नवी देहली – भारताने पहिल्यांदाच संयुक्त अरब अमिरात देशाकडून कच्चे तेल खरेदी करतांना जागतिक चलन असलेल्या अमेरिकी डॉलर ऐवजी भारतीय रुपयांमध्ये व्यवहार केला. भारत जगातील तिसरा इंधन तेल खरेदी करणारा मोठा देश आहे. भारत ८५ टक्के कच्चे तेल आयात करतो. त्यामुळे भारताच्या या कृतीला पुष्कळ महत्त्व आहे. यापूर्वी युक्रेन युद्धाच्या काळात रशियाकडून तेल खेरदी करतांना भारतीय रुपयांमध्ये पैसे दिले होते. भारतीय रुपयांमध्ये व्यवहार केल्यास आपल्याकडील परदेशी चलनाची बचत होऊन त्याचा भारताला लाभ होईल.
११ जुले २०२२ या दिवशी भारतीय रिझर्व्ह बँकेने आयात करणार्यांना देयक देतांना भारतीय रुपयांतून करण्याची अनुमती दिली होती. रिझर्व्ह बँकेने आतापर्यंत जगातील २२ देशांची भारतीय रुपयांमध्ये व्यापार करण्यासाठी संमती मिळवली आहे. तरीही तेल उत्पादक देश रुपयांमध्ये व्यवहार करण्यास अद्याप सिद्ध नाहीत.