Congress On Veer Savarkar : काँग्रेसला स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयी इतका द्वेष का ?

स्वातंत्र्यवीर सावरकर

१. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर टीका करण्याची काँग्रेसीजनांची परंपरा कायम !

‘काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचे थोर सुपुत्र तथा कर्नाटक सरकारमधील मंत्री प्रियांक खर्गे यांनी अलीकडेच स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान करणारी मुक्ताफळे उधळली. त्यामुळे महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातून समस्त सावरकर साहित्याचे अभ्यासक आणि त्यांच्या राष्ट्र्रभक्तीवर निस्सीम प्रेम करणारे सावरकरप्रेमी यांनी त्याचा प्रकट निषेध नोंदवला. काही ठिकाणी तर प्रियांक खर्गे यांच्या पुतळ्याचे दहनही करण्यात आले. वास्तविक पहाता काँग्रेसला सावरकर यांच्याविषयी इतकी चीड का आहे ? हे एक न उलगडणारे कोडे आहे; कारण सावरकर यांनी त्यांच्या हयातीत काँग्रेसच्या पक्षीय एकीकरणावर कधीच टीका केली नाही. त्या वेळच्या राष्ट्रीय सभेच्या राष्ट्र्रभक्तीपर अभियानाची त्यांनी प्रशंसाच केलेली आढळते. असे असतांना काँग्रेसच्या तत्कालीन ध्येय धोरणात अल्पसंख्यांक म्हणून ख्रिस्ती आणि मुसलमान यांच्या धार्मिक कडवेपणाला अधिक सशक्त करणारी बोटचेपी भूमिका होती. त्यावर त्यांनी सडकून टीका केली, तसेच त्यांनी काँग्रेसमधील हिंदूंना राष्ट्र्रहितासाठी वेळोवेळी सावधानतेच्या सूचना केल्या. राष्ट्रीय सभेत सर्वाधिक हिंदूच होते आणि त्यांनी हिंदी राष्ट्रीयवादाचे धोरण स्वीकारले होते. त्यामुळे त्यात अल्पसंख्यांक आणि बहुसंख्यांक असा विचार असता कामा नये. सर्वांसाठी एक तत्त्व, एक विचार, एक न्याय, एक नियम हे सावरकर यांचे धोरण असल्याने त्यांनी सावधानतेसाठी टीका केली. अशा स्वरूपाची परस्परांवर टीका करत विचारांची देवाणघेवाण स्वातंत्र्यपूर्व काळात अनेक थोर महात्म्यांमध्ये  चालत होती, अशी माहिती मिळते. याचा अर्थ ते परस्परांचे द्वेषी होते, असे नव्हे. असे असले, तरी स्वातंत्र्योत्तर पहिल्या पंतप्रधानापासून आजपर्यंत काँग्रेसी प्रवृत्ती ही स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान करण्याचा प्रयत्न का करतात ? अर्थात् याला लालबहादूर शास्त्री, नरसिंहराव यांसारखे काँग्रेसी पंतप्रधान अपवाद आहेत. तरीही काँग्रेसची ही परंपरा आहे, हे सत्य नाकारता येत नाही.

श्री. श्याम मो. देशपांडे

२. काँग्रेसजनांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या चरित्राचा अभ्यास करणे आवश्यक !

गांधी हत्येमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर यांना न्यायालयाने निर्दोष सिद्ध केल्यावरही त्या न्यायालयाच्या निर्णयाला केराची टोपली दाखवत त्यांच्यावर ‘गांधी हत्यारे’ म्हणून आरोप करणारे काँग्रेसचे वर्तमान नेतृत्व हे राज्यघटना आणि न्यायालय यांचे रक्षक कसे म्हणता येईल ? ‘माफीवीर’, ‘संडासवीर’, ‘गांधी हत्यारे’, ‘ब्रिटीश हस्तक’, ‘स्वातंत्र्यवीर नव्हे, स्व-तंत्रवीर’ आदी अनेक स्वरूपाच्या टीका काँग्रेसीजन करत आले आहेत. त्यामुळे त्यांना सावरकर साहित्यावर होत असलेल्या अभ्यास मंडळात पाठवण्याची नितांत आवश्यकता आहे.

३. गांधी हत्येतील स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे निर्दाेषत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मान्य

गांधी हत्येच्या प्रसंगीही तत्कालीन कायदेमंत्री असलेले भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनाही हे कळले होते की, सावरकर निर्दोष असून नेहरू सूडभावनेने बुद्धी पुरस्सर त्यांना यात गोवत आहेत आणि म्हणूनच डॉ. आंबेडकरांनी अधिवक्ता लक्ष्मण भोपटकर यांना कळवले होते, ‘सावरकर निर्दोष आहेत, हे मी जाणतो. सावरकर यांचे वकीलपत्र कुणी अभ्यासू विधीज्ञ जर घेत नसेल, तर मी कायदेमंत्रीपदाचे त्यागपत्र देऊन सावरकर यांचा वकील म्हणून न्यायालयात उभा रहाण्यास सिद्ध आहे. याविषयी आपण सावरकरांशी वार्तालाप करून कळवावे; कारण ते निर्दोष आहेत, यात मला मुळीच शंका नाही.’ घटनाशिल्पकार राज्यघटना रचियते डॉ. आंबेडकर यांना जे कळले होते, ते वर्तमान काळातील आंबेडकर यांच्या राजकीय अनुयायांनाही कळू नये आणि प्रसंगी त्यांनीही काँग्रेसचे समर्थन करणे, हे कोणत्या राष्ट्र्रभक्तीत बसणारे आहे ?

वास्तविक पहाता सावरकर हिंदू महासभेचे होते आणि हिंदू महासभेचा कुणीही प्रतिनिधी कोणत्याही शासकीय यंत्रणेच्या अधिकारीपदावर कुठेही नव्हता. असे असतांना काँग्रेसच्या नेतृत्वाला स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे इतके भय का वाटावे ? हे एक आश्चर्यच आहे. सावरकर कट्टर हिंदुत्वनिष्ठ होते, हे सत्य आहे. त्यामागे त्यांचा हेतू अन्य धर्मियांचा अपमान अथवा त्यांचे अस्तित्व नाकारण्याचा नव्हता, तर राष्ट्र्रहिताच्या दृष्टीने हिंदू बहुसंख्य असल्याने हिंदुहिताचे राजकारण आणि राजकारणाचे हिंदुकरण करून सर्वांना समान न्याय मिळावा, हीच त्यांची त्यामागे भूमिका होती. त्यात वावगे काहीच नव्हते. उलट त्याचा स्वीकार न केल्याने स्वातंत्र्योत्तर काळापासून तो काँग्रेसच्या सत्ताकाळापर्यंत देशात काय परिस्थिती निर्माण झाली आणि त्याचे निस्तारण करण्याच्या प्रयत्नापोटी देश किती मागे गेला, हे सूज्ञांना सांगण्याची आवश्यकता नाही.

४. काँग्रेसजनांचा सावरकरद्वेष थांबवणे हे सावरकर भक्तांसाठी मोठे आव्हान !

नेहरू घराणे हेच मुळी सावरकरद्वेषी आहे. त्याला श्रीमती इंदिराजी काही प्रमाणात अपवाद होत्या; परंतु अलीकडे सोनिया, राहुल, प्रियंका आदी सारे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या राष्ट्र्रभक्ती प्रती अनभिज्ञ असणारी मंडळी वाचाळवीरासारखी वक्तव्ये करतात. त्यानंतर ‘हाय कमांड’ची री ओढणारी काँग्रेसची नेतेमंडळी आणि अनुयायी तेच तेच उगाळत असंतोष निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतात. याला कुठेतरी पूर्णविराम देण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे; कारण सावरकर यांचा अपमान हा केवळ वैयक्तिक सावरकर यांचा नसून तो महाराष्ट्राचा आणि एका मराठी राष्ट्र्रभक्ताचा अपमान आहे. यांचे हे असेच चालत राहिले, तर यांची जीभ उद्या महाराष्ट्रातील कोणत्याही राष्ट्र्रभक्तावर घसरल्याखेरीज रहाणार नाही, मग त्याला छत्रपती शिवाजी महाराजही अपवाद रहाणार नाहीत. त्यामुळे काँग्रेसीजनांची ही खेळी हे महाराष्ट्रातील नागरिक, सावरकर अभ्यासक आणि सावरकरभक्त यांच्यासाठी मोठे आव्हान आहे.’

– श्री. श्याम मो. देशपांडे, वर्धा. (१५.१२.२०२३)

संपादकीय भूमिका

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह अन्य राष्ट्रभक्तांचा वारंवार होणारा अपमान रोखण्यासाठी भारतात हिंदु राष्ट्रच हवे !