‘वर्ष २०२३ मध्ये रामनाथी (गोवा) येथे झालेल्या ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’निमित्त मला सेवेची संधी मिळाली. या कालावधीत मला आलेल्या अनुभूती आणि शिकायला मिळालेली सूत्रे येथे दिली आहेत.
१. धर्मध्वजपूजन होत असतांना ‘श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ महालक्ष्मी असून सद्गुरु स्वाती खाडये दुर्गादेवी आहेत’, असे जाणवणे अन् भावजागृती होणे
‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’निमित्त महर्षींच्या आज्ञेने रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्या हस्ते धर्मध्वजपूजन झाले. तेव्हा ‘त्या साक्षात् महालक्ष्मी आहेत’, असे मला जाणवले. त्यांचे तेज पाहून माझे मन भारावून गेले. तेथे संत आणि सद्गुरु उपस्थित होते. मी सद्गुरु स्वाती खाडये यांच्याकडे पाहिल्यावर त्या माझ्याकडे पाहून हसल्या. त्यांचे स्मितहास्य पाहून ‘साक्षात् दुर्गादेवी माझ्याकडे पहात आहे’ या कृतज्ञताभावाने माझे मन त्यांच्या चरणी नतमस्तक झाले. मला ईश्वराच्या सगुण रूपांचे दर्शन होत होते. माझी सतत भावजागृती होत होती. काही क्षण ‘मी वेगळ्याच दैवी विश्वात आहे’, असे मला जाणवले.
२. श्री भवानीदेवीचे दर्शन घेत असतांना ‘श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांचे दर्शन व्हावे’, असे वाटणे आणि त्या वेळी पू. (सौ.) उमा रवीचंद्रन् यांचे दर्शन झाल्यावर ‘देवीस्वरूप श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांचे दर्शन घेण्याची इच्छा देवीने स्थुलातून पूर्ण केली’, असे वाटून कृतज्ञताभाव दाटून येणे
एकदा मी श्री भवानीदेवीचे दर्शन घेत होते. त्या वेळी ‘देवीस्वरूप श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांचे मला दर्शन व्हावे’, असे वाटत होते. मी भवानीदेवीला भावपूर्ण नमस्कार करतांना माझ्या शेजारी पू. (सौ.) उमा रवीचंद्रन् (उमाक्का) आल्या. मला त्यांच्याकडे पाहून ‘देवीच आली आहे’, असे वाटले. मी त्यांना नमस्कार केला. मी त्यांना म्हणाले, ‘‘आज मला दोन देवींचे, म्हणजे भवानीदेवी आणि पू. (सौ.) उमाक्का यांचे दर्शन झाले.’’ तेव्हा त्यांनी माझ्या हाताला स्पर्श केला. ‘देवीने मला त्या दैवी स्पर्शातून भरभरून शक्ती आणि चैतन्य दिले. माझ्या मनातील देवीस्वरूप श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांचे दर्शन घेण्याची इच्छा देवीने स्थुलातून पूर्ण केली’, असे वाटून माझे मन कृतज्ञतेने भरून आले.
३. सनातनच्या संतांचा साधेपणा
पू. (सौ.) उमाक्का यांना अधिवेशन स्थळी जायचे होते. त्या आश्रमातून पायी निघाल्या होत्या. संत असूनही वेगळेपण न जपता त्या सर्वसामान्यांप्रमाणे चालत जात होत्या. त्या वेळी पाऊसही पडत होता. नंतर एका साधकाने त्यांना चारचाकी गाडीने अधिवेशन स्थळी पोचवले. धन्य ते सनातनचे संत आणि त्यांना घडवणारी गुरुमाऊली (परात्पर गुरु डॉ. आठवले) !
– सौ. स्नेहल केतन पाटील (आध्यात्मिक पातळी ६४ टक्के, वय २६ वर्षे), सिंहगड रस्ता, पुणे. (२४.६.२०२३)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |