बिहारमधील ‘यू ट्यूबर’ मनीष कश्यप यांची बिहारच्या कारागृहातून ९ मासांनी जामिनावर सुटका झाली. त्यांना कारागृहाबाहेर भेटण्यासाठी त्यांच्या चाहत्यांनी पुष्कळ गर्दी केली होती आणि त्यांना हार घालून घोषणा देत त्यांची मिरवणूक काढली. बिहारचा ‘भावी नेता’ म्हणून त्यांचे सामाजिक माध्यमांतून कौतुक करण्यात आले. अशा प्रकारे कश्यप हे बिहारमधील लोकप्रिय व्यक्तीमत्त्वांपैकी एक बनत चालले आहेत. मनीष कश्यप ‘यू ट्यूबर’ म्हणून प्रसिद्ध असले, तरी ते पत्रकार आणि ‘सन ऑफ बिहार’ (बिहारचा मुलगा) म्हणून प्रसिद्ध आहेत. बिहारच्या अनेक सामाजिक, राजकीय समस्या त्यांनी त्यांच्या यू ट्यूब वाहिनीवरून मांडल्या आहेत. त्यांच्या यू ट्यूब वाहिनीचे ७० लाखांहून अधिक दर्शक आहेत. यावरून त्यांची लोकप्रियता किती असेल ? याची कल्पना येईल.
मनीष कश्यप यांच्या पार्श्वभूमीचा विचार करता त्यांनी पुण्यामध्ये अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण करून काही काळ नोकरी केली. त्यानंतर यू ट्यूबच्या माध्यमातून सामाजिक प्रश्नांवर प्रबोधनात्मक व्हिडिओ प्रसारित करून चांगला नावलौकिक मिळवला. त्यामुळेच त्यांना सामाजिक माध्यमांतून लोकांचा चांगला पाठिंबा मिळाला आहे. अल्प वयामध्ये त्यांनी यू ट्यूबवर लाखो दर्शक मिळवणे, म्हणजे यातून त्यांचे सामाजिक कार्य लोकांना भावले, हे लक्षात येते. ‘त्यांच्यासारख्या शिक्षित व्यक्तीने बिहारची स्थिती सुधारण्यासाठी पुढाकार घ्यावा, बिहारचे नेतृत्व करावे’, असाच लोकांचा सूर आहे. यातील उल्लेखनीय गोष्टी म्हणजे काही ठिकाणी शेतकर्यांच्या समस्यांचे व्हिडिओ बनवत असतांना त्यांनी शेतकर्यांना त्यांच्या क्षमतेनुसार थेट आर्थिक साहाय्यही केले आहे. सामाजिक जाणीव असलेली व्यक्तीच असे करू शकते.
बिहार येथे अनेक कंस !
मनीष कश्यप हे कारागृहात जाण्याचे निमित्त होते की, तमिळनाडू येथे बिहारच्या कामगारांना मारहाण झाल्याचे काही व्हिडिओ त्यांनी त्यांच्या यू ट्यूब वाहिनीवरून प्रसारित केले. हे ‘व्हिडिओ’ खोटे असल्याचा तमिळनाडू पोलिसांनी दावा करत त्यांच्यावर गुन्हा नोंदवला. त्याच वेळी बिहारच्या पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध राज्यात काही गुन्हे नोंद केले. हे गुन्हे एक लोकप्रतिनिधी आणि एक अधिकोष व्यवस्थापक यांना मारहाणीच्या संदर्भात होते. त्यामुळे ते बिहार पोलिसांच्या कारागृहात होते. मनीष कश्यप यांचा दावा होता की, त्यांच्यावर खोटे गुन्हे नोंदवण्यात आले. त्यांच्यावर ‘राष्ट्रीय सुरक्षा कायद्या’च्या अंतर्गत गुन्हे नोंदवून त्यांना आतंकवाद्यासारखी वागणूक देण्यात आली. बिहारमध्ये कंसाचे सरकार आहे. सध्या अनेक कंस कार्यरत आहेत. बिहारची दु:स्थिती मी मांडत असल्याने माझ्यावर असे गुन्हे नोंद करून माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला.
बिहारचे जंगलराज !
बिहारविषयी अनेकांना माहिती आहे की, तेथील ‘जंगलराज’ अजून संपलेले नाही. काही दिवसांपूर्वी तेथील महिला प्रशासकीय अधिकारी वाळू तस्करी राेखण्यास गेल्यावर जमावाकडून पुष्कळ मारहाण करण्यात आली. बिहार येथेच एका मंदिराच्या पुजार्याची अत्यंत निर्घृण पद्धतीने हत्या करण्यात आली. धर्मांधांकडून हिंदूंवर अत्याचार होण्याच्या घटना तेथे घडत असतात. एका प्राचीन मंदिरात अनेक वर्षांपासून चालू असलेल्या बळी देण्याच्या प्रथेविरुद्ध तेथील प्रशासनाने तडकाफडकी बंदी घातली होती. असे एक ना अनेक प्रकार तेथे लक्षात येतात. चारा घोटाळ्यात शिक्षा झालेले लालूप्रसाद यादव यांच्या मुलांपैकी तेजस्वी यादव आणि भाजपला धक्का देऊन सरकार बनवणारे नितीशकुमार यांचे संयुक्त सरकार बिहार येथे आहे. त्यामुळे प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष लालूप्रसाद यांचे अस्तित्व बिहार येथे आहेच. ‘जब तक समोसे मे रहेगा आलू, तब तक बिहार मे चलेगा लालू’ (जोपर्यंत समोशात बटाटा आहे, तोपर्यंत बिहारमध्ये लालू असणार) असे गमतीत म्हटले जाते. लालूप्रसाद यांचा कार्यकाळ, म्हणजे जंगलराजचा भयंकर काळ होता, त्याची परंपरा त्यांच्या वारसांकडून चालूच आहे, हे येथे सांगायचे आहे.
मनीष कश्यप यांनी कारागृहाबाहेर आल्यावर ‘मी पत्रकार असून माझे लोकांना जागृत करण्याचे कार्य कुणाला न घाबरता चालूच ठेवणार आहे’, असे सांगितले. यातून ‘ते पत्रकारिता क्षेत्रात अजूनही कार्यरत रहातील आणि अधिक त्वेषाने कार्य करतील’, असे त्यांनी सुचवले आहे. बिहारसारख्या सामाजिक, राजकीय वातावरण वाईट असणार्या आणि गुन्हे घडणार्या राज्याची स्थिती चांगली होण्यासाठी तिथे नैतिकता अन् इच्छाशक्ती असणार्या नेतृत्वाची आवश्यकता आहे, तसेच समाजभान जपणार्या पत्रकारांचीही आवश्यकता आहे. ‘जंगलराज’ विरुद्ध आवाज उठवणे, म्हणजे मृत्यूला निमंत्रणच ! राजद आणि जनता दल यांचे सरकार हे धर्मांधांचा अनुनय करणारे आणि भ्रष्टाचारावर नियंत्रण आणू न शकणारे आहे. कश्यप यांनी सांगितले की, निवडणुकांच्या वेळी कुणी नेता घर, रस्ता अथवा नोकरी देण्याचे आश्वासन देतात; मात्र निवडून आल्यावर ते काम करत नाहीत, तर तोही मोठा गुन्हा समजून त्यांच्यावर कारवाई का करण्यात येत नाही ? डोंगर फोडून रस्ता बनवणार्या दशरथ मांझी यांच्या कुटुंबाला अद्यापही सरकारने दिलेले आश्वासन पूर्ण केलेले नाही, असे शेकडो जण बिहारमध्ये आहेत. त्यामुळे भ्रष्टाचाररूपी डोंगर कितीही मोठा असला, तरी तो धुळीस मिळवण्यात येईल. भ्रष्टाचार नष्ट करण्यासाठी कारागृहाबाहेर आल्यावरच निश्चय करणारे असे विरळाच ! भ्रष्टाचार, जंगलराज संपवण्यासाठी प्रखर राष्ट्रप्रेम, समाजप्रेम आणि इच्छाशक्ती असणार्यांची आवश्यकता आहे. प्रशासकीय व्यवस्थेतील भ्रष्टाचार संपवला, तर सामाजिक जीवनमान आपोआप उंचावेल. बिहारसारख्या राज्यात मनीष कश्यप यांच्यासारखे तरुण पत्रकार हे आशेचा किरण आहेत. असे अनेक मनीष कश्यप सिद्ध होऊन भ्रष्टाचार निर्मूलनाला वेग येणे आवश्यक !
भ्रष्टाचारविरोधी कार्यरत पत्रकाराच्या पाठीशी उभी राहणारी जनताच त्याविरुद्धचे षड्यंत्र हाणून पाडते, ही भ्रष्टाचार्यांना चपराक ! |