मार्गशीर्ष पौर्णिमा (दत्तजयंती, २६.१२.२०२३) या दिवशी सनातनचे २६ वे (समष्टी) संत पू. सदाशिव (भाऊ) परब यांचा ८३ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांनी नामजपादी उपाय केल्यानंतर ग्रंथ छपाई करण्यातील अडचणी सुटल्याविषयीची अनुभूती येथे दिली आहे.
पू. सदाशिव (भाऊ) परब यांच्या चरणी ८३ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने कृतज्ञतापूर्वक नमस्कार !
१. ‘ग्रंथाची तातडीने छपाई करायची असतांना छपाई करण्याचे यंत्र नादुरुस्त आहे’, असे साधकाने सांगणे
‘१२.९.२०२३ या दिवशी दुपारी ४.३० वाजता मी कोल्हापूर सेवाकेंद्रात ग्रंथांशी संबंधित सेवा करण्यासाठी गेलो. तेव्हा सेवाकेंद्रातील साधक श्री. हेमंत सातपुते मला म्हणाले, ‘आदर्श अभिभावक कैसे बने ?’ या हिंदी भाषेतील ग्रंथाची तातडीने छपाई करायची आहे. त्यासाठी आम्ही कोल्हापूर येथील ‘राम सीता’ या मुद्रणालयात गेलो होतो; मात्र तेथील छपाई करण्याचे यंत्र नादुरुस्त असल्याने अडचणी येत आहेत. आम्ही अन्यत्र चौकशी केल्यावर ‘दुसर्या कोणत्याही छापखान्यात ग्रंथ लवकर छापून मिळणार नाही’, असे आम्हाला समजले.’’
२. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपेने ‘प्रार्थना करण्यासह नामजपादी उपाय शोधून काढायला हवेत’, असा विचार मनात येणे
छपाई यंत्र (मशीन) दुरुस्त होण्यासाठी श्री. हेमंत सातपुते यांनी मला प्रार्थना करायला सांगितली. ‘अन्य वेळी ग्रंथ छापायला काही अडचण आली, तर देवतांना प्रार्थना करून अडचण सुटते’, असा आमचा अनुभव आहे; मात्र या वेळी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांनी माझ्या मनात विचार घातला, ‘या वेळी केवळ प्रार्थना केल्याने अडचण सुटणार नाही. त्यासाठी नामजपादी उपाय शोधून काढणे आवश्यक आहे.’
३. स्वतः नामजपादी उपाय करणे आणि साधकांना ‘छापखान्याच्या मालकाला लिंबाने यंत्राची दृष्ट काढायला सांगा’, असे सांगणे
जगद्गुरु भगवान श्रीकृष्ण, कोल्हापूरची ग्रामदेवता करवीर निवासिनी श्री महालक्ष्मीदेवी आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना मी प्रार्थना केली. मी सूक्ष्मातून ‘यंत्रावर आवरण आले आहे का ?’, ते पाहिले. तेव्हा मला यंत्रावर पुष्कळ दाब जाणवला. यंत्रावरील दाब दूर होण्यासाठी मी नामजपादी उपाय शोधले. मी ३० मिनिटे ‘महाशून्य’ हा जप केला.
मी श्री. सातपुते यांना सांगितले, ‘‘छापखान्याच्या मालकाला लिंबाने यंत्राची दृष्ट काढायला सांगा.’’ त्यानंतर श्री. सातपुते आणि श्री. संतोष गावडे दोघे लिंबू घेऊन यंत्राची दृष्ट काढायला गेले.
४. नामजपादी उपाय केल्याचा झालेला लाभ
श्री. सातपुते यांनी सायंकाळी ५.३० वाजता मला भ्रमणभाष करून सांगितले, ‘‘लिंबाने यंत्राची दृष्ट काढल्यानंतर नादुरुस्त असलेल्या यंत्रातील अडचण (फॉल्ट) लक्षात आली. यंत्र लगेच दुरुस्त झाले. नवीन हिंदी ग्रंथाची छपाई करणे चालू झाले.’’
‘जगद्गुरु भगवान श्रीकृष्ण, करवीर निवासिनी श्री महालक्ष्मीदेवी आणि गुरुमाऊली सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपेने नवीन हिंदी ग्रंथ वेळेत छापून झाला’, त्याबद्दल त्यांच्या कोमल चरणी मी कोटीशः कृतज्ञ आहे.’
– (पू.) सदाशिव (भाऊ) परब, कोल्हापूर सेवाकेंद्र (१५.९.२०२३)
|