सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या सतत अनुसंधानात रहाणारे रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात बांधकामासंबंधी सेवा करणारे बिहार येथील ६४ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. बाबूलाल चौधरी (वय ५५ वर्षे) !

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात बांधकामासंबंधी सेवा करणारे कामगार श्री. बाबूलाल चौधरी (आध्यात्मिक पातळी ६४ टक्के, वय ५५ वर्षे) हे आश्रमात काम करता करता सनातनचे चांगले साधक झाले आहेत. त्यांच्या मनात सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती पुष्कळ भाव निर्माण झाला असून, ते नेहमी त्यांच्या अनुसंधानात असतात. होमिओपॅथी वैद्या सुश्री (कु.) आरती तिवारी यांना त्यांच्याविषयी जाणवलेली सूत्रे येथे दिली आहेत.

श्री. बाबूलाल चौधरी

१. वेळ मिळताच सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे स्मरण करणारे आणि त्यांच्या अनुसंधानात रहाणारे श्री. बाबूलाल चौधरी !

‘वर्ष २०२२ च्या नोव्हेंबर मासामध्ये मी घरून रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात गेल्यावर दुचाकी उभी करत होते. तिथे बांधकामासंबंधी सेवा करणारे कामगार साधक श्री. बाबूलाल चौधरी डोळे मिटून बसले होते. आम्ही (श्री. बाबूलाल चौधरी आणि मी) नेहमी एकमेकांकडे पाहून नमस्कार करतो. आज देवाने माझ्या मनात विचार दिला, ‘त्यांच्याशी २ मिनिटे बोलावे.’ तेवढ्यात त्यांनीही डोळे उघडले. तेव्हा माझा त्यांच्याशी थोडा वेळ संवाद झाला. तो येथे दिला आहे.

होमिओपॅथी वैद्या सुश्री (कु.) आरती तिवारी

२. सेवा झाल्यावर किंवा सेवा करतांना थोडा वेळ विश्रांती घेतांना डोळे मिटल्यावर डोळ्यांसमोर सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले दिसणे

मी (सुश्री (कु.) आरती तिवारी) : डोळे मिटून कुठली प्रार्थना करत होता ?

श्री. बाबूलाल चौधरी : काही नाही. गुरुदेवांचे (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे) स्मरण करत होतो.

मी (सुश्री (कु.) आरती तिवारी) : तुम्हाला गुरुदेव कसे दिसतात ?

श्री. बाबूलाल चौधरी : ते कधी पांढरी बंडी घातलेले, तर कधी पिवळा झब्बा घातलेले दिसतात. सेवा संपल्यावर किंवा सेवा करतांना काही वेळा थोडे थांबल्यावर मी डोळे मिटतो. तेव्हा मला माझ्या आजूबाजूला आणि पुढे-मागे सर्वत्र परम पूज्य (परात्पर गुरु डॉ. आठवले) दिसतात.

३. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपेने घरातील अडचणी सुटत असल्यामुळे कुटुंबियांची काळजी न वाटणे

मी (सुश्री (कु.) आरती तिवारी) : घरी सर्व ठीक आहे ना ?

श्री. बाबूलाल चौधरी : हो ! परम पूज्यांच्या कृपेने सर्व ठीक आहे. घरी काही अडचण आली, तर मी डोळे मिटून परम पूज्यांना सांगतो. त्यांना सांगितल्यावर अडचण लगेच सुटते. त्यामुळे आता मला कुटुंबियांची काळजी वाटत नाही.

त्यांचे हे बोलणे ऐकून माझी भावजागृती झाली.

४. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी श्री. बाबूलाल यांची विचारपूस करणे, तेव्हा सेवेत एकाग्र झाल्यामुळे बाबूलाल यांना त्यांचे बोलणे ऐकू न येणे; पण ते कळल्यावर त्यांना कृतज्ञता वाटणे

श्री. बाबूलाल : आता १ वर्षापेक्षा अधिक काळ झाला, मी प.पू. गुरुदेवांना (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना) पाहिले नाही; पण ‘ते सतत माझ्या समवेत आहेत’, असे मला सूक्ष्मातून नेहमी जाणवते. मागे एकदा प.पू. गुरुदेव खोलीत जात असतांना मी दाराजवळच बांधकामाशी संदर्भातील सेवा करत होतो. ‘त्यांना जातांना अडचण होऊ नये’, यासाठी मी दार धरून थांबलो होतो. खोलीत जातांना ते मला म्हणाले, ‘‘बाबूलाल, तुम्ही कसे आहात ?’’असे त्यांनी मला १ – २ वेळा हाक मारून विचारले; पण माझे त्यांच्याकडे लक्ष नव्हते. नंतर मला अन्य साधक म्हणाले, ‘‘गुरुदेव तुम्हाला ‘तुम्ही कसे आहात ?’, असे विचारत होते.’’ ते ऐकून मला पुष्कळ कृतज्ञता वाटली.

ते हा प्रसंग मला सांगत असतांना ‘ते प.पू. गुरुदेवांना पुन्हा अनुभवत आहेत’, असे मला जाणवले. ‘ते सेवेत एकाग्र झाले असल्याने त्यांना प.पू. गुरुदेवांनी हाक मारल्याचे आणि त्यांनी विचारपूस केल्याचेही ऐकू आले नाही’, असेही मला जाणवले.

५. भावस्थितीत असणे

श्री. बाबूलाल यांचा चेहरा मागील २ – ३ मासांत अधिक उजळलेला आणि गुलाबी दिसतो. ‘ते सतत भावस्थितीत असतात’, असे मला वाटते. श्री. बाबूलाल यांच्याशी बोलल्यावर बराच वेळ मी ती भावस्थिती अनुभवली.

‘प.पू. गुरुदेवांचे प्रत्येक साधकाकडे किती लक्ष असते’, या विचाराने माझे मन कृतज्ञतेने भरून आले.’

– होमिओपॅथी वैद्या सुश्री (कु.) आरती तिवारी, नागेशी, गोवा. (१३.५.२०२३)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक