१. सत्संगातून साधना करण्याविषयी समजल्यावर कुलदेवीने स्वप्नात येऊन दृष्टांत देणे
‘अनुमाने वर्ष २००६ मध्ये मी साधनेत आले. तेव्हा ‘साधना कशी करायची ?’, हे मला ठाऊक नव्हते. मला सत्संगातून ‘साधनेचे महत्त्व आणि साधना कशी करावी ?’, याविषयी समजले. माझे दत्तक घराणे असल्याने मला ‘आमची कुलदेवी कोणती ?’, ते कळत नव्हते. नंतर कुलदेवीने स्वप्नात येऊन ३ वेळा दृष्टांत दिला.
२. परात्पर गुरु डॉक्टरांनी साधिकेला श्रीकृष्णाच्या रूपात दृष्टांत दिल्यावर साधिकेचा नामजप आतून चालू होणे आणि परात्पर गुरुदेवांच्या भेटीचा सुवर्ण क्षण अनुभवणे
साधनेमुळे माझी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याविषयी पुष्कळ श्रद्धा वाढली. एकदा गुरुवारी दुपारी मी विश्रांती घेत असतांना परात्पर गुरु डॉक्टरांनी मला श्रीकृष्णाच्या रूपात दृष्टांत दिला आणि त्यानंतर माझा आपोआप आतूनच श्रीकृष्णाचा नामजप चालू झाला. नंतर नामजप पुष्कळ चांगल्या प्रकारे होऊ लागला. त्यासह माझी गुरुदेवांना भेटण्याची तळमळ वाढली. माझी सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांशी भेट झाली. ‘गुरुदेवांची भेट’ हा माझ्यासाठी सुवर्ण क्षण होता.
३. अपघातामध्ये माकडहाडाला मार लागल्यावर सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांची कृपा आणि नामजपाचे उपाय यांमुळे लवकर बरे वाटणे
वर्ष २०१५ मध्ये मी दुचाकीवरून प्रवास करतांना अपघात झाला होता. त्या वेळी माझ्या माकडहाडाला मार लागला होता. त्या वेळी आधुनिक वैद्यांनी अडीच मास पूर्णपणे झोपून रहायला सांगितले होते; परंतु सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांच्या कृपेने आणि नामजपाचे उपाय केल्यावर मी केवळ १५ दिवसांत उठून बसू शकले.
४. आयुष्यात ‘अडचणी आणि संकटे आल्यावर कसे जगायचे ?’, याविषयी सत्संगातून शिकायला मिळणे अन् जीवन आनंदी होणे
साधनेत आल्यानंतर मला सत्संगात ‘आयुष्य कसे जगायचे ? येणार्या अडचणींवर मात कशी करायची ?’, याविषयी योग्य दृष्टीकोन मिळाल्याने आयुष्यातील अडचणी आणि संकटे यांवर मात करण्याची माझी क्षमता वाढली. आज मी आणि माझे कुटुंब केवळ आणि केवळ श्रीकृष्ण अन् सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांच्या कृपेनेच आनंदी अन् समाधानी जीवन जगत आहोत. श्रीकृष्ण आणि सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांच्या कृपेनेच आता जीवनाचा अर्थ समजून आयुष्याचे ध्येय समजले.
शेवटच्या श्वासापर्यंत गुरुचरणांची सेवा व्हावी, राष्ट्र आणि धर्म यांसाठी झालेली सेवा ही गुरुचरणी अर्पण व्हावी, अशी आपल्या चरणी शरणागतीने अन् कृतज्ञताभावाने प्रार्थना आहे.’
– सौ. प्रीती संजय एखंडे, चिंचवड, पुणे. (२६.३.२०२३)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |