१. प्रार्थना आणि कृतज्ञता अधिकाधिक करून दत्तमाला मंत्रपठण करत असल्याने मंत्रपठण भावपूर्ण होणे
‘मागील ११ मासांपासून मी प्रतिदिन दत्तमाला मंत्रपठण करत आहे. आरंभी मला थोडा त्रास झाला. मी मंत्रपठण करत असतांना अडथळे येत होते. त्यानंतर मी प्रार्थना आणि कृतज्ञता अधिकाधिक करू लागले. त्यामुळे माझे दत्तमाला मंत्रपठण अतिशय भावपूर्ण होऊ लागले आणि मला चांगले वाटू लागले.
२. दत्तमाला मंत्रपठण करत असल्याने स्वभावात झालेला पालट
माझ्या स्वभावात पालट झाला. मी तत्परतेने सेवा करू लागले. मी वेळेत मंत्रपठण करायला बसू लागले. मला वेळेचे महत्त्व लक्षात आले. माझी एकाग्रता वाढली. मी मनाची निर्विचार स्थिती अनभवू लागले. माझ्याकडून पठण भावपूर्ण होऊ लागले. ‘माझी लढाऊ वृत्ती वाढली’, असे मला जाणवू लागले.
३. गवती चहाच्या कुंडीत औदुंबराची ७ रोपे उगवणे
आमच्या घराच्या आगाशीत आम्ही मोगरा, जास्वंदी, गवती चहा, कारल्याचा वेल, अळूची पाने, कढीपत्ता आणि २ बांबू, अशी झाडे लावली आहेत. गवती चहाच्या कुंडीत औदुंबराची ७ रोपे उगवली आहेत.
मी झाडांचे निरीक्षण केल्यावर ‘औदुंबराचे एक रोप आहे’, असे मला जाणवले. घरातील सर्वांनी निरीक्षण केल्यावर ‘ती सर्व औदुंबराचीच रोपे आहेत’, असे त्यांना जाणवले.
४. रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात साधक दत्तमाला मंत्रपठण करत असणे आणि आश्रमात आपोआप औदुंबराची रोपे उगवणे अन् त्याचप्रमाणे घरातील कुंडीतही औदुंबराची रोपे उगवणे
योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन यांचा संकल्प आणि कृपाशीर्वाद यांमुळे ही औदुंबराची रोपे आपोआप उगवली आहेत. काही वर्षांपूर्वी ‘रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात अशाच प्रकारची औदुंबराची रोपे उगवली होती’, असे वाचनात आणि पहाण्यात आले होते. त्याप्रमाणेच आमच्या घरातील कुंडीत आपोआप उगवलेली औदुंबराची झाडे ही दत्तमाला मंत्रपठणाचा परिणाम आहे.
‘दत्तमाला मंत्रपठणाचा परिणाम केवळ आश्रमातच नव्हे, तर दूरवर रहात असलेल्या साधकांच्या घरीही दिसून येतो’, हे यातून सिद्ध होते. दत्तगुरु आणि श्री गुरु यांच्या चरणी कृतज्ञता !’
– सौ. लक्ष्मी कोंडिबा जाधव (वय ७३ वर्षे), फोंडा, गोवा. (२३.११.२०२३)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |