निर्मळ मन आणि सेवेची तळमळ असणारे चि. भूपेंद्र देशपांडे अन् प्रेमभाव आणि उत्तम नियोजनकौशल्य असलेल्या चि.सौ.कां. श्वेता पट्टणशेट्टी !

चि. भूपेंद्र देशपांडे यांची कुटुंबीय आणि साधक यांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये

१. कु. रागेश्री देशपांडे (चि. भूपेंद्र यांची धाकटी बहीण), नाशिक

१ अ. काटकसरीपणा : ‘आपल्याला मिळालेली प्रत्येक वस्तू हे गुरूंचे धन आहे’, असा भूपेंद्रदादाचा भाव असतो. त्यामुळे तो प्रत्येक वस्तू काटकसरीने वापरतो.

१ आ. निर्मळ मन : ‘इतरांना काय वाटेल ? इतर काय म्हणतील ?’, असा विचार त्याच्या मनात कधीच नसतो. त्यामुळे त्याच्या वागण्यात दिखाऊपणा नसतो. त्याच्यात निर्मळता जाणवते.

१ इ. अल्प अहं असणे 

१. तो सर्व प्रकारची कामे करतो. त्याला कोणतेही काम करण्यात न्यूनता वाटत नाही. आईला वयोमानामुळे एकटीला सर्व घरकाम करणे अवघड होते. दादा आईला सर्व कामांत साहाय्य करतो.

२. घराचे बांधकाम चालू असतांना कामगारांना वाळू चाळण्यापासून विटा वहाण्यापर्यंत सर्व साहाय्य त्याने स्वतःहून केले. तेव्हा त्या कामगारांना आश्चर्य वाटायचे आणि दादाविषयी आपुलकी वाटायची.

१ ई. भाव : दादाच्या मनात प.पू. गुरुदेव, श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ, सद्गुरु नंदकुमार जाधवकाका यांच्याप्रती पुष्कळ भाव आहे. कधी कधी ते स्वप्नात आल्यावर स्वप्नातच दादाची भावजागृती होते आणि त्याच्या डोळ्यांतून भावाश्रू येतात.’

२. साधकांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये

२ अ. डॉ. (सौ.) तेजस्विनी मंगेश पांडे, नांदेड

१. ‘कोरोना काळात ‘प्रथमोपचार’ या उपक्रमाच्या अंतर्गत दादांची माझ्याशी ओळख झाली. त्या वेळी ‘विषय शांतपणे समजून घेणे, प्रश्न असेल, तर लगेच विचारणे’, असे त्यांच्यातील अनेक गुण माझ्या लक्षात आले.

२. त्यांच्या प्रत्येक कृतीतून निरागसपणा जाणवतो.

३. शिकण्याची इच्छा आणि आवड असल्याने दादांनी संगीतातील ज्ञान संपादन केले आहे.

४. सेवा करतांना ‘गुरुदेव सर्व करून घेतात’, असा त्यांचा भाव असतो.’

२ आ. सौ. शांती अर्जुनदास दादवाणी, नांदेड

२ आ १. सेवेची तळमळ : ‘एकदा एका शाळेत राष्ट्रपुरुषांच्या भित्तीपत्रकांचे प्रदर्शन लावण्याच्या सेवेला भूपेंद्रदादा आले होते. प्रदर्शन सकाळपासून सायंकाळपर्यंत होते. एकेका वर्गातील विद्यार्थ्यांना प्रदर्शन पहायला बोलावून १० मिनिटांत राष्ट्रपुरुषांची माहिती देण्याची सेवा त्यांनी दिवसभर अत्यंत उत्साहाने केली.’

२ इ. सौ. कल्पना अमोल गडम, परभणी

२ इ १. ‘दादा सतत आनंदी आणि हसतमुख असतात.

२ इ २. दादा गुरुपौर्णिमेच्या वेळी उत्तरदायी साधकांनी सांगितलेली सेवा तत्परतेने आणि भावपूर्ण करण्याचा प्रयत्न करतात, तसेच ते इतर सेवांतील साधकांनाही साहाय्य करतात.

२ इ ३. आश्रम आणि साधक यांच्याप्रतीचा भाव

अ. त्यांना सेवा करण्यासाठी देवद आश्रमात जाण्याची इच्छा होती. त्यांच्या तळमळीमुळे त्यांना आश्रमात जाण्याची संधी मिळाली; परंतु तेथे जाण्यासाठी त्यांना अनेक अडचणी आल्या. त्या वेळी परिस्थितीवर मात करून ते आनंदाने सेवेसाठी आश्रमात गेले.

आ. त्यांना आश्रमात साधकांसाठी खाऊ घेऊन जायचे होते. त्यांनी तो खाऊ स्वतः बनवून घेतला. ‘सर्वांना तो अधिक चांगला मिळावा’, या उद्देशाने तो खाऊ त्यांनी व्यवस्थित ‘पॅकिंग’ करून आणला.

इ. देवद आश्रमात आल्यावर त्यांना स्वयंपाकघरात सेवा मिळाली. ती त्यांनी लगेच आनंदाने स्वीकारली. भांडी घासण्याची सेवा करत असतांना त्यांना थकवा आला, तरी ती सेवा ते आनंदाने करत होते.’

२ ई. श्री. शांताराम बेदरकर (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के, वय ४२ वर्षे), नांदेड

२ ई १. प्रेमाने काळजी घेणे

अ. ‘जेव्हा मी दादांच्या घरी जातो, तेव्हा दादा माझी विचारपूस करतात. ‘मी सकाळी काहीच खात नाही’, हे त्यांना ठाऊक आहे. त्यांनी त्यांच्या आईलाही सांगून ठेवले आहे, ‘‘शांतारामदादाला खायला दे. तो सकाळपासून उपाशीच असतो.’’

आ. एकदा माझ्या पायात काचेचा तुकडा घुसला होता आणि पायातून रक्त वहात होते. तेव्हा दादांनी माझ्या पायाला मलमपट्टी (ड्रेसिंग) केली.’

२ उ. श्रीमती अनिता सुरेंद्रपाल बरारा (वय ७० वर्षे, आध्यात्मिक पातळी ६९ टक्के), नांदेड

१. ‘दादा सर्वांशी नम्रतेने बोलतात.

२. त्यांना भावजागृतीचा प्रयोग घेण्यास सांगितले, तर दादा तो प्रयोग अत्यंत भावपूर्ण घेतात. ते कधी कधी गुरुदेवांचे भक्तीगीतही गातात. त्या वेळी सर्वांचा भाव जागृत होतो.’

चि.सौ.कां. श्वेता पट्टणशेट्टी यांची कुटुंबीय आणि साधक यांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये

१. कुटुंबियांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये

१ अ. श्री. चंद्रशेखर पट्टणशेट्टी (चि.सौ.कां. श्वेता यांचे वडील, आध्यात्मिक पातळी ६७ टक्के) आणि सौ. कस्तुरी पट्टणशेट्टी (आई, आध्यात्मिक पातळी ६६ टक्के), सनातन आश्रम, देवद, पनवेल.

१ अ १. लहानपणापासून अध्यात्माची आवड असणे : ‘श्वेता लहानपणी प.पू. कलावतीआईंच्या भजनाला आणि बालोपासनेला नियमितपणे जायची. ती संध्याकाळी देवापुढे ‘शुभं करोति, मारुतिस्तोत्र, गणपतिस्तोत्र आणि संत तुकाराम महाराजांचे १२ अभंग’ म्हणत असे. तिने म्हटलेली भजने ऐकतांना चांगले वाटायचे. यासाठी शेजारचे लोक तिचे कौतुक करायचे. सांगली येथील पू. कोटणीस महाराज, पू. केळकर महाराज, प.पू. कलावतीआई या सर्व संप्रदायांच्या माध्यमातून साधना करत करत वयाच्या १६ व्या वर्षी ती सनातन संस्थेच्या माध्यमातून साधना करू लागली.

१ अ २. नोकरीला प्राधान्य न देता पूर्णवेळ साधना करण्याचा निर्णय घेणे : त्यानंतर ती संस्थेच्या सत्संगाला नियमितपणे जाऊ लागली. तिने सेवा करत शिक्षण पूर्ण केले. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नोकरीला प्राधान्य न देता तिने मिरज येथील सनातनच्या आश्रमात पूर्णवेळ साधना करण्याचा निर्णय घेतला.

१ अ ३. प्रेमभाव : मी (वडील, श्री. चंद्रशेखर पट्टणशेट्टी) वर्ष २०२१ मध्ये रुग्णाईत असतांना तिने माझी लहान बाळाप्रमाणे सेवाशुश्रूषा केली. मला आध्यात्मिक त्रास होत असतांना ती तत्परतेने सद्गुरु राजेंद्र शिंदे यांना नामजपादी उपाय विचारत असे आणि मला ते उपाय करायला सांगत असे.

१ अ ४. जवळीक साधणे : समाजातील हिंदुत्वनिष्ठ, प्रतिष्ठित व्यक्ती, सत्संगातील साधक आणि कुटुंबीय यांच्याशी जवळीक साधून अन् त्यांना आध्यात्मिक दृष्टीकोन देऊन ती त्यांना साधनेत आणते.

१ अ ५. ती आम्हाला आमच्या चुका स्पष्टपणे सांगून साधनेचे दृष्टीकोन देते.

१ अ ६. स्वयंपाकापासून अध्यात्मप्रसारापर्यंत सर्व प्रकारच्या अनेक सेवा तिने कौशल्याने केल्या आहेत.’

१ आ. सौ. शैलजा शैलेश कट्टी (चि.सौ.कां. श्वेता यांची मोठी बहीण), पलूस, जिल्हा सांगली.

१. ‘श्वेताला लहानपणापासूनच मायेची ओढ अल्प आहे.

१ इ. सौ. संगीता बसवराज पट्टणशेट्टी (चि.सौ.कां. श्वेता यांची मावशी), जत, जिल्हा सांगली.

१ इ १. अडचणींवर मात करण्याविषयी श्वेताने सांगितलेली सूत्रे अंतर्मनापर्यंत पोचून तशी कृती होणे : ‘जेव्हा मी साधनेला आरंभ केला, तेव्हा मला पुष्कळ त्रास होते. मला पुष्कळ अडचणीही येत होत्या. मी श्वेताला याविषयी विचारल्यावर ती मला तत्त्वनिष्ठपणे अडचणींवर मात करण्यास सांगत असे. तेव्हा तिने सांगितलेली सर्व सूत्रे माझ्या अंतर्मनापर्यंत पोचून माझ्याकडून तशी कृती होत होती. त्यामुळे माझ्या साधनेत वाढ झाली.’

१ ई. कु. रागेश्री देशपांडे (चि.सौ.कां. श्वेता यांची भावी नणंद), नाशिक

१ ई १. प्रेमभाव : ‘श्वेताच्या रूपात देवाने मला एक चांगली मैत्रीण दिली. श्वेताने कधी कुणाला दुखावले किंवा ती कुणाशी कधी प्रतिक्रियात्मक बोलली’, असे झाले नाही. तिच्यातील प्रेमभावामुळे तिच्या सहवासात आनंद जाणवतो. तिच्या समवेत सेवा करतांना कधीच ताण आणि दडपण येत नाही.

१ ई २. सकारात्मक : ती सतत सकारात्मक असते. तिच्याशी बोलल्यानंतर माझे मन सकारात्मक होते.

१ ई ३. इतरांशी जुळवून घेणे : तिची इतरांना हाताळण्याची, तसेच इतरांची प्रकृती समजून घेण्याची क्षमता चांगली आहे. त्यामुळे ती सगळ्यांशी सहजतेने जुळवून घेते. समोरच्या साधकांची स्थिती अन् अडचणी समजून घेऊन त्यानुसार ती साधकांना हाताळते.

१ ई ४. गुरुसेवेची तळमळ : नवरात्रीच्या कालावधीत ९ दिवस तालुक्यांच्या ठिकाणी मोठ्या ग्रंथप्रदर्शनाच्या सेवेचे आयोजन तिच्याकडे होते. तिथे प्रतिकूल परिस्थितीतही तिने साधकांना प्रोत्साहन देऊन ग्रंथांच्या वितरणाचे चांगले प्रयत्न केले. तिच्या तळमळीमुळे त्या ठिकाणी ग्रंथांचे वितरण मोठ्या प्रमाणावर झाले. ‘गुरूंचे ग्रंथरूपी ज्ञान अधिकाधिक लोकांपर्यंत पोचावे’, अशी तिची तळमळ असायची.

१ ई ५. सेवा करतांना कार्यापेक्षा ‘साधक, साधकांची साधना आणि साधक घडणे’, हा तिचा केंद्रबिंदू असतो.’

२. साधकांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये

२ अ. कु. भावना कदम, नंदुरबार

१. ‘कितीही सेवा असली, तरी ताई व्यष्टी साधनेचे प्रयत्न गांभीर्याने करते.’

२ आ. सौ. कल्पना अमोल गडम, परभणी

२ आ १. प्रेमभाव : ‘वर्ष २०१७ मध्ये मी देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमात सेवेसाठी गेले होते. तेव्हा एका सेवेनिमित्त मी ताईच्या संपर्कात आले. त्या वेळी ती मला प्रेमाने सेवा समजावून सांगत होती. तेव्हा ‘मी तिला पहिल्यांदाच भेटत आहे’, असे मला वाटले नाही. ‘आपणही प्रत्येकाशी प्रेमाने कसे वागायला हवे ?’, हे मला शिकायला मिळाले.’

२ इ. सौ. वनिता पाटील, नंदुरबार

१. ‘काही वेळा पुष्कळ सेवा एकाच वेळी आल्याने मला ताण येत असे. तेव्हा ताई मला ‘आध्यात्मिक स्तरावर कसे प्रयत्न करायचे ? आणि सेवा अधिक परिपूर्ण आणि ताण न येता कशी केली पाहिजे ?’, हे चांगल्या प्रकारे समजावून सांगत असे.

२. संतसेवा करतांना ‘आपण गुरुमाऊलींची सेवा करत आहोत’, असा भाव ठेवूया’, असे ती साधकांना सांगत असे आणि त्यांच्याकडून तसे प्रयत्न करून घेत असे.’

२ ई. सौ. मीनाक्षी पाटील (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के, वय ४२ वर्षे), जामनेर, जिल्हा जळगाव.

२ ई १. साधकांना साधनेत साहाय्य करणे : ‘ताई साधकांच्या व्यष्टी साधनेचा आढावा घेते. आढाव्यात एखाद्या साधकाने चूक सांगितल्यास ताई साधकाला त्या चुकीच्या मुळाशी जाण्यास शिकवते. त्यातून इतर साधकांनाही शिकायला मिळते. ‘व्यष्टी साधनेचे प्रयत्न परिपूर्ण कसे होतील ?’, यासाठी ताई नेमकेपणाने उपाययोजना सांगते. ताई जेव्हा चुकांवर दृष्टीकोन देतो, तेव्हा ‘ताई, म्हणजे आमची आध्यात्मिक आईच आहे’, असे मला वाटते.’

२ उ. सौ. पिंकी माहेश्वरी (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के, वय ४४ वर्षे), ब्रह्मपूर, मध्यप्रदेश.

२ उ १. परिस्थिती स्वीकारणे : ‘एकदा ब्रह्मपूरहून जळगावला जाताना श्वेताताई चुकीच्या आगागाडीत बसली होती; परंतु जेव्हा मी तिला भ्रमणभाष लावला, तेव्हा तिच्या मनाची स्थिती पुष्कळच शांत आणि स्थिर होती. गुर्वेच्छा समजून तिने तो प्रसंग स्वीकारला.

२ उ २. ती सतत शिकण्याच्या स्थितीत रहाते. ती साधकांना साधना करण्यासाठी प्रोत्साहन देते.’

२ ऊ. सौ. क्षिप्रा प्रशांत जुवेकर (वय ३९ वर्षे, आध्यात्मिक पातळी ६४ टक्के), जळगाव

२ ऊ १. जळगावमधील अध्यात्मप्रसाराच्या सेवेची घडी बसवण्यासाठी प्रयत्न करणे : ‘जळगाव जिल्ह्यात सनातनच्या अध्यात्मप्रसाराच्या कार्याला जिज्ञासूंचा प्रतिसाद पुष्कळ चांगला आहे; परंतु प्रसाराच्या सेवेची घडी नीट न बसल्यामुळे अपेक्षित तशी फलनिष्पत्ती मिळत नव्हती. जळगावमध्ये आल्यापासून श्वेताताईने प्रसाराच्या सेवेची घडी नीट बसवण्यास आरंभ केला. त्यासाठी तिने ‘सत्संग घेणे, साधकांना भेटून त्यांच्या अडचणी सोडवणे’, असे प्रयत्न केले. त्यामुळे साधकांचा सेवेतील सहभाग वाढला.

२ ऊ २. साधकांच्या अडचणी समजून त्यांना कृतीशील बनवणे : जिल्ह्यातील काही साधक पूर्वी कृतीशील होते; परंतु कोरोना महामारीच्या काळानंतर त्यांच्या वैयक्तिक अडचणींमुळे त्यांचा सेवेतील सहभाग अत्यल्प झाला होता. श्वेताताईने ‘अशा साधकांच्या घरी जाणे, त्यांना सेवा देणे’, असे प्रयत्न केले. त्यामुळे त्या साधकांनाही ताईचा आधार वाटू लागला.

२ ए. नियोजनकौशल्य

२ ए १. अल्प कालावधीत प्रसाराविषयीचे मोठे उपक्रम राबवणे : मागील वर्षी जळगावमध्ये प्रसाराविषयीचे अनेक मोठे उपक्रम अल्प कालावधीत राबवण्यात आले. पूर्वी आम्हाला असे मोठे उपक्रम एकाच वेळी राबवता येणे शक्य होत नव्हते. ताई जळगावमध्ये आल्यापासून आम्हाला तिचा आधार वाटतो आणि एकाच वेळी आम्ही अनेक मोठे उपक्रम राबवू शकतो.

२ ए २. ताई इतर साधकांना सेवा शिकवण्याच्या दृष्टीने प्रयत्न करते. त्यामुळे काही साधक सेवा करण्यासाठी सिद्ध होत आहेत.

२ ए ३. युवा साधकांची क्षमता ओळखून ताई त्यांना विविध सेवा देते. त्यामुळे आता युवा साधकही कृतीशील होत आहेत.’

(सर्व सूत्रांचा दिनांक : ८.१२.२०२३)