहिल्यावरही त्यांचा चेहरा चैतन्याने उजळल्यासारखा दिसत होता आणि त्यांच्याकडे पाहून साधकांनाही आनंदाची अनुभूती येत होती.
३. मोहेकाकूंच्या सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती असणार्या श्रद्धेमुळे त्यांना मृत्यूला धिराने तोंड देता येणे
श्रीगुरु आपल्या शिष्याची केवळ जन्मभरच नव्हे, तर मृत्यूसमयी आणि पुढील जन्मांतही काळजी घेत असतात, असे श्री गुरुचरित्रात सांगितले आहे. त्याप्रमाणे मोहेकाकूंच्या सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती असणार्या श्रद्धेमुळे त्यांना मृत्यूला धिराने तोंड देता आले आणि त्यांच्या श्रीगुरूंप्रती असणार्या व्यक्त-अव्यक्त स्वरूपाच्या भावामुळे श्रीगुरुदेवांनी त्यांची केवळ मृत्यूसमयीच नव्हे, तर मृत्यूनंतरही काळजी घेतली. त्यामुळे त्यांचा मृत्यू आणि मृत्यूत्तर प्रवास सुकर झाला.
४. प्रत्यक्ष मृत्यूला शांतपणे सामोरे जाता येणे
जेव्हा त्यांच्यावर यमदूतांनी मृत्यूपाश टाकला, तेव्हा त्यांना हृदयाचा तीव्र झटका आला आणि त्यांचे प्राण यमपाशात बांधले गेले अन् हे प्राण त्यांच्या स्थूलदेहाच्या बाहेर आले. मोहेकाकूंनी आयुष्यभर साधना केल्यामुळे त्यांच्या मृत्यूसमयी विष्णुदूत आले आणि त्यांनी यमदुतांच्या यमपाशातून मोहेकाकूंच्या लिंगदेहाची मुक्तता केली. त्यामुळे मोहेकाकूंच्या मृत्यूनंतर त्यांच्या लिंगदेहावर यमदेवाने नव्हे, तर श्रीविष्णूने नियंत्रण मिळवले.
४ अ. मृत्यूपूर्वीची स्थिती : मृत्यूच्या काही क्षणांपूर्वी मोहेकाकूंना त्यांच्या स्थूलदेहाविषयी विरक्ती जाणवू लागली आणि त्यांच्या मनात स्वतःच्या देहातून बाहेर पडण्याची इच्छा जागृत झाली. जेव्हा यमदूतांनी त्यांचे प्राण यमपाशात बांधून त्यांचे प्राणहरण केले, तेव्हा मोहेकाकूंचा लिंगदेह त्यांच्या स्थूलदेहाच्या बाहेर जाऊन स्वतःच्या मृत्यूचे दृश्य शांतपणे पहात होता.
५. विविध योगमार्गांनी साधना केल्यामुळे मृत्यूचा सामना करता येणे
५ अ. ज्ञानमार्गाने साधना केल्यामुळे मृत्यूचा सामना शांतपणे आणि धिराने करता येणे : मोहेकाकूंनी ज्ञानयोगाप्रमाणेही साधना केल्यामुळे त्यांच्या मनात नश्वर मायेप्रती निरासक्ती जागृत झाली होती. त्यामुळे त्यांच्या लिंगदेहाला स्वतःचा मृत्यू साक्षीभावाने, म्हणजे शांतपणे पहाता आला.
५ आ. भक्तीमार्गाने साधना केल्यामुळे मृत्यूचा सामना शांतपणे आणि धिराने करता येणे : मोहेकाकूंमध्ये श्रीगुरूंप्रती अत्यंत श्रद्धा आणि कृतज्ञताभाव होता. त्यांची भक्तीमार्गानुसार साधना झाल्यामुळे त्यांच्यामध्ये शेवटच्या क्षणीही भगवंतप्राप्तीची ओढ जागृत होती. त्यामुळे त्यांच्या मृत्यूच्या वेळी त्यांच्या मनात भय किंवा उद्विग्नता निर्माण न होता त्यांनी मृत्यूचा सामना शांतपणे आणि धिराने केला.
६. मोहेकाकूंचा मृत्यूत्तर प्रवास
६ अ. मोहेकाकूंच्या लिंगदेहाला दैवी ऊर्जा प्राप्त झाल्यामुळे त्याने भूलोकाची कक्षा लवकर पार करणे आणि भुवलोकात प्रवेश करणे : विष्णुदूतांनी मोहेकाकूंच्या लिंगदेहाचे नियंत्रण मिळवल्यावर मोहेकाकूंना भूलोक सोडून जाण्याचे वेध लागले. तेव्हा त्यांनी सूक्ष्मातून रामनाथी येथील सनातनच्या आश्रमात येऊन विष्णुस्वरूप गुरुमाऊली सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या चरणांवर मस्तक टेकवून भावपूर्णरित्या दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी श्री लक्ष्मीस्वरूपा श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांना हात जोडून नमन केले आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांचे मनोमन भावपूर्ण स्मरण करून त्यांना वंदन केले. सनातन संस्थेतील वरील तिन्ही गुरूंचे कृपाशीर्वाद मोहेकाकूंच्या लिंगदेहाला मिळाल्यामुळे त्यांच्याभोवती चैतन्याचे सोनेरी रंगाचे संरक्षककवच कार्यरत झाले आणि त्यांना भूलोक (पृथ्वी) ते महर्लाेक हा प्रवास करण्यासाठी पुष्कळ प्रमाणात आध्यात्मिक ऊर्जा मिळाली. या ऊर्जेमुळे त्यांच्या लिंगदेहातील पृथ्वी आणि आप या तत्त्वांचे प्रमाण न्यून होऊन तेजतत्त्वाचे प्रमाण वाढले. त्यामुळे त्यांचा लिंगदेह सूक्ष्मातून हलका झाला आणि पिसाप्रमाणे वायूमंडलात तरंगू लागला अन् वरच्या दिशेने वेगाने जाऊ लागला. याला आध्यात्मिक परिभाषेत ‘दैवी ऊर्जेमुळे लिंगदेह हलका होऊन त्याने उत्तरोत्तर प्रयाण करणे’, असे म्हणतात. मोहेकाकूंच्या लिंगदेहाला दैवी ऊर्जा प्राप्त झाल्यामुळे त्याने भूलोकाची कक्षा लवकर पार केली आणि भुवलोकात प्रवेश केला. मृत्यूनंतर दुसर्या दिवशी, म्हणजे मृत्यूनंतर साधारण २४ घंट्यांनंतर मोहेकाकूंचा लिंगदेह अस्पष्ट दिसत होता.
६ आ. भुवलोकात पितरांना भेटणे आणि त्यांनी मोहेकाकूंना आशीर्वाद देणे : मोहेकाकूंच्या लिंगदेहाने जेव्हा भुवलोकात प्रवेश केला, तेव्हा तिथे धुक्याप्रमाणे वातावरण होते. त्यामुळे त्यांना भुवलोकात वास करणारे त्यांचे पितर लवकर दिसले नाहीत. मोहेकाकूंची ही अडचण लक्षात घेऊन विष्णुदुतांच्या कपाळावर असलेल्या नीलमण्यावरील आच्छादन (पडदा) दूर झाले आणि त्यातून दिव्य निळा प्रकाश बाहेर पडला. या प्रकाशामुळे भुवलोकातील धुरकट वातावरणात असणार्या मोहेकाकूंच्या अस्पष्ट मानवी आकृतीप्रमाणे दिसणार्या पितरांचे लिंगदेह त्यांना सुस्पष्ट दिसले. मोहेकाकूंना त्यांच्या पितरांना भेटून आनंद झाला आणि त्यांनी त्यांना कृतज्ञतापूर्वक नमस्कार केला. मोहेकाकूंची विनम्रता पाहून त्यांच्या पितरांना संतोष वाटला आणि त्यांनी मोहेकाकूंना मृत्यूत्तर प्रवास सुखकर होण्याचा आशीर्वाद दिला. तेव्हा मोहेकाकूंचा लिंगदेह सुस्पष्ट दिसत होता.
६ इ. भुवलोक ते स्वर्गलोक हा प्रवास विष्णुदुतांनी सुखकर करणे : त्यानंतर विष्णुदुतांच्या संरक्षणाखाली मोहेकाकूंच्या लिंगदेहाने भुवलोकातून उच्च स्वर्गलोकाकडे प्रयाण केले. या विष्णुमार्गाने (विविध लोकांना जोडणार्या सूक्ष्म मार्गाने) पुढे जात असतांना वाटेत पक्षांप्रमाणे पंख असणार्या अनिष्ट शक्तींनी मोहेकाकूंचा मार्ग अवरुद्ध करण्याचा (अडवण्याचा) प्रयत्न केला. तेव्हा विष्णुदुतांनी श्रीविष्णूच्या कौमुदी गदेचे प्रतिरूप असणार्या त्यांच्या हातातील सोनेरी रंगाच्या गदेने अनिष्ट शक्तींवर वार करून त्यांना पिटाळून लावले. त्यामुळे अनिष्ट शक्तींना मोहेकाकूंच्या लिंगदेहावर नियंत्रण मिळवता आले नाही आणि त्यांचा पुढील प्रवास निर्विघ्न होऊन त्या स्वर्गलोकात पोचल्या. कनिष्ठ स्वर्गलोकामध्ये त्यांना यक्ष दिसले. त्यानंतर मध्यम स्वर्गलोकात त्यांना इंद्राची सभा दिसली. त्यात अनेक गंधर्व गात होते आणि किन्नर विविध वाद्ये वाजवत अप्सरांच्या समवेत नृत्य करण्यात मग्न होते. मलयकेतुसारखे काही किन्नर वाद्ये वाजवत होते, तर वृषध्वज सारखे काही किन्नर नृत्य करत होते. चित्रांगदसारखे गंधर्व गायन, वादन आणि नर्तन या तिन्ही कलांमध्ये निपुण असतात. तेथे सुमधुर संगीत कानी पडत होते. त्यानंतर मोहेकाकूंच्या लिंगदेहाने उच्च स्वर्गलोकात प्रवेश केला. तेव्हा त्यांना तेथे देवगुरु बृहस्पति शिवाला प्रसन्न करण्यासाठी रुद्रयाग करतांना दिसले. त्यांनी देवगुरूंना भावपूर्ण वंदन केले. देवगुरूंनी त्यांना आध्यात्मिक उन्नती करून संतपद प्राप्त करण्याचा कृपाशीर्वाद दिला. तेव्हा मोहेकाकूंच्या लिंगदेहाची केवळ कड दिसत होती.
६ ई. उच्च स्वर्गलोक ते महर्लाेकाचा प्रवास करत असतांना धर्मलोक दिसणे : त्यानंतर देवगुरु बृहस्पतींच्या कृपेने उच्च स्वर्गलोकातून महर्लाेकाकडे जाणारा सुवर्ण पायर्यांचा जिना दिसला. हा सोपान (जिना) ऐहिक सुखांचा त्याग करून आध्यात्मिक स्तरावरील आनंदाची प्राप्ती करणारा आध्यात्मिक मार्ग असल्याचे जाणवले. तेव्हा विष्णुदुतांचे रूपांतर रूपेरी आणि सोनेरी पंख असलेल्या पर्यांमध्ये झाले. ‘असे का झाले ?’, असा प्रश्न माझ्या मनात आल्यावर देवाने उत्तर दिले, ‘आता विष्णुदुतांचे कार्य पूर्ण झाले. तसेच मोहेकाकूंमध्ये निरागस बालकाप्रमाणे बालकभाव आहे आणि लहान मुलांना पर्या प्रिय असतात. त्यामुळे दैवी शक्तींनी विष्णुदुतांचे रूप त्यागून पर्यांचे रूप धारण केले.’ उच्च स्वर्गलोकातून बाहेर पडताच मोहेकाकूंच्या लिंगदेहाचे रूपांतर एका पिवळसर रंगाच्या ज्योतीमध्ये झाले. त्यांच्या समवेत असणार्या पर्यांनी मोहेकाकूंचा ज्योतीस्वरूप लिंगदेह अलगद उचलून एका गुलाबी रंगाच्या कमळात ठेवला. त्यानंतर त्या कमळाच्या उमललेल्या पाकळ्या बंद झाल्या. अशा प्रकारे मोहेकाकूंच्या लिंगदेहाला माता लक्ष्मीचे प्रतीक असलेल्या गुलाबी रंगाच्या कमळाच्या स्वरूपात संरक्षककवच प्राप्त झाले. दोन्ही पर्यांनी गुलाबी रंगाचे कमळ उचलून उच्च स्वर्गलोकातून महर्लाेकाकडे जाण्यासाठी त्या सोनेरी रंगाच्या सोपानावरून चढू लागल्या. अनिष्ट शक्तींच्या आक्रमणापासून मोहेकाकूंच्या लिंगदेहाचे रक्षण करण्यासाठी या दोन्ही पर्या अदृश्य राहून कमळ घेऊन महर्लाेकाकडे निघाल्या होत्या. तेव्हा त्यांना केशरी रंगाचा धर्मलोक दिसला. ज्या पुण्यात्म्यांनी पृथ्वीवर हिंदु धर्माचे रक्षण आणि प्रसार करण्याचे धर्मकार्य केलेले असते, त्यांना मृत्यूनंतर धर्मलोकाची प्राप्ती होते. या लोकामध्ये विविध धर्मात्मे तेजस्वी सूर्याप्रमाणे पिवळसर केशरी रंगाच्या गोळ्याच्या स्वरूपात विराजमान असतात. त्यांचे पावन दर्शन घेत असतांना मोहेकाकूंनी त्यांना मनोमन कृतज्ञतापूर्वक नमस्कार केला. हे दृश्य पाहून माझ्या मनात पुढील ओळी आल्या ‘दिव्यत्वाची जेथे प्रचीती, तेथे कर माझे जुळती’.
७. मोहेकाकूंचा ज्योतिर्मय लिंगदेह महर्लाेकात स्थापन होणे
जेव्हा महर्लाेक आला, तेव्हा पर्यांच्या हातातील गुलाबी रंगाच्या कमळाचे कार्य पूर्ण झाल्याने त्याचे रूपांतर सोनेरी रंगाच्या कमळात झाले आणि ते उमलले. त्यातून सोनेरी प्रकाशमय झालेला मोहेकाकूंचा ज्योतिर्मय लिंगदेह बाहेर आला आणि तो महर्लाेकात भ्रमण करू लागला. महर्लाेकाचे संपूर्ण वातावरण कृष्णमय निळसर रंगाच्या दैवी प्रकाशाने भरले होते आणि तेथे गुलाबाचा गोड सुगंधही दरवळत होता. मधे मधे भगवान श्रीकृष्णाने वाजवलेल्या कर्णमधुर बासरीचे सूर कानी पडून भगवंताप्रतीचा भाव जागृत होत होता. दोन्ही पर्यांनी मोहेकाकूंच्या ज्योतिर्मय लिंगदेहाला महर्लाेकातील एका श्वेत कमळावर ठेवून तेथे आसनस्थ करून स्थापित केले आणि दोन्ही पर्या अदृश्य झाल्या. अशा प्रकारे मोहेकाकूंनी मृत्यूनंतर स्थूलदेहाचा त्याग केल्यामुळे त्यांचे भूलोकरूपी पृथ्वीवरील स्वतःचे स्थान नष्ट झाले आणि त्यांच्या आंतरिक साधनेमुळे त्या महर्लाेकात पोचल्याने त्यांचे तेथे स्थान निर्माण होऊन त्यांचा मृत्यूत्तर प्रवास पूर्ण झाला. तेथे त्यांना सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृष्णरूपाचे दिव्य दर्शन झाले आणि त्यांनी कृष्णरूपातील गुरुदेवांच्या चरणांवर कृतज्ञताभावाने स्वतःचे ज्योतिर्मय स्वरूप समर्पित केले. तेव्हा परात्पर गुरुदेवांनी त्यांना सांगितले, ‘ज्याप्रमाणे तुम्ही पृथ्वीवर असतांना समष्टीसाठी नामजप करत होत्या, तसेच इथे राहून पृथ्वीवर हिंदु राष्ट्राची लवकर स्थापना होण्यासाठी भगवंताच्या चरणी प्रार्थना करून समष्टीसाठी अखंड नामजप करायचा आहे.’ हे ऐकून मोहेकाकूंच्या ज्योतिर्मय लिंगदेहाला पुष्कळ आनंद झाला.
८. मोहेकाकूंच्या लिंगदेहाने विविध लोकांमध्ये केलेला सूक्ष्म प्रवास
कृतज्ञता
श्री गुरुकृपेने एका साधक-जिवाचा भूलोक ते महर्लाेक हा मृत्यूत्तर प्रवास पूर्ण होऊन एक साधक-जीव महर्लाेकात सुखरूप पोचला. ज्याप्रमाणे गुरुदेवांनी भूलोकात असतांना (पृथ्वीवर असतांना) माेहेकाकूंकडून साधना करवून घेतली, त्याप्रमाणे ते महर्लाेकात श्रीकृष्णाच्या स्वरूपात कार्यरत राहून मोहेकाकूंच्या ज्योतिर्मय लिंगदेहाची पुढील साधना करवून घेऊन त्यांना लवकरच संतपदी विराजमान करणार आहेत. गुरुदेवांच्या साधकांप्रती असणार्या प्रीतीला आणि निरपेक्ष कृपेला सहस्र वेळा नमन ! ‘असे दिव्य गुरु आम्हाला लाभले’, यासाठी भगवंताच्या चरणीही कोटीशः कृतज्ञ आहोत.
– सुश्री (कु.) मधुरा भोसले (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के) (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३.१.२०२४)
सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
सूक्ष्म-जगत् : जे स्थूल पंचज्ञानेंद्रियांना (नाक, जीभ, डोळे, त्वचा आणि कान यांना) कळत नाही; परंतु ज्याच्या अस्तित्वाचे ज्ञान साधना करणार्याला होते, त्याला ‘सूक्ष्म-जगत्’ असे संबोधतात. सूक्ष्म-परीक्षण : एखाद्या घटनेविषयी किंवा प्रक्रियेविषयी चित्ताला (अंतर्मनाला) जे जाणवते, त्याला ‘सूक्ष्म-परीक्षण’ म्हणतात. |