डॉ. (सौ.) मिनू रतन यांची गुणवैशिष्ट्ये आणि  त्यांच्या ‘समुपदेशन’ (Counselling) याविषयी केलेल्या मार्गदर्शनानुसार साधकाने स्वतःच्या दोषांवर मात करण्यासाठी केलेले प्रयत्न !

‘२१ डिसेंबर २०२३ या दिवशीच्या अंकात आपण डॉ. (सौ.) मिनू रतन यांची गुणवैशिष्ट्ये आणि त्यांच्या मार्गदर्शनातील काही वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे पाहिली. या भागात आपण डॉ. (सौ.) मिनू यांच्या मार्गदर्शनामुळे झालेले लाभ आणि पू. वटकर यांच्यामध्ये झालेले पालट पहाणार आहोत.

पू. शिवाजी वटकर

लेखाचा भाग १ पाहण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/747593.html

३. डॉ. (सौ.) मिनू रतन यांनी शिकवलेल्या गोष्टीमुळे झालेले लाभ आणि स्वतःत झालेले पालट

डॉ. (सौ.) मिनू रतन

३ अ. संपर्काच्या समष्टी सेवेत साहाय्य होणे : माझ्याकडे निरनिराळ्या व्यक्तींचे निरनिराळ्या विषयांवरील शंका विचारण्यासाठी दूरभाष येत असतात. समुपदेशकाविषयीची सूत्रे शिकल्यामुळे मला निरनिराळ्या व्यक्तींशी सुसंवाद साधण्यास साहाय्य होऊ लागले आहे.

कुणी विरोधक, टीकाकार, धर्मांध, पोलीस किंवा आध्यात्मिक त्रास असलेल्या व्यक्तीचे ऐकून घेतांना आणि त्यांच्याशी संवाद साधतांना आता मला ताण येत नाही. तसेच भारतभरातील सनातनच्या प्रसारातील संबंधित साधकांशी सुसंवाद साधण्यास साहाय्य होत आहे.

३ आ. ऐकण्याची वृत्ती वाढणे : पूर्वी माझ्याकडे काही समस्या, अडचण किंवा सहज बोलण्यास कुणी आले असतांना मी त्यांचे म्हणणे पूर्ण होण्याच्या अगोदरच माझे मत सांगण्यास आरंभ करत असे. माझ्या अयोग्य वागण्याने त्यामध्ये वेळ आणि शक्ती खर्च होत असे. आता मी समोरील एका व्यक्तीचे किंवा सर्व व्यक्तींचे पूर्णपणे आणि काहीही प्रतिक्रिया व्यक्त न करता ऐकून घेतो. माझी ऐकण्याची क्षमता वाढवली आहे. त्यामुळे दुसर्‍याविषयी प्रतिक्रिया येण्याचे प्रमाण अल्प झाले आहे.

३ इ. व्यक्तीशी जवळीक साधली गेल्याने प्रेमभाव वृद्धींगत होणे : अपेक्षा न करता किंवा पूर्वग्रह न ठेवता समोरच्या व्यक्तीचे बोलणे, त्यांनी विचारलेले प्रश्न इत्यादी पूर्णपणे ऐकून घेतल्याने त्या संबंधित साधक, हिंदुत्वनिष्ठ, शंका विचारणारे यांचे मन हलके होते. ती व्यक्ती विश्वासाने माझ्याशी संवाद साधू शकते. त्यामुळे बोलता-बोलता त्या व्यक्तीशी जवळीक साधली जाते. त्यामुळे माझ्यात प्रेमभाव वृद्धींगत होत आहे.

३ ई. आत्मीयता वाढणे : दुसरा कुणी भावनावश होऊन, दुःखी होऊन किंवा रडत-रडत काही सांगत असेल, तर मीही भावनावश होऊन त्याला मित्राच्या नात्याने सहानुभूती दाखवत असे. याऐवजी ‘मी आत्मा आहे, त्याच्यातही आत्मा आहे आणि तो परमात्म्याशी जोडला आहे’, या दृष्टीने आत्मीयतेने माझ्याकडून ऐकले जाते. त्यामुळे आपुलकी आणि आत्मीयता वाढण्यास साहाय्य होत आहे.

३ उ. आध्यात्मिक दृष्टीकोन ठेवल्याने न्यूनगंड, नकारात्मकता आणि कर्तेपणा उणावणे : पूर्वी मला वाटायचे की, ‘मलाच इतक्या समस्या आहेत, तर मग मी दुसर्‍याच्या समस्या ऐकून त्याला काय साहाय्य करणार ?’, असा मला न्यूनगंड आणि नकारार्थी दृष्टी होती.

तसेच मला ‘मी दुसर्‍याच्या समस्या ऐकू शकतो आणि सोडवू शकतो’, असा कधी कधी कर्तेपणा होता; मात्र पुढीलप्रमाणे दृष्टीकोन ठेवल्याने माझ्यात सकारात्मक पालट जाणवत आहे. ‘स्वतःमध्ये पोकळी निर्माण करणे म्हणजे विष्णूसारखे शेषशायी होणे ! यामुळे चैतन्याच्या स्तरावर कार्य होते. साधना हाेण्यासाठी मन शांत आणि स्थिर झाले पाहिजे. आपण जेव्हा दुसर्‍याचे बोलणे मन लावून ऐकतो, तेव्हा आपण आतून शांत असतो. जेव्हा तुम्ही दुसर्‍याच्या स्थितीशी आणि विचाराशी समरस होता, तेव्हा तुम्हाला भगवंताकडून योग्य मार्गदर्शन मिळते. जेव्हा तुम्ही विश्वमन आणि विश्वबुद्धीशी जोडले जाता, तेव्हा त्यातूनच योग्य मार्गदर्शन मिळते.’

हा आध्यात्मिक दृष्टीकोन ठेवल्याने माझ्यात ‘सांगणारा, ऐकणारा आणि मार्गदर्शन करणारा भगवंतच आहे’, याची जाणीव वाढली आहे. त्यामुळे मी ऐकतो, मार्गदर्शन करतो इत्यादीविषयी कर्तेपणा उणावला आहे.

३ ऊ. समुपदेशकाची भूमिका लक्षात ठेवून वागल्यामुळे समोरच्या व्यक्तींचे प्रतिक्रियात्मक बोलणे उणावून त्यांची भूमिका सकारात्मक होऊ लागणे : पूर्वी साधकाविना इतरांशी संवाद साधतांना मला अडचणी येत असत; मात्र आता चांगल्या समुपदेशकाची भूमिका लक्षात ठेवून कुटुंबातील व्यक्ती आणि समाजातील अन्य व्यक्ती यांचे बोलणे शांतपणे ऐकून घेतांना ताण येत नाही. समोरच्या व्यक्तीकडून कधी प्रतिक्रियात्मक बोलणे झालेच, तर मला ते शांतपणे ऐकता येऊ लागले आहे. परिणामी समोरच्या व्यक्तींचे प्रतिक्रियात्मक बोलणे उणावून त्यांची भूमिका सकारात्मक होऊ लागल्याचे दिसून येत आहे. दुसर्‍याचे विचार जसे आहेत, तसे ग्रहण करण्यासाठी माझ्या मनात पोकळी निर्माण करण्याची, म्हणजे माझे मन विशाल करण्याची मला सवय लागत आहे.

३ ए. समुपदेशन या विषयाच्या अभ्यासाचा व्यष्टी साधनेच्या आढाव्याच्या वेळी उपयोग होणे : व्यष्टी साधनेचा आढावा देतांना आणि घेतांना या सूत्रांचा चांगला उपयोग होत आहे. दुसर्‍यांचे समुपदेशक म्हणून ऐकून घेतल्याने त्यातून शिकता येत आहे. इतर वेळीही माझे साधकांशी मनमोकळेपणाने बोलणे वाढले आहे.

३ ऐ. चुकांचे प्रमाण उणावल्याने शिकण्यातील आनंद मिळणे : पूर्वी दुसरे दोघे बोलत असतांना मी मधेच बोलून विषयांतर करत असे. इतरांशी बोलतांना ‘मला अधिक कळते, शिकवण्याची भूमिका आणि कर्तेपणा घेणे’, या अहंच्या पैलूंचे प्रकटीकरण असे. समुपदेशन प्रक्रियेची सूत्रे उपयोगात आणल्यामुळे माझ्याकडून अशा गंभीर चुका होण्याचे प्रमाण उणावले आहे. इतरांना समजून घेणे आणि त्यांच्याकडून शिकणे वाढले आहे. मला त्यातून आनंद मिळत आहे.

वरील सर्व अनुभवामुळे ‘व्यष्टी आणि समष्टी साधनेसाठी ‘चांगला समुपदेशक असणे’ हे एक साहाय्यक सूत्र आहे’, असे मला वाटते.

४. सकारात्मकता येण्यासाठी महत्त्वपूर्ण सूत्रे 

अ. आपण म्हणत असतो, ‘मला अमुक एका व्यक्तीपासून त्रास (प्रश्न किंवा अडचण) आहे’; मात्र प्रत्यक्षात ती अडचण आपल्यातच असते. अशा वेळी ‘मला नक्की कशामुळे त्रास होतो, हे मी स्वतःच स्वतःला विचारले पाहिजे.’  ‘आपल्याला स्वतःतील उणिवा, स्वभावदोष आणि अहं यांमुळे आपल्याला त्रास होतो’, हे स्वीकारता आले पाहिजे.

आ. जेव्हा मला दुसर्‍याविषयी प्रतिक्रिया येते, तेव्हा मी माझे बिंब दुसर्‍यामध्ये पहात असतो. त्यासाठी आपणच आरशासारखे (स्वच्छ आणि निर्मळ) वागले पाहिजे. तेव्हा माझ्यातील निर्मळतेमुळे माझ्यामध्ये दुसर्‍याला त्याचे प्रतिबिंब दिसेल.

इ. मी स्वतःचे वाहन चालवत असतांना दुसर्‍याचे वाहन चालवू शकत नाही; कारण त्या वेळी त्याच्या गाडीचे ‘स्टिअरींग व्हील’ आणि नियंत्रण त्याच्या हातात असते. (You can’t drive other’s car. Always drive your own car !) त्यावर मी नियंत्रण ठेवू शकत नाही. यासाठी केवळ मी माझीच गाडी योग्य प्रकारे चालवणे क्रमप्राप्त ठरते.

५. सकारात्मकतेविषयी साधकात झालेला पालट

अ. डॉ. (सौ.) मीनू यांनी वरीलप्रमाणे सांगितलेल्या सूत्रांवरून माझ्या लक्षात आले की, मी माझी साधना परात्पर गुरु डॉक्टरांना अपेक्षित अशी तळमळीने आणि भावपूर्ण केली पाहिजे. त्या दृष्टीने प्रयत्न केल्यामुळे अपेक्षा करणे आणि स्वेच्छेने वागणे, या स्वभावदोषांवर मात करण्यास साहाय्य झाले, उदा. कुटुंबीय, साधक, समाजातील लोक, हिंदुत्वनिष्ठ यांच्याकडून अपेक्षा करणे उणावले.

आ. जेव्हा घरचे किंवा दुसरे कुणी मला सांगतात की, दुसर्‍यांनी असे-असे केले, ते असे वाईट वागतात, त्या वेळी मी त्यांना गाडी चालवतांना ‘कुणी आपल्या गाडीच्या पुढे आला, माणसे नीट रस्त्यावर चालत नाहीत, त्याने मला ‘ओव्हरटेक’ केले आदी कारणांमुळे अपघात झाला’, असे सांगू शकत नाही, तर आपले मन पूर्णपणे गाडी चालवण्यावर एकाग्र करायला हवे’, असे सोपे उदाहरण सांगतो. त्यामुळे त्यांच्यातही सकारात्मक पालट होत आहेत.

इ. मला स्वतःकडून अपेक्षा असल्याने ताण येत असे. मला वयाच्या ७३ व्या वर्षी शारीरिक आणि मानसिक मर्यादा असतांनाही पूर्वीसारखी सेवा आणि साधना करावी, अशी अवास्तव अपेक्षा असायची. वरील सूत्रानुसार ‘मी दुसर्‍याची गाडी चालवू शकत नाही, तर मी माझी गाडी चालवली पाहिजे. मी माझ्या आणि गाडीच्या मर्यादा लक्षात घेऊन गाडी चालवली पाहिजे’, हे लक्षात येत आहे.

ई. इतकेच नाही, तर साधनेच्या दृष्टीने मी माझ्या गाडीवरही नियंत्रण ठेवू शकत नाही; कारण माझ्या गाडीचे (जीवनाचे) ‘स्टेअरींग’ शेवटी ईश्वराच्या हातात आहे. ‘जे काही होत आहे, ते ईश्वरेच्छेने होत आहे’, असा दृष्टीकोन ठेवल्याने अपेक्षा करणे आणि स्वेच्छा असणे, या स्वभावदोषांवर मात करण्यास साहाय्य होत आहे.

६. कृतज्ञता

परात्पर गुरु डॉक्टरांच्या कृपेने आम्हाला डॉ. (सौ.) मिनू रतन यांच्याकडून अमूल्य ज्ञान मिळाले आणि त्याचा साधनेसाठी उपयोग झाला. त्यासाठी मी गुरुदेवांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करतो.’

(समाप्त)

– पू. शिवाजी वटकर (वय ७७ वर्षे, सनातनचे १०२ वे (समष्टी संत), सनातन आश्रम, देवद, पनवेल