Christmas Bageshwar Dham : मुलांना सांताक्लॉज बनवण्याऐवजी त्यांनी श्री हनुमानाच्या मंदिरात दर्शनासाठी पाठवा ! – पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री

‘सनातनी आणि भारतीय असाल, तर या पाश्‍चात्त्य विकृतीवर बहिष्कार घाला’, असेही केले आवाहन !

पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री

बागेश्‍वर (मध्यप्रदेश) – भारतातील जितके सनातनी हिंदु पालक आणि आई-वडील आहेत त्यांनी त्यांच्या मुलांना सांताक्लॉज बनवून चर्चमध्ये पाठवण्यापेक्षा त्यांना श्री हनुमानाच्या मंदिरात नेऊन दर्शन घ्या आणि तेथील प्रसाद घ्या, असे आवाहन बागेश्‍वर धामचे पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांनी केले. ते पत्रकारांशी बोलत होते. त्यांनी नाताळ साजरा करण्याऐवजी मातृ-पितृ पूजन दिवस साजरा करण्याचेही आवाहन केले. ‘जर तुम्ही सनातनी आणि भारतीय असाल, तर या पाश्‍चात्त्य विकृतीवर बहिष्कार घाला’, असेही ते म्हणाले.

पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांनी पुढे म्हटले की, सनातनी हिंदूंनी आपली विराट सनातन संस्कृती लक्षात ठेवून घरोघर तुळशीचे पूजन केले पाहिजे. भारतीय संस्कृतीमध्ये नाताळला कोणतेही स्थान नाही. यामुळे प्रत्येक हिंदु कुटुंबाने आपल्या मुलांवर सनातन धर्माचे संस्कार करून त्यांचा विकास केला पाहिजे. त्यांना संत मीराबाई प्रमाणे, महाराणी लक्ष्मीबाई आणि स्वामी विवेकानंद यांच्या प्रमाणे कार्य करण्यासाठी प्रेरित करा.