केळशी (गोवा) येथे ‘पांचजन्य’ नियतकालिकाकडून राष्ट्रीय परिसंवादाचे आयोजन !
मडगाव (गोवा), २५ डिसेंबर (वार्ता.) – उत्तराखंड येथील सिल्कियारा बोगद्यात अडकलेल्या कामगारांच्या सुटकेचे बचावकार्य स्थानिक श्री बौगनाथ देवतेवरील श्रद्धा, तसेच ज्ञान आणि कर्म यांच्यामुळे यशस्वी झाले. केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी आल्यापासून भारताच्या परराष्ट्र धोरणात अमुलाग्र पालट झाले. त्यामुळेच वर्ष २०१५ मध्ये येमेनमधील युद्धसदृश परिस्थितीतून भारतियांना सुखरूप मायदेशी आणणारे ‘ऑपरेशन राहत’, तसेच वर्ष २०२२ मध्ये युक्रेनमधील भारतियांना भारतात आणण्यासाठी राबवलेले ‘ऑपरेशन गंगा’ या मोहिमा यशस्वी झाल्या. सप्टेंबर २०२३ मध्ये देहलीत झालेल्या ‘जी-२० परिषदे’चे सुयशही यामुळेच मिळाले, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते उभारणी आणि नागरी उड्डयन राज्य मंत्री जनरल व्ही.के. सिंह यांनी केली.
‘पांचजन्य’या हिंदुत्वनिष्ठ हिंदी नियतकालिकेकडून २४ डिसेंबर या दिवशी कमडगावजवळ असलेल्या केळशी येथील ‘नोवाटेल डोना सिल्व्हिया रिसॉर्ट’ येथे ‘सागरमंथन सुशासन संवाद २.०’ हा राष्ट्रीय स्तरावरील परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला गोवा राज्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनी संबोधित केले. या परिसंवादात ‘सांस्कृतिक प्रेरणा’, ‘स्वस्थ भारताचे सूत्र’, ‘राष्ट्र-धर्म’ आदी विषयांवर उपस्थित मान्यवरांनी संबोधित केले.
विश्व हिंदु परिषदेचे महामंत्री मिलिंद परांडे, कर्णावती (गुजरात) येथील प्रसिद्ध अस्थीरोगतज्ञ डॉ. केयूर बूच, देहलीतील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थानचे प्रसिद्ध वैद्य महेश व्यास, अमूल आस्थापनाचे प्रबंध निर्देशक जयेन मेहता, दीनदयाळ शोध संस्थानचे महासचिव अतुल जैन, संपर्क भारती या विदेशात कार्य करणार्या राष्ट्रनिष्ठ संघटनेचे कर्नल तेज कुमार टिक्कू, ‘पांचजन्य’चे मुख्य संपादक हितेश शंकर आदींनीही संबोधित केले.
केंद्र सरकारला अपेक्षित विकास साधण्यात गोवा अग्रेसर ! – मुख्यमंत्री प्रमोद सावंतया वेळी गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ‘गतीमान गोवा, शक्तीमान भारत’ या सत्राला संबोधित केले. ‘पांचजन्य’चे मुख्य संपादक हितेश शंकर यांनी त्यांची मुलाखत घेतली. या वेळी मुख्यमंत्र्यांनी पुढील सूत्रे मांडली – १. केंद्र सरकारला अपेक्षित असा गोव्याचा विकास साधण्यात गोवा अग्रेसर आहे. गोव्याच्या इच्छाशक्तीमुळे हे शक्य झाले. २. केंद्र सरकारने गोव्यासाठी २५ सहस्र कोटी रुपयांचे साहाय्य केले असून नियोजित ९० प्रकल्पांपैकी १७ प्रकल्प पूर्ण झाले आहेत. ३. गोव्यातील विमानतळ, बंदर आणि रेल्वेमार्ग राष्ट्रीय महामार्गाशी जोडले गेल्याने आता आंतरराष्ट्रीय स्तरावर गोव्यातून मालाची निर्यात करणे शक्य होणार आहे. ४. ‘स्वयंपूर्ण गोवा’ ही योजना राबवण्याच्या अंतर्गत गोव्यामध्ये दुधाचे उत्पादन ३० ते ४० टक्के वाढवण्याचा प्रयत्न केला. राज्यात भाजीपाल्याचे उत्पादनही वाढवले. याचे सर्व श्रेय सरकारी अधिकारी, सर्व पंचायतींचे सदस्य आणि जनतेला जाते. ५. ‘गोव्यात पाश्चात्त्य संस्कृती आहे’, अशी गोव्याची प्रतिमा निर्माण केली जात आहे का ? या प्रश्नाला उत्तर देतांना मुख्यमंत्री म्हणाले, ‘‘गोव्याची संस्कृती अशी नाही. गोव्यामध्ये पोर्तुगिजांनी ४५० वर्षे राज्य करूनही गोव्यात आमच्या पूर्वजांनी भारतीय संस्कृती टिकवून ठेवली. हे गोव्याचे वैशिष्ट्य आहे. ‘सूर्य, वाळू आणि समुद्रकिनारे’ (सन, सँड अँड सी) ही गोव्याची संस्कृती नसून गोव्यात भारतीय संस्कृतीचे दर्शन घडवणारे बरेच भाग आहेत. धार्मिक पर्यटन, शेती पर्यटन अशा अनेक क्षेत्रांत आम्हाला काम करायचे आहे. गोवा सरकारने येथील प्राचीन सप्तकोटेश्वर मंदिराची पुनर्उभारणी केली आहे.’’ |