१. आसंदीवरून खाली पडल्यामुळे दोन्ही हातांना पुष्कळ वेदना होणे आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांनी हातांच्या वेदना सहन करण्यासाठी बळ दिल्याचे जाणवणे
‘२१.११.२०२२ या दिवशी मी काही साहित्य माळ्यावर ठेवण्यासाठी आसंदीवर चढले होते. त्या वेळी ती आसंदी लादीवरून सरकली आणि मी खाली पडले. तेव्हा माझे दोन्ही हात साष्टांग दंडवत घातलेल्या स्थितीत भूमीवर आपटले आणि माझ्या डोळ्यांसमोर अंधारी आली. त्या वेळी माझ्या हातांना पुष्कळ वेदना होत होत्या; परंतु रात्रीची वेळ होती आणि गावात कोणी अस्थिरोगतज्ञही नव्हते. त्यामुळे आम्ही काही करू शकलो नाही. तेव्हा ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले हातांच्या वेदना सहन करण्यासाठी बळ देत आहेत’, याची मला जाणीव झाली.
२. नामजपादी उपाय केल्याने हातांचे शस्त्रकर्म करण्याचे टळणे
२ अ. आधुनिक वैद्यांनी ‘शस्त्रकर्म करावे लागेल’, असे सांगणे; परंतु रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्यामुळे शस्त्रकर्म लगेच न होणे : मला दुसर्या दिवशी बैतुल येथील रुग्णालयात नेले. तेव्हा तेथील आधुनिक वैद्यांनी सांगितले, ‘‘तुमच्या दोन्ही खांद्याच्या खाली दंडामध्ये अस्थिभंग झाला आहे. त्यामुळे तुमचे शस्त्रकर्म करावे लागेल. तुम्हाला मधुमेह आहे आणि तुमचे रक्तातील साखरेचे प्रमाण ४८५ पर्यंत वाढलेले आहे. त्यामुळे आता लगेच शस्त्रकर्म करता येणार नाही.’’ (सर्वसाधारणतः व्यक्तीच्या रक्तातील साखरेचे प्रमाण उपाशीपोटी ११० पेक्षा कमी आणि खाल्ल्यानंतर १४० mg/dl पेक्षा कमी असावे लागते.) त्यामुळे आधुनिक वैद्यांनी माझ्या खांद्याला पट्टा आणि दोन्ही हातांना साधे ‘बँडेज’ बांधले आणि ‘‘दहा दिवसांनी या. त्यानंतर पुढचा निर्णय घेऊ’’, असे आम्हाला सांगितले.
२ आ. रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमातून संतांनी सांगितल्याप्रमाणे नामजपादी उपाय करणे : त्या वेळी माझी मुलगी कु. अवनी आणि मुलगा श्री. आशिष यांनी रामनाथी आश्रमातील माझा भाऊ श्री. योगेश जलतारे याला ‘नामजपादी उपाय कोणते करायचे ?’ असे विचारले. तेव्हा श्री. योगेशने ‘कोणता नामजप करायचा ?’, हे संतांना विचारून मला सांगितले. त्या वेळी माझ्या दोन्ही हातांना ‘बँडेज’ बांधले असल्यामुळे मी काहीही करू शकत नव्हते; म्हणून मी पडल्या पडल्या श्री. योगेशने सांगितलेला नामजप करत होते.
२ इ. आधुनिक वैद्यांनी शस्त्रकर्म करण्याची आवश्यकता नसल्याचे सांगणे : दहा दिवसांनी आम्ही पुन्हा त्या आधुनिक वैद्यांकडे गेलो. तेव्हा त्यांनी सांगितले, ‘‘तुमच्या हातांची हाडे व्यवस्थित आहेत. त्यामुळे शस्त्रकर्म करण्याची आवश्यता नाही.’’ त्यानंतर त्यांनी माझ्या हातांना ‘प्लास्टर’ घातले.
३. कुटुंबियांनी पुष्कळ सेवा केल्याने त्यांचे प्रेम अनुभवता येणे
माझे दोन्ही हात बांधलेले होते. त्यामुळे मला काहीच करता येत नव्हते. तेव्हा माझी मुलगी, मुलगा, माझे यजमान श्री. रमेश देशपांडे आणि अन्य कुटुंबीय माझी पुष्कळ सेवा करत होते. तेव्हा गुरुकृपेमुळे मला त्यांचे प्रेम अनुभवता आले.
४. पू. आईंशी (पू. कुसुम जलतारेआजी यांच्याशी) भ्रमणभाषवरून बोलल्याने चैतन्य मिळून प्रकृतीत वेगाने सुधारणा होत असल्याचे जाणवणे
त्या वेळी माझे पू. आईंशी (पू. कुसुम जलतारेआजी यांच्याशी) भ्रमणभाषवरून बोलणे व्हायचे. तेव्हा ‘त्यांच्या माध्यमातून मला चैतन्य मिळत आहे’, असे मला जाणवायचे. त्यामुळे मला मानसिक बळ मिळत होते.
५. कुटुंबियांना नामजपाचे महत्त्व कळणे
५ अ. नातेवाईक नियमितपणे नामजप सत्संग ऐकू लागणे : गुरुकृपेमुळे माझ्या प्रकृतीत वेगाने सुधारणा होत होती. त्या वेळी घरातील सर्वांनाच पुष्कळ आश्चर्य वाटत होते. त्या वेळी ‘त्यांना नामजपाचे महत्त्व कळले आहे’, असे माझ्या लक्षात आले. फेब्रुवारी मासात एका साधिकेने ‘ऑनलाईन’ नामजप सत्संगाशी तुम्हाला जोडायचे का ?’, असे मला विचारले आणि मी त्यांना होकार दिला. मला या सत्संगाचा भावजागृतीसाठी पुष्कळ लाभ झाला. नंतर माझ्या दोन्ही जाऊबाई सौ. राधा देशपांडे आणि सौ. कल्पना देशपांडे, नणंद सौ. अंजली लोहकरे यांनाही मी नामजप सत्संगाला जोडले. त्या नियमितपणे नामजप सत्संग ऐकू लागल्या. ही माझ्यासाठी एक अनुभूतीच होती.
५ आ. नातेवाइकांचा विरोध मावळणे : पूर्वी माझ्या नातेवाइकांचा सनातनला विरोध होता; कारण नागपूर येथील माझ्या काही नातेवाइकांनी सनातनविषयी अपप्रचार करून त्यांच्या मनात सनातनविषयी अपसमज निर्माण केला होता; परंतु माझ्या अनुभूतीमुळे त्यांचा विरोध मावळला.
५ इ. घरातील सर्वजण नामजप करू लागणे : माझ्या या अनुभूतीमुळे जे नातेवाईक नामजप करत नव्हते, तेही नामजप करू लागले. ते प्रतिदिन नामजप सत्संगात सांगितलेला कुलदेवी आणि दत्त यांचा नामजप करत होते. माझे यजमान श्री. रमेश देशपांडे यांचाही ‘प.पू. डॉक्टर यांच्याविषयीचा भाव वाढला आहे’, असे माझ्या लक्षात आले.
‘प.पू. गुरुदेव माझ्या समवेत माझ्या नातेवाइकांच्याही साधनेची काळजी घेत आहेत’, असे आता माझ्या लक्षात आले आहे. कृतज्ञता !’
– सौ. छाया रमेश देशपांडे (पू. कुसुम जलतारेआजी यांची धाकटी मुलगी), चिचोली, जिल्हा बैतुल, मध्यप्रदेश. (१.७.२०२३)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |