‘श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी जुलै २००० पासून पूर्ण वेळ साधना करण्यास आरंभ केला. तेव्हापासून ते वर्ष २०२३ या कालावधीत त्यांनी विविधांगी, गुणवत्तापूर्वक आणि प्रशंसनीय अशा सेवा केल्या. यावरून त्या स्थूल आणि सूक्ष्म, असे कोणतेही कार्य उत्तम प्रकारे करू शकतात, हे लक्षात येते. यातून त्यांची उत्तम प्रकारे साधना झाल्याने त्या २० वर्षांच्या कालावधीत साधक, संत, सद्गुरु आणि आता सप्तर्षी यांनी नाडीपट्टीत सांगितल्याप्रमाणे ‘श्रीचित्शक्ति’, म्हणजे देवीस्वरूप या टप्प्यापर्यंत पोचल्या. ‘त्यांनी केलेल्या अनेकविध कार्यांची नोंद घ्यावी’, असे वाटले. त्याचा मी माझ्या परीने प्रयत्न केला आहे.
‘जाणूनी गुरूंचे मनोरथ’ याप्रमाणे सूक्ष्मातील कार्य करणार्या श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांचा आज वाढदिवस आहे. त्या निमित्ताने त्यांच्या चरणी कृतज्ञतापूर्वक नमस्कार !
१. बातम्या टंकलेखनासाठी वाचून सांगण्याची सेवा विचारपूर्वक करणे
जुलै २००० मध्ये सेवेला आरंभ केल्यावर त्यांनी दैनिक ‘सनातन प्रभात’साठी वार्ताहरांकडून लिखित स्वरूपात आलेल्या बातम्या टंकलेखन करणार्या साधकाला टंकलेखनासाठी वाचून सांगण्याची सेवा केली. ही सेवा करतांना ‘टंकलेखकाला शब्दांचे उच्चार कसे केले आणि शब्द किती गतीने सांगितले की, सोपे जाईल ?’, याचा विचार त्यांनी केला. तसेच ‘आपण सांगितलेले टंकलेखकाने योग्य टंकलिखित केले आहे ना ?’, हेही त्या पहात. त्यामुळे त्यांची सेवा परिपूर्ण होत असे. अशा प्रकारे ही सेवा त्यांनी ४ – ५ मास (महिने) केली.
२. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी सांगितल्याप्रमाणे शास्त्रीय संगीतातील मूलभूत गोष्टींचा अभ्यास वर्षभर करून त्याविषयी लिखाण करणे
डिसेंबर २००० मध्ये श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ पंडित भीमसेन जोशी यांच्या गायनाच्या कार्यक्रमाला गेल्या होत्या. त्याविषयी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांच्याकडे चौकशी केली. तेव्हा त्यांना कळले, ‘श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ शास्त्रीय संगीत शिकल्या आहेत.’ त्यानंतर सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी त्यांना शास्त्रीय संगीतातील मूलभूत गोष्टींचा अभ्यास करायला सांगितला, उदा. संगीतात ७ स्वरच का ? इत्यादी. यासाठी त्यांनी मिरज येथील ‘गंधर्व महाविद्यालया’त जाऊन ग्रंथ पडताळले. संगीत क्षेत्रातील संतांना भेटून त्यांच्याकडून माहिती घेतली. अशा प्रकारे त्या क्षेत्रात त्यांनी वर्षभर बराच अभ्यास करून आणि अनेक अनुभूती घेऊन त्याविषयी लिखाण केले. आता ते लिखाण ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’तील संगीत विभागातील साधकांना मार्गदर्शक ठरत आहे.
३. संगीतातील खरे स्वर गळ्यातून निघण्यासाठी अहं अल्प होणे आवश्यक असल्याचे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी सांगणे आणि त्याप्रमाणे श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांनी स्वयंपाकघरात तळमळीने सेवा करून दीड मासातच अहं न्यून करणे
शास्त्रीय संगीतातील अभ्यास चालू असतांना सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांना लक्षात आणून दिले की, शास्त्रीय संगीताची स्वतः गाऊन अनुभूती घेता येण्यासाठी स्वतःचा अहं न्यून असला पाहिजे, तरच खरे स्वर गळ्यातून निघतील. अहं-निर्मूलन प्रक्रिया होण्यासाठी आश्रमातील स्वयंपाकघरात शारीरिक सेवा करण्यास त्यांनी सुचवले. त्याप्रमाणे श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांनी मनोभावे आणि जसे स्वयंपाकघरातील साधिका सांगतील, त्याप्रमाणे एक-दीड मास सेवा केली. यामध्ये त्यांना बरेच काही शिकायला मिळाले. ते त्या वेळोवेळी लिहून ठेवत, तसेच सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनाही सांगत. अशा प्रकारे तळमळीने सेवा केल्याने त्यांचा अहं न्यून करण्याचा टप्पा दीड मासात पूर्ण झाला.
४. अहं-निर्मूलन प्रक्रियेतील स्वतःच्या अनुभवांवरून त्या विषयावर ग्रंथ लिहिणे
अहं-निर्मूलनासाठी स्वयंपाकघरात सेवा करतांना स्वतःचे मन आणि बुद्धी यांवर कशी प्रक्रिया झाली, काय काय शिकायला मिळाले, कोणत्या अनुभूती आल्या इत्यादींवर श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांनी बरेच लिखाण केले होते. त्यामुळे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी ती सूत्रे सर्वांनाच कळण्यासाठी त्यांना ‘अहं-निर्मूलन’ या विषयावर ग्रंथ लिहायला सांगितला. तो त्यांनी २ मासांमध्ये लिहून पूर्ण केला.
५. आश्रमात झालेल्या ‘हनुमत्कवच यज्ञां’साठी लागणारी सर्व व्यवस्था बघणे
वर्ष २००१ ते २००३ या कालावधीत आश्रमात ११ ‘हनुमत्कवच यज्ञ’ झाले. या यज्ञांसाठी सामुग्री, भांडीकुंडी, फुले, तोरणे, रांगोळी काढणे इत्यादींची व्यवस्था त्या अन्य साधकांसमवेत चोख पहात. त्यांनी केलेल्या सेवेमध्ये अन्य कुणाला बघावे लागत नसे.
६. श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांचा समष्टी दृष्टीकोन !
आश्रमातील साधकांची पहिली ते चौथी या इयत्तांतील ४ – ५ मुले होती. तसेच त्यांचीही मुलगी (आताच्या सौ. सायली सिद्धेश करंदीकर) त्याच वयोगटातील होती. त्या सर्वांची शाळा आश्रमाजवळ होती. ती सर्व मुले आश्रमात जेवून दुपारी शाळेत जायची आणि सायंकाळी शाळेतून आश्रमात परत यायची. श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांनी दायित्व घेऊन ‘त्या सर्व मुलांना शाळेत जायच्या आधी एकत्र जेवायला वाढायचे. जेवण झाल्यावर त्यांना शाळेचा पोशाख घालून शाळेत पाठवायचे आणि सायंकाळी शाळेतून परत आल्यावर त्यांना हात-पाय धुवायला सांगून न्याहारी द्यायची’, या सेवांची घडी बसवली. त्यानंतर प्रतिदिन एकेका पालकाला ही सेवा वाटून दिली. त्यामुळे अन्य पालकांना मुलांचे पहावे लागायचे नाही आणि आश्रमात सेवा करता यायची. अशा प्रकारे श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ असा समष्टी दृष्टीकोन ठेवून आश्रमात वावरत.
७. सलग १२ – १३ वर्षे ईश्वरी ज्ञान मिळवणे आणि त्यामध्येही पुढील पुढील टप्प्याला जाणे
श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांना वर्ष २००३ पासून ईश्वरी ज्ञान मिळू लागले. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले देतील त्या प्रश्नांची उत्तरे त्या लगेच मिळवत. ही सेवा त्या प्रतिदिन ८ – १० घंटे करत. त्यांच्या या ज्ञानावर आधारित सनातन संस्थेचे अनेक ग्रंथ प्रसिद्ध झाले आहेत. पहिले १ – २ वर्षे त्या मिळालेल्या ज्ञानाचे संकलन करत नव्हत्या. नंतर त्यांनी संकलन शिकून घेतले आणि संकलित केलेले ज्ञान त्या सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना पडताळायला देऊ लागल्या. त्यामुळे त्यांचा वेळ वाचू लागला. नंतर आणखी पुढचा टप्पा, म्हणजे ईश्वर त्यांना मथळ्यांसहित आणि व्यवस्थित संकलित केल्याप्रमाणेच मुद्देसूद ज्ञान देऊ लागला. ‘आपल्याला ज्ञान मिळते’, याचा त्यांना अहंकार नव्हता. त्यामुळे त्यांना ज्ञान मिळवतांना वाईट शक्तींचा त्रास फारसा झाला नाही आणि त्या ही सेवा अविरत १२ – १३ वर्षे करू शकल्या. नंतर त्या ज्ञान मिळवण्याच्या आणखी पुढील टप्प्याला, म्हणजे शब्दांच्या पलीकडे गेल्यामुळे त्यांची ही सेवा थांबली.
८. धार्मिक विधी, यज्ञ, दैवी घटना, वाईट शक्तींचे आक्रमण इत्यादींचे सूक्ष्म परीक्षण करणे
श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांच्यामध्ये एखाद्या प्रसंगाचे सूक्ष्म परीक्षण करण्याची क्षमताही निर्माण झाली. सूक्ष्म परीक्षण केल्याने ‘ती घटना का घडली ?’, याचा कार्यकारणभाव कळू लागला. एखादी घटना दैवी असेल, तर ‘त्यामुळे काय लाभ झाला ?’, तसेच वाईट शक्तींनी आक्रमण केले असेल, तर ‘त्यामागे त्यांचा उद्देश काय होता ?’, हे श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांना सूक्ष्म परीक्षणामुळे कळू लागले. हिंदु संस्कृतीमध्ये १६ संस्कार, धार्मिक विधी, यज्ञ इत्यादी अनेक गोष्टी आहेत. त्यांचेही सूक्ष्म परीक्षण श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांनी केले. सूक्ष्म परीक्षणासाठी समाजातील व्यक्तींकडे किंवा देवळात जातांना त्या सनातनचे ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने सोबत घेऊन जायच्या. त्यांचे महत्त्व सांगून त्यांद्वारेही त्या अध्यात्मप्रसार करायच्या.
९. साधकांसाठी आध्यात्मिक स्तरावर उपाय करणे
मध्यंतरीच्या काळात साधकांना होणारे वाईट शक्तींचे त्रास वाढले होते. त्यामुळे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांना साधकांसाठी नामजपाद्वारे आध्यात्मिक स्तरावरील उपाय करण्यास सांगितले. ही सेवाही त्यांनी परिणामकारक केली. त्यामध्ये त्यांनी नेत्र, तळहात, चरण यांच्या उपायांचा कसा परिणाम होतो, याचाही अभ्यास केला.
१०. देवतांचे नामजप, आरत्या इत्यादी स्वतःच्या आवाजात ध्वनीमुद्रित करण्याची सेवा न कंटाळता चिकाटीने पूर्ण करणे
श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ या संगीत क्षेत्रातील असल्याने सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी त्यांना देवतांचे नामजप, आरत्या इत्यादींचे स्वतःच्या आवाजात ध्वनीमुद्रण करायला सांगितले. तेव्हा आतासारखा ध्वनीमुद्रण करण्यासाठी ‘स्टुडिओ’ उपलब्ध नव्हता कि चांगली ध्वनीमुद्रण यंत्रणा नव्हती. असे असूनही त्यांनी पुष्कळ कष्ट घेऊन ३ – ४ मासांत ही सेवा पूर्ण केली. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी प्रत्येक नामजप योग्य आणि चैतन्यमय स्वरूपात ध्वनीमुद्रित होईपर्यंत पुनःपुन्हा ध्वनीमुद्रित करायला सांगितला, तरीही त्यांनी न कंटाळता चिकाटीने ती सेवा त्यांना अपेक्षित अशी पूर्ण केली. श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांनी ध्वनीमुद्रित केलेले नामजप, आरत्या यांचा साधकांना साधनेत बराच लाभ झाला.
११. अध्यात्मावर प्रवचन करणे
श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांनी गुरुपौर्णिमेनिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात ‘साधना’ या विषयावर ३ – ४ प्रवचनेही केली आहेत. समर्पक उदाहरणे देऊन सोप्या भाषेत विषय मांडणे, हे त्यांचे वैशिष्ट्य आहे. मुळातच गुरु आणि ईश्वर यांच्याप्रती भाव असल्याने त्यांचे बोलणे उत्स्फूर्त असे. त्यामुळे उपस्थित लोक न कंटाळता रस घेऊन विषय ऐकत. त्यांच्या अंतर्मनापर्यंत तो विषय जात असे. त्यामुळे प्रवचनानंतर लोक त्यांच्याशी बोलायला आतुर असत.
१२. साधकांचे सत्संग घेणे
श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ साधकांशी नेहमी मनमोकळेपणाने, कौटुंबिक पद्धतीने आणि जवळीकतेने बोलतात. त्यांची चौकशी करून त्यांना साहाय्य करतात. त्यामुळे त्यांनी साधकांना आपलेसे केले आहे. साधकही साधनेतील अडचणी त्यांना मनमोकळेपणाने सांगतात. यामुळे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांना साधकांचे सत्संग घेण्यास सांगितले होते. या सत्संगांचा साधकांना पुष्कळ लाभ झाला.
१३. सूक्ष्मातील प्रयोग घेणे
‘वाईट शक्तींचा त्रास असणार्या साधकांवर चांगल्या आणि वाईट स्पंदनांच्या वस्तूंचा कसा परिणाम होतो ?’, या संदर्भातील प्रयोग घेण्याचे दायित्व श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांच्याकडे होते. या प्रयोगांची आखणी करणे, प्रयोग झाल्यावर साधकांकडून त्या संदर्भातील लिखाण करवून घेणे, तसेच त्या प्रयोगांमधील स्वतःची निरीक्षणेही नोंद करणे, अशा सेवा त्या करत. ‘६० टक्के आणि त्याहून अधिक आध्यात्मिक पातळी प्राप्त केलेले साधक, संत यांच्या अस्तित्वाचा वाईट शक्तींचा त्रास असणार्या साधकांवर कसा परिणाम होतो ?’, याचेही त्यांनी अनेक प्रयोग घेतले. श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांना सूक्ष्मातील कळत असल्याने ‘या प्रयोगांमध्ये नेमका कसा परिणाम होत आहे ?’, याचे विश्लेषण त्या करत.
१४. साधकाची ६० टक्के पातळी किंवा संतत्व घोषित करणे, तसेच त्यांच्या मुलाखती घेणे
कार्यक्रमात साधकाची ६० टक्के पातळी झाल्याचे किंवा साधक संत पदावर पोचल्याचे घोषित करणे, हे जेवढे आनंददायी आहे, तेवढेच ते एखादे गुपित उलगडण्यासारखेही आहे. ही अत्यंत खुबीची आणि कलात्मक सेवा आहे. या कार्यक्रमाची रूपरेषा मांडणे, त्याप्रमाणे नियोजन करणे आणि प्रत्यक्ष कार्यक्रम करणे, हे सर्व दायित्व श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ या अगदी लीलया पार पाडत. ज्याचा कार्यक्रम आहे, त्या साधकाला प्रश्न विचारून त्याची गुणवैशिष्ट्ये प्रेक्षकांसमोर उलगडणे, हेही त्या अत्यंत सहजतेने आणि प्रेक्षकांना सहभागी करून करत. त्यामुळे सर्वांनाच आनंद मिळत असे. अशा प्रकारचे अनेक कार्यक्रम त्यांनी पार पाडले आणि प्रत्येक कार्यक्रम हा नाविन्यपूर्ण होता ! या कार्यक्रमाची रूपरेषा काढतांना श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांना सुंदर अशी काव्ये स्फुरत. यातून श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांच्या गुणांचेही दर्शन होत असे. अशाच प्रकारे त्या ६० टक्के पातळी गाठलेले साधक आणि संत यांच्या मुलाखती घेत.
१५. श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांनी गेली १० वर्षे भारतभर ८ – १० लाख किलोमीटर प्रवास करून भारताचा सांस्कृतिक ठेवा जतन करण्याच्या उद्देशाने बहुमूल्य अशी माहिती, तसेच संपर्क मिळवलेले असणे
श्रीचित्शक्ति (साै.) गाडगीळ यांच्या मनामध्ये ‘आपले मठ, मंदिरे, तीर्थक्षेत्रे, संतक्षेत्रे इत्यादी ठिकाणचा संस्कृतिक ठेवा जतन करायला हवा’, ही पुष्कळ तळमळ आहे. या उद्देशाने त्या चित्रीकरण करणार्या ३ – ४ साधकांना बरोबर घेऊन आरंभी संपूर्ण महाराष्ट्र फिरल्या. एखाद्या बाईने दायित्व घेऊन ठिकठिकाणी फिरणे, हे अत्यंत धाडसाचे आहे; पण गुरूंवर पूर्ण श्रद्धा ठेवून त्या फिरल्या. चित्रीकरण, संशोधन, मुलाखत यांसाठी सहजासहजी कुणी अनुमती देत नाही; पण श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ जेथे जातील, तेथे लोकांना, संतांना आपलेसे करत. त्यामुळे सर्वजण मोकळेपणाने आपल्याकडे जे आहे, ते खुले करून देत, तसेच स्वतःकडील मौल्यवान वस्तूही देत. श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांच्या या सेवेमुळे बर्याच ठिकाणचे मान्यवर, संत यांच्याशी जवळीक झाली आणि ते सनातन संस्थेच्या कार्याशी, तसेच हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या कार्याशी जोडले गेले. महाराष्ट्रभर फिरल्यानंतर त्या कर्नाटकात फिरल्या आणि त्यानंतर भारतभरही फिरल्या. ही सेवा त्या गेली १० वर्षे करत आहेत आणि ८ – १० लाख किलोमीटचा प्रवास त्यांनी करून बहुमूल्य अशी माहिती, तसेच संपर्क मिळवले आहेत.
१६. संशोधन, अध्यात्म, लोककला, संगीत, स्थापत्यशास्त्र, इतिहास अशा अनेक क्षेत्रांतील मान्यवर आणि संत यांच्या मुलाखती श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांनी घेतलेल्या असणे
श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांच्यामध्ये जिज्ञासा आणि शिकण्याची वृत्ती असल्याने त्या वैज्ञानिक प्रयोगांसाठी ठिकठिकाणच्या वस्तू, माती आणि पाणी जमा करतात. त्या ठिकाणची छायाचित्रे काढतात. एवढेच नव्हे, तर त्या काही ठिकाणच्या वैज्ञानिकांनाही भेटतात, तसेच त्यांनी आतापर्यंत अध्यात्म, लोककला, संगीत, स्थापत्यशास्त्र, इतिहास अशा अनेक क्षेत्रांतील मान्यवर आणि संत यांना भेटून त्यांच्या मुलाखती घेतल्या आहेत.
१७. अनेक ऋषींनी लिहिलेल्या नाडीपट्ट्यांचा अभ्यास करणे आणि त्यामुळे ‘सप्तर्षी जीवनाडीपट्टी’द्वारे माहिती सांगणारे पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांची भेट होणे
अनेक ऋषींनी सहस्रो वर्षांपूर्वी ताडपत्र्यांवर पृथ्वीवरील मानवांचे भविष्य लिहिले आहे. या बहुतांश नाडीपट्ट्यांची केंद्रे तमिळनाडूतील वैदीश्वरन् येथे आहेत. वर्ष २०१५ मध्ये श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांनी तेथे २ – ३ मास राहून या नाडीपट्ट्यांची माहिती आणि वैशिष्ट्ये मिळवली. त्यामुळे त्यांना मे २०१५ मध्ये सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले आणि त्यांचे हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचे कार्य यांची ‘सप्तर्षी जीवनाडीपट्टी’द्वारे माहिती सांगणारे पू. डॉ. ॐ उलगनाथन् भेटले. त्यांच्याकडून ‘हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी आणखी काय प्रयत्न करायला हवेत ?’ याचीही माहिती नाडीपट्टी वाचनाद्वारे वेळोवेळी मिळत आहे.
१८. सप्तर्षी नाडीपट्ट्यांमध्ये सांगत असल्याप्रमाणे खडतर प्रवास करून त्यांचे केलेले आज्ञापालन आणि त्यांच्याप्रती ठेवलेला उत्कट भाव यांमुळे श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांनी सप्तर्षींचे मन जिंकले असणे
मे २०१५ पासून गेली ८ वर्षे श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ या हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांच्या माध्यमातून सप्तर्षी सांगत असल्याप्रमाणे भारतातील विविध मंदिरे, तीर्थक्षेत्रे, मठ इत्यादी ठिकाणी दैवी दौरा करत आहेत. कधी कधी ही ठिकाणे उंच पर्वतांवरही असतात किंवा अती थंड ठिकाणीही असतात. थंडी, वारा, पाऊस आणि ऊन अशा विविध हवामानांत प्रवास करावा लागतो. हे खडतर प्रवास म्हणजे एक प्रकारे सप्तर्षींनी घेतलेली परीक्षाच असते, तरीही श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ या सप्तर्षींचे पूर्ण आज्ञापालन करतात. त्यांचे १०० टक्के आज्ञापालन आणि त्यांच्याप्रती उत्कट भाव यांमुळे त्यांनी सप्तर्षींचे मन जिंकले आहे. याविषयी सप्तर्षी श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांचे वेळोवेळी कौतुक करतात.
गेली २३ वर्षे अशा अनेकविध सेवा उत्कृष्टपणे करून साधनेत आध्यात्मिक उन्नती केलेल्या, एवढेच नव्हे, तर अवतारत्व प्राप्त केलेल्या (देवीस्वरूप ‘श्रीचित्शक्ति’ या पदाला पोचलेल्या) सौ. अंजली गाडगीळ यांचे कार्य अद्वितीय आणि दैवी आहे. त्यांच्यासारख्या त्याच आहेत ! त्यामुळे त्यांच्या चरणी, तसेच सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या चरणी ही शब्दसुमने अर्पण करून या लेखाला विराम देतो.’
– (सद्गुरु) डॉ. मुकुल गाडगीळ, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (७.१२.२०२३)
|