परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधकांना ‘भावजागृती’ याविषयी केलेले अमूल्य मार्गदर्शन !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधकांना ‘भावजागृती’ याविषयी केलेल्या अमूल्य मार्गदर्शनाचा काही भाग आपण १२ डिसेंबर २०२३ या दिवशी पाहिला. आज पुढील भाग पाहूया.

या लेखाचा १२ डिसेंबरचा भाग वाचण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा :  https://sanatanprabhat.org/marathi/745042.html

९. प्रत्येक सेवा करतांना ‘ईश्वराची किंवा संतांची सेवा करत आहे’, असा भाव ठेवणे आवश्यक !

कु. गुलाबी धुरी

कु. गुलाबी धुरी : ‘गुरुदेव, जेव्हा मी कुलकर्णीकाकूंची ((कै.) सौ. सुजाता देवदत्त कुलकर्णी (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के) यांची)) सेवा करत होते, तेव्हा त्या सेवेत मी वेगवेगळे भाव ठेवण्याचे प्रयत्न केले. ती सेवा आपणच माझ्याकडून करवून घेतली. त्यानंतर मी त्यावर चिंतन केले. तेव्हा ‘माझ्यामधील भाव वाढत आहे’, असे मला वाटले. त्यांची साडी धुण्याची सेवा करतांना ‘मी संतांचीच वस्त्रे धूत आहे’, असा भाव ठेवत होते.

परात्पर गुरु डॉ. आठवले : ‘मी जी सेवा करत आहे, ती ईश्वराची किंवा संतांची सेवा आहे’, असाच विचार व्हायला पाहिजे.

१०. साधिकेने भाव ठेवून सेवा केल्यावर ईश्वराने तिच्या मनातील सेवेच्या संदर्भातील सर्व इच्छा पूर्ण करणे

कु. गुलाबी धुरी : पूर्वी मी सनातनच्या एका संतांची सेवा करत होते. तोच भाव मी कुलकर्णीकाकूंच्या सेवेत ठेवला होता; त्यानंतर मला पुन्हा संतसेवा (सनातनच्या ८६ व्या संत पू. (कै.) श्रीमती माईणकरआजी यांची सेवा) मिळाली. संतसेवा करतांना ‘भावाचे पुष्कळ महत्त्व आहे’, असे माझ्या लक्षात आले, उदा. संतांची वस्त्रे धुतांना आता मी ‘श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांची वस्त्रे धूत आहे’, असा भाव ठेवते. एकदा माझ्या मनात विचार आला, ‘मला श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांचे कपडे धुवायला कधी मिळतील ?’ त्यानंतर माझ्या लक्षात आले, ‘खरोखर आपण जसा भाव ठेवतो, तसाच प्रसाद ईश्वर देतो’; कारण त्यानंतर ८ दिवस मला श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ यांची वस्त्रे धुण्याची सेवा मिळाली. एकदा श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ यांचे कपडे धुतांना मी ‘परात्पर गुरुदेवांचेच (परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे) कपडे धुण्याची सेवा करत आहे’, असा भाव ठेवला. तेव्हा त्यांच्या कपड्यांमधून पुष्कळ सुगंध येत होता. त्या वेळी ‘मी आपलेच (परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे) कपडे धूत आहे’, असे मला वाटले.

तेवढ्यात अन्य एक साधिका तिथे आली आणि तिने मला विचारले, ‘‘तू एवढे सारे कपडे एवढ्या आनंदाने कसे धूत आहेस ?’’ तेव्हा मी तिला मी ठेवत असलेल्या भावाविषयी सांगितले. त्या वेळी ती म्हणाली, ‘‘पुष्कळ छान भाव ठेवतेस. ‘परात्पर गुरु डॉक्टरांचे कपडे धुवायला मिळतील कि नाही ?’, हे ठाऊक नाही; परंतु तसा भाव ठेवायचा.’’ त्यानंतर २ दिवसांनी मला २ दिवस प.पू. दास महाराज यांचे कपडे धुण्याची सेवा मिळाली. तेव्हा मला वाटले, ‘भक्त ईश्वराप्रती भाव ठेवतो, तेव्हा ईश्वराला यावेच लागते.’ तेव्हापासून माझा भाव आणखी वाढत गेला. मला वाटते, ‘भक्त ईश्वराला आपल्या अंतर्मनातून बोलावतो. तेव्हा ईश्वराला तो कुठेही असला, तरी तिथून यावेच लागते.’

११. ‘संत ज्या देवतेच्या अनुसंधानात असतात, त्या देवतेला प्रार्थना केल्यास ते संत त्या देवतेचे त्वरित ऐकतात’, याची अनुभूती साधिकेला येणे

कु. गुलाबी धुरी : जेव्हा सेवा करतांना माझ्या मनाचा संघर्ष होतो, तेव्हा मी भाव ठेवण्याचा प्रयत्न करते आणि त्यानंतर ती कृती करते. त्यामुळे त्वरित संघर्ष संपतो आणि ती सेवा भावपूर्ण होते. आता मी पू. (श्रीमती) माईणकरआजी यांची सेवा करते. त्यांना जेवण भरवण्याची सेवा माझ्याकडे आहे. त्यांना जेवण भरवतांना त्या माझ्या हातून खात नव्हत्या. तेव्हा मी एका साधकाला विचारले, ‘‘मी कोणता भाव ठेवू आणि त्यांना कसे जेवण भरवू ?’’

तेव्हा त्यांनी पुष्कळ सुंदर सांगितले. ते म्हणाले, ‘‘संत नेहमी ईश्वराच्या अनुसंधानात असतात. ते ईश्वराचेच ऐकतात.’’ तू ज्या संतांची सेवा करत आहेस, ‘त्या संत कोणत्या देवतेच्या अनुसंधानात असतात ?’, हे तुला ठाऊक आहे ना ? त्या श्रीरामाच्या अनुसंधानात रहातात. त्यामुळे तू श्रीरामाला सांग, ‘हे श्रीरामा, तूच यांना जेवण भरव.’ तसे केल्यावर संत ते खातील.’’ दुसर्‍या दिवशी मी तसे प्रयत्न केले. मी श्रीरामाला सांगितले, ‘पू. आजी तुझ्या अनुसंधानात असतात ना ! तूच येऊन त्यांना जेवण भरव.’ त्या दिवशी खरोखर पू. आजी सर्व जेवण जेवल्या.

परात्पर गुरु डॉ. आठवले : पुष्कळ सुंदर आहे !

कु. गुलाबी धुरी : त्या साधकाने सांगितले, ‘‘संतांचा लिंगदेह किंवा आत्मा ईश्वराशी संलग्न असतो. त्यामुळे ते ईश्वराचे ऐकतात. ‘माझ्या समोर कोण आहे ?’, असे ते पहात नाहीत. ते सर्वांमध्ये ईश्वरालाच पहात असतात.”

१२. सेवा करतांना प्रत्येकामध्ये ईश्वर पाहिल्यास संतसेवेचाच लाभ होईल !

परात्पर गुरु डॉ. आठवले : त्या संत जसे समोरच्यात ईश्वराला बघतात, तसे तुलाही बघायचे आहे. मला ‘संतांची सेवा हवी. श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांची सेवा हवी’, असे विचार नकोत. ‘प्रत्येक साधकामध्ये ईश्वरच आहे’, असा भाव ठेवला, तर श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ यांची साडी धुतांना तुला जसा आनंद मिळाला, तसाच आनंद मिळेल आणि मग लवकर लवकर पुढे जाशील.

कु. गुलाबी धुरी : आपला आशीर्वाद असेल तर !

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक