१. पंधरा फूट उंच छतावरून खाली गोदामात पडूनही गुरुकृपेने वाचणे
१ अ. गोदामाच्या छताचा काही भाग कोसळून १५ फूट उंचावरून खाली गोदामात पडणे, गोदामाच्या दाराला कुलूप असणे; गुरुकृपेने दूरच्या झाडावर आंबे काढत असलेल्या साधकाला हाका मारून बोलवल्यावर त्यांनी दार उघडून बाहेर काढणे : ‘मे २०१८ मध्ये संध्याकाळी ४.३० वाजता मी आणि एक साधक श्री. संजीव मडकईकर आंबे काढण्यासाठी धामसे येथील आमच्या घरी गेलो. मी माझ्या घराशेजारी असलेल्या आमच्या गोदामाच्या छतावर चढलो. तेव्हा छताचा काही भाग अकस्मात् तुटला आणि मी १५ फूट उंचावरून खाली गोदामात पडलो. पडल्यानंतर माझ्या लक्षात आले, ‘माझा उजवा हात हलत नाही आणि मी गोदामातील ज्या खोलीत पडलो, त्या खोलीचे दार बाहेरून बंद आहे. त्यामुळे मी खोलीतील मधल्या भिंतीवरून शेजारच्या खोलीत जाण्याचा प्रयत्न केला; पण मला ते शक्य झाले नाही. शेवटी लाथा मारून मी खोलीचे दार तोडले. ते दार साध्या हार्डबोर्डचे असल्यामुळे मला दार तोडणे शक्य झाले; पण एवढे करून मी दुसर्या खोलीत आल्यानंतर ‘त्या खोलीलाही बाहेरून कुलूप आहे’, हे माझ्या लक्षात आले. ‘श्री. संजीव मडकईकर तिथेच कुठेतरी आंबे काढत असणार’, हे मला ठाऊक होते; म्हणून मी त्यांना जोराने पुष्कळ हाका मारून बोलावले. ते आल्यानंतर मी त्यांना ‘या दाराच्या कुलूपाची चावी घरात कुठे ठेवली आहे’, ते सांगितले. त्यानंतर त्यांनी दार उघडून मला बाहेर काढले.
१ आ. गोदामात खाली ठेवलेल्या काचांवर एक पातळ हार्डबोर्ड असणे, त्यावर पडल्यामुळे फुटलेल्या काचा न लागणे; मात्र हात हालत नसल्यामुळे ‘खांद्यातील स्नायू फाटले असणार’, असे वाटणे : मी खोलीत जिथे पडलो, तिथे खिडक्यांसाठी वापरायच्या ७ – ८ मोठ्या काचा एकावर एक रचून ठेवल्या होत्या. त्या काचांवर एक पातळ हार्डबोर्ड ठेवला होता. मी त्या हार्डबोर्डवरच पडलो. त्यामुळे त्यातील वरच्या २ – ३ काचा फुटून त्यांचे तुकडे झाले होते; मात्र देवाच्या कृपेने मला एकही काच लागली नाही. केवळ माझा उजवा हात हलत नव्हता. तेव्हा ‘खांद्याचा स्नायू फाटला असेल’, असे मला वाटले. त्यानंतर २ दिवसांनी ‘एम्.आर्.आय्.’(टीप) करून त्याची निश्चिती केली.
(टीप – ‘एम्.आर्.आय्.’ (Magnetic Resonance Imaging) हे शरिराच्या अंतर्गत अवयवांची छायाचित्रे काढण्याचे तंत्रज्ञान आहे.)
१ इ. अपघाताच्या वेळी असलेली एकूणच कठीण परिस्थिती
१. मला त्या फुटलेल्या काचा लागल्या असत्या आणि रक्तस्त्राव होऊ लागला असता, तर मला एकट्याला रक्तस्त्राव थांबवणे पुष्कळ कठीण झाले असते.
२. मी एकटाच आंबे काढायला गेलो असतो, तर तिथे जवळपास कुणीही नव्हते.
३. ती वेळ संध्याकाळची होती आणि तिथे हाकेच्या अंतरावर लोकवस्तीही नव्हती.
एवढी कठीण परिस्थिती असूनही गुरुकृपा असल्यामुळेच फारसा त्रास न होता मी त्यातून बाहेर पडू शकलो.
२. खांद्याचे २ स्नायू फाटल्यामुळे दुर्बिणीद्वारे शस्त्रकर्म करायचे ठरणे
त्यानंतर मी धामसे येथून फोंड्याला आलो. आधुनिक वैद्यांना हात दाखवून त्याची क्ष-किरण (एक्स-रे) पडताळणी केली. त्या अहवालावरून माझ्या खांद्याचा अस्थीभंग झाला नसल्याचे कळले; म्हणून मी २ दिवसांनी ‘एम्.आर्.आय्.’ पडताळणी केली. त्यात ‘खांद्याचे २ स्नायू फाटले आहेत’, हे कळले. ‘ते स्नायू शिवण्यासाठी शस्त्रकर्म करावे लागणार’, हे माझ्या लक्षात आले. नंतर दुर्बिणीद्वारे त्याचे शस्त्रकर्म करायचे ठरले.
३. पुण्यातील अस्थिरोगतज्ञ आधुनिक वैद्यांनी ‘व्यायाम करून खांद्याची हालचाल वाढल्यानंतर शस्त्रकर्म करूया’, असे सांगणे
मी पुण्याला नवले रुग्णालयातील अस्थिरोगतज्ञ आधुनिक वैद्य पारेख यांना हात दाखवला. ते म्हणाले, ‘‘खांद्याच्या सांध्याची हालचाल न्यून होत असल्यामुळे व्यायाम करून प्रथम ती वाढवूया आणि ४ आठवड्यानंतर शस्त्रकर्म करूया.’’ असे सांगून त्यांनी मला परत पाठवले.
४. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी ‘शस्त्रकर्म करून घेतले, तर बरे होईल, शस्त्रकर्माने ३० ते ५० टक्के लाभ झाला, तरी तेवढे पुरेसे आहे’, असे सांगणे
मी नवले रुग्णालयात पुन्हा गेल्यानंतर २ वेळा ‘एम्.आर्.आय्.’ पडताळणी केली. एक स्नायू २ ठिकाणी फाटला होता आणि तो शस्त्रकर्म करून जोडणे कठीण होते. अस्थिरोगतज्ञ पारेख यांचे म्हणणे होते, ‘‘शस्त्रकर्म करण्याऐवजी ६ – ८ मास व्यायाम करूनच बरे होऊ शकेल.’’ मी तसे प.पू. गुरुदेवांना सांगितल्यानंतर ते म्हणाले, ‘‘शस्त्रकर्म करून घेतलेत, तर बरे होईल. शस्त्रकर्माने ३० ते ५० टक्के लाभ झाला, तरी तेवढे पुरेसे आहे’’; कारण तेव्हा माझ्या हाताची थोडीशीही हालचाल होत नव्हती.
५. पुणे येथील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयातील ‘एम्.आर्.आय्.’चे यंत्र अधिक क्षमतेचे असणे आणि तिथे ‘एम्.आर्.आय्.’ पडताळणी केल्यावर खांद्याचे स्नायू ३ ठिकाणी फाटले असल्याचे दिसल्याने शस्त्रकर्म करावे लागणे
मी ‘शस्त्रकर्म करूया’, असा आग्रह धरल्यामुळे नवले रुग्णालयातील अस्थिरोगतज्ञ पारेख यांनी मला दिनानाथ मंगेशकर रुग्णालयातील अस्थिरोगतज्ञ डॉ. बाभुळकर यांना भेटायला सांगितले. त्यांनी तिथे पुन्हा माझ्या खांद्याची ‘एम्.आर्.आय्.’ पडताळणी केली. तेथील ‘एम्.आर्.आय्.’चे यंत्र अधिक क्षमतेचे असल्यामुळे या पडताळणीमध्ये ‘माझ्या खांद्यातील ३ स्नायू फाटले आहेत आणि शस्त्रकर्म करणे आवश्यकच आहे’, हे लक्षात आले. तो अहवाल अस्थिरोगतज्ञ पारेख यांनी पाहिल्यानंतर शस्त्रकर्म करायचे ठरले.
६. ‘मृत्यू आला, तर अंतिम क्षणी मुखात देवाचे नाव पाहिजे’; या विचाराने भूल देण्यापूर्वी नामजप करत राहिल्याने भूल चढलेली न कळणे
शस्त्रकर्मकक्षात (ऑपरेशन थिएटरमध्ये) नेण्यापूर्वी मला थोडा वेळ बाहेरच्या खोलीत झोपवून ठेवले होते. तिथे मी नामजप करत स्वस्थ पडून राहिलो होतो. तेव्हा क्षणभर माझ्या मनात विचार आला, ‘मी शस्त्रकर्माच्या पटलावरच मृत्यू पावलो किंवा मला दिलेली भूल उतरलीच नाही, तर काय होईल ? मृत्यू आला, तर अंतिम क्षणी मुखात देवाचे नाव पाहिजे’, या विचाराने मी भूल देण्यापूर्वी नामजप सतत करत होतो. नामजप करतांना ‘भूल कधी चढली’, हे मला समजलेही नाही. शस्त्रकर्म व्यवस्थित पार पडले. गुरुकृपेनेच मला वेदना जाणवल्या नाहीत. शस्त्रकर्मानंतर ४ दिवसांनी मला रुग्णालयातून घरी सोडले.
७. शस्त्रकर्मानंतर साधारण वर्षभर आधुनिक वैद्यांनी सांगितल्याप्रमाणे व्यायाम करूनही खांद्याची हालचाल परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सांगितल्याप्रमाणे केवळ ५० टक्केच होणे
शस्त्रकर्मानंतर मी एक मास माझ्या बहिणीची मुलगी सौ. कांचन मराठे हिच्या घरी राहिलो. नंतर गोव्याला परत आल्यानंतर आरंभी ३ मास प्रत्येक मासाला मला ‘फिजिओथेरपी’साठी पुण्याला जावे लागले आणि त्यानंतर प्रत्येक ३ मासांनी जावे लागले. असे मी वर्षभरात जवळजवळ ५ – ६ वेळा ‘फिजिओथेरपी’साठी पुण्याला गेलो. साधारण वर्षभर मी आधुनिक वैद्यांनी सांगितल्याप्रमाणे व्यायाम केला. एवढे करूनही माझ्या खांद्याची हालचाल १०० टक्के होऊ शकली नाही; मात्र प.पू. गुरुदेव म्हणाल्याप्रमाणे मला साधारण ५० टक्के लाभ झाला.
८. कृतज्ञता
प.पू. गुरुदेवांच्या कृपेनेच मी शस्त्रकर्म करण्याचा निर्णय घेतला. नाहीतर, मी आयुष्यभर हात हलवू शकलो नसतो. ‘प.पू. गुरुदेवांच्या अपार कृपेनेच मी अपघातातून वाचलो आणि माझ्यावर योग्य उपचार होऊन मी बरा झालो. त्यांनीच मला सेवेची पुन्हा संधी दिली’, यासाठी मी त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहे.’
– आधुनिक वैद्य पांडुरंग मराठे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१८.१०.२०२३)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |