१. साप्ताहिक ‘सनातन प्रभात’चे वितरण आणि नूतनीकरण या सेवा करण्यासाठी जातांना पाऊस आल्याने सेवेत अडथळा येणे; परंतु प्रार्थना केल्यावर अडचणी दूर होणे
‘२७.८.२०२३ या दिवशी आम्ही (मी आणि श्री. रवींद्र पोत्रेकर) साप्ताहिक ‘सनातन प्रभात’चे वितरण आणि नूतनीकरण या सेवा करण्यासाठी नाशिक रोड विभागात जात होतो. मला प्रवासात अनुसंधानात रहाता आले. आम्ही १ – २ किलोमीटर अंतर गेल्यावर पावसाला आरंभ झाला. आम्ही १५ ते २० मिनिटे झाडाखाली थांबलो. तेव्हा श्री. पोत्रेकर मला म्हणाले, ‘‘आपण परत जाऊया.’’ त्यांनी उत्तरदायी साधकाला विचारले आणि आम्ही परत यायला निघालो. आम्ही परतीच्या वाटेवर असतांना ५ मिनिटांत पाऊस थांबला; मात्र आकाश ढगाळलेलेच होते. श्री. पोत्रेकर यांनी मला विचारले, ‘‘काय करूया ?’’ तेव्हा मी त्यांना सांगितले, ‘‘सेवेतील अडचणी दूर होऊ देत’, अशी देवाला आर्ततेने प्रार्थना करूया.’’ देवानेच आमच्यात निर्माण केलेल्या सेवा करण्याच्या तळमळीला आम्ही प्रार्थनेची जोड दिली. ईश्वर साहाय्याला धावून आला. पाऊस थांबला आणि आमच्या सेवेतील अडचण दूर झाली.
२. अनुभूतीचे विश्लेषण
मनशक्ती (मनात आलेला चांगला विचार) ब्रह्मांडातील इच्छाशक्तीशी जोडली गेली. त्यामुळे निर्माण झालेल्या ऊर्जेमुळे वायुमंडलाची शुद्धी झाली आणि आकाश निरभ्र झाले. बुद्धीची धारणा सत्त्वगुणी झाली. माझा सेवेबद्दलचा विश्वास दृढ झाला आणि कृतीला गती येऊन जिवाकडे अधिकाधिक चैतन्य लहरी आकृष्ट झाल्या. चित्ताची भावजागृती होऊन देह आणि मन यांतील विकार नष्ट होऊन चित्त शुद्ध झाले. कृतीला भगवंताचा आशीर्वाद लाभला आणि अहंची धारणा नष्ट होऊन फलनिष्पत्ती मिळाली अन् आनंद मिळाला.
‘गुरुमाऊलीच सर्व करून घेतात’, याची आम्हाला प्रचीती आली, त्याबद्दल त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’
– श्री. अनिल पाटील (आध्यात्मिक पातळी ६८ टक्के, वय ७६ वर्षे), नाशिक (२९.८.२०२३)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |