श्री दत्ताची उपासना !

उपासनेतील सुलभता !

दत्त हा ब्रह्माच्या इच्छाशक्तीशी निगडित असल्याने इतर देवतांच्या तुलनेत तो अल्प कालावधीत सगुणात येऊन कार्य करतो; म्हणून इतर देवतांच्या तुलनेत दत्ताची उपासना सुलभ आहे.

दत्ताच्या उपासनेतील काठिण्य !

प्रत्येक देवतेच्या साधनेतील काठिण्य हे आपण साधना केल्यावर त्या देवतेची सूक्ष्म-ज्ञानेंद्रिये आणि सूक्ष्म-कर्मेंद्रिये लवकर अथवा उशिरा जागृत होण्यावर अवलंबून असते. यासंदर्भातील फरक १० टक्के इतका असतो. दत्ताच्या उपासनेतील काठिण्य ७ टक्के आहे.
– ब्रह्मर्षि (श्री. राम होनप यांच्या माध्यमातून)

दत्ताच्या उपासनेची वैशिष्ट्ये !

१. वर्णाश्रमोचित आचारधर्माचे काटेकोर पालन

२. योगमार्ग आणि शक्तीपातदीक्षा यांनुसार उपासना

३. सांप्रदायिक अनुशासन (शिस्त) महत्त्वाचे

४. अत्यंत कठोर अनुष्ठाने आणि कायाक्लेश

५. सोवळे-ओवळे कडक

६. पादुका आणि औदुंबर वृक्ष यांची पूजा : काही ठिकाणी सगुण मूर्तीपेक्षा पादुका आणि औदुंबर वृक्ष यांचीही पूजा केली जाते.

७. गुरुचरित्राचे पारायण : दत्तभक्त गुरुचरित्राचे वाचन, पठण आणि श्रवण मोठ्या भक्तीभावाने करतात.
(संदर्भ : सनातनचा ग्रंथ ‘दत्त’)

दत्ताचे पूजन कसे करावे ?

प्रश्न १ : दत्ताला गंध कोणत्या बोटाने लावावे ?

उत्तर : अनामिकेने

प्रश्न २ :  फुले किती आणि कोणती वहावीत ?

उत्तर : जाई आणि निशिगंध, सात किंवा सातच्या पटीत

प्रश्न ३ : कोणत्या गंधाच्या आणि किती उदबत्त्या घ्याव्यात?

उत्तर : चंदन, केवडा, चमेली, जाई, अंबर आणि हीना यांपैकी कोणत्याही सुगंधाच्या २ उदबत्त्या

प्रश्न ४ : अत्तर कोणत्या गंधाचे अर्पण करावे ?

उत्तर : वाळा

प्रश्न ५ : दत्ताला किती प्रदक्षिणा घालाव्यात ?

उत्तर : सात
(संदर्भ : सनातनचा ग्रंथ ‘दत्त’)

दत्ताच्या नामजपाचे लाभ

१. ‘दत्ताच्या नामजपामुळे पूर्वजांना गती मिळाल्याने घरातील वातावरण आनंदी रहाण्यास साहाय्य होते.

२. दत्ताच्या नामजपामुळे जिवाला शिवाचीही शक्ती मिळते.’
– श्री. मिरजे

पूर्वजांना गती मिळण्यासाठी दत्ताची उपासना करावी !

पूर्वजांपैकी ९९ टक्के पूर्वज अतृप्त असल्याने त्यांच्याकडून त्यांच्या कुटुंबियांना त्रास होतो. पूर्वजांपैकी १ टक्का पूर्वज चांगले, म्हणजे कुटुंबियांना त्रास न देणारे असतात; मात्र तेही भुवलोकात अडकलेले असू शकतात. अशांना गती मिळण्यासाठीही दत्ताचा नामजप / उपासना करणे उपयुक्त असते.

अतृप्त पूर्वजांच्या त्रासांपासून रक्षण होण्यासाठी त्रासाच्या तीव्रतेनुसार करायची उपासना

१. कोणत्याही प्रकारचा त्रास होत नसल्यास पुढे त्रास होऊ नये म्हणून, थोडासा त्रास असल्यास प्रतिदिन १ ते २ घंटे ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप करावा.

२. मध्यम त्रास असल्यास कुलदेवतेच्या नामजपासह ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप प्रतिदिन २ ते ४ घंटे करावा. तसेच गुरुवारी दत्ताच्या देवळात जाऊन ७ प्रदक्षिणा घालाव्यात आणि बसून एक-दोन माळा जप वर्षभर तरी करावा. त्यानंतर ३ माळा जप चालू ठेवावा.

३. तीव्र त्रास असल्यास कुलदेवतेच्या नामजपाच्या जोडीला ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप प्रतिदिन ४ ते ६ घंटे करावा.

एखाद्या ज्योतीर्र्लिंगाच्या ठिकाणी जाऊन नारायणबली, नागबली, त्रिपिंडी श्राद्ध, कालसर्पशांती यांसारखे विधी करावेत. त्याच्याच जोडीला एखाद्या दत्तक्षेत्री राहून साधना करावी किंवा संतसेवा करून त्यांचा आशीर्वाद मिळवावा.
(संदर्भ : सनातनचा ग्रंथ ‘दत्त’)