डॉ. (सौ.) मिनू रतन यांची गुणवैशिष्ट्ये आणि त्यांनी ‘समुपदेशन’ (Counselling) या विषयावर केलेल्या मार्गदर्शनातून लक्षात आलेली सूत्रे !

‘फेब्रुवारी २०१९ मध्ये देवद, पनवेल येथील सनातनच्या आश्रमात डॉ. (सौ.) मिनू रतन यांची कार्यशाळा होती. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने मला देवद आश्रमात सौ. मिनू रतन यांच्या मार्गदर्शनाला बसण्याचे भाग्य लाभले. साधनेच्या दृष्टीने मला पुढील सूत्रे शिकायला मिळाली. त्या वेळी त्यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये आणि मार्गदर्शनातील काही वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे पुढे दिली आहेत.

पू. शिवाजी वटकर

१. गुणवैशिष्ट्ये

डॉ. (सौ.) मिनू रतन

१ अ. सेवेची तळमळ : साधकांना मार्गदर्शन केल्यावर साधकांनी तो विषय शीघ्र शिकून घ्यावा, याची त्यांना तळमळ असते. त्यांचे शिकवून झाले की, त्या प्रश्न विचारण्यासाठी किंवा अडचणी सांगण्यासाठी प्रोत्साहन देतात. ‘स्वतःला जे येते, ते शिकवले आणि संपले’, असे होत नाही. त्यांचे शिकवणे चर्चात्मक असते. त्यामुळे त्यांनी सांगितलेले पटकन आकलन होते.

१ आ. नम्रपणा आणि साधेपणा : त्यांनी मोठ्या पदावर नोकरी केलेली आहे. त्यांचा स्वतःचा व्यवसायही आहे. तरीही त्यांच्यात नम्रपणा आणि साधेपणा जाणवतो. त्या आश्रमात, भोजनकक्षात आणि इतरत्र वावरतांना सर्वसाधारण साधकाप्रमाणे दिसतात. त्या साधकांशी मनमोकळेपणाने बोलून जवळीक साधतात. अनुभव आणि ज्ञान यांनी ज्येष्ठ असूनही त्या साधकांशी मिळून-मिसळून आणि हसत-खेळत रहातात. त्या सर्व साधकांशी आपुलकीने आणि नम्रतेने वागतात.

१ इ. परात्पर गुरु आणि संत यांच्याविषयी आदरभाव असणे : १८.२.२०१९ या दिवशी त्या परात्पर गुरु पांडे महाराज यांना भेटल्या. त्या वेळी परात्पर गुरु पांडे महाराज यांनी त्यांना आध्यात्मिक स्तरावर मार्गदर्शन केले. ते त्यांनी जिज्ञानेसे ऐकून घेतले. मानसशास्त्रातील काही सूत्रे ‘आध्यात्मिक दृष्टीने कशी मांडायची ?’, हे त्यांनी आत्मसात् केले आहे.

१ ई. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावर श्रद्धा असणे : त्यांची परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावर नितांत श्रद्धा आहे. त्या मार्गदर्शन करत असतांना त्यांचा अधून-मधून भाव जागृत होतो. त्यांचा विषय मानसशास्त्राशी निगडित असल्याने गंभीर आणि रुक्ष आहे, तरीही त्या विषय ‘परात्पर गुरु डॉक्टरांना अपेक्षित असा आणि आध्यात्मिक स्तरावर कसा होईल ?’, हे पहातात. कठीण सूत्र हसत-खेळत आणि उदाहरणासह सांगतात. ‘साधकांनी ताण-तणावाखाली न रहाता परात्पर गुरु यांना अपेक्षित असे सर्वांनी आनंदी राहून साधना करावी’, असा त्यांचा भाव असतो.

१ उ. शिकण्याची वृत्ती असणे : त्या वर्गात मार्गदर्शन करत असतांना चर्चा करून दुसर्‍या साधकांकडून शिकत असतात.

 २. आदर्श समुपदेशकाने कसे असावे ?

‘व्यक्तीमत्त्व सुधारणेच्या आणि मानसिक स्तरावरील अडचणी सोडवण्याच्या प्रक्रियेला ‘समुपदेशन पद्धत’ म्हणतात. ‘समुपदेशन’ ही एक अनौपचारिक मानसोपचार पद्धत आहे. इतर मानसोपचार पद्धतीमध्ये मनोरुग्णावर वेगवेगळ्या प्रकारचे औपचारिक पद्धतीने उपचार केले जातात. जो या अडचणी सोडवण्याच्या दृष्टीने समुपदेशन करतो, तो समुपदेशक.

२ अ. परिस्थितीची जाणीव : ‘माणसाच्या जीवनात जन्म ते मृत्यू अनेक प्रसंग घडत असतात. एका व्यक्तीला एका प्रसंगातून आनंद मिळेल, तर दुसर्‍याला त्याच प्रसंगात दुःख मिळू शकते. हे सर्व तेथील वातावरण, सामाजिक स्थिती, ठिकाण, वय, शिक्षण, संस्कार, स्वभावदोष, अहं इत्यादींवर अवलंबून असते’, याची समुपदेशकाला जाणीव असावी लागते.

२ आ. समुपदेशकाने दुसर्‍याचे प्रसंग ऐकत असतांना त्यांची तुलना आपल्या अनुभवाशी करू नये ! : सर्वसाधारणपणे दुसरी व्यक्ती आपल्याला काहीतरी सांगत असते, त्या वेळी आपण आपल्या अनुभवाप्रमाणे ऐकत असतो; मात्र ‘समुपदेशकाने दुसर्‍याचे ऐकत असतांना त्याचे प्रसंग स्वतःच्या अनुभवाशी जोडून ऐकू नये. तसेच त्याने त्यांची तुलना आपल्या अनुभवाशी करू नये. त्याने केवळ त्याचे म्हणणे आत्मीयतेने ऐकत असतांना साक्षीभावाने पहात रहावे.

२ इ. उपलब्धता म्हणजे सहज संपर्क करता येण्यासारखी स्थिती आणि स्वीकारार्हता : समुपदेशकाकडे प्रश्न किंवा अडचण घेऊन येणार्‍यासाठी त्याच्याकडे वेळ, उपलब्धता म्हणजे सहज संपर्क करता येण्यासारखी स्थिती आणि स्वीकारार्हता (Accessibility, Approachable, Acceptance) पाहिजे.

२ ई. विश्वास संपादन केला पाहिजे ! : पीडित व्यक्तीने संपर्क केल्यावर तो त्या वेळी उपलब्ध पाहिजे. समजा त्या वेळी समुपदेशक व्यस्त असेल, तर त्यांनी तसे सांगून नंतर वेळ देऊन ती पाळली पाहिजे, म्हणजेच आश्वासन देऊन विश्वास संपादन केला पाहिजे.

२ उ. समुपदेशकाने पीडित व्यक्तीचे आपुलकीने (आत्मीयतेने) ऐकायला पाहिजे आणि त्याच वेळी त्याला साक्षीभावाने पहाता आले पाहिजे.

२ ऊ. सांगणार्‍याला समुपदेशकाची भीती वाटू नये ! : सांगणार्‍याला समुपदेशकाची भीती वाटू नये. सांगणार्‍याला मनमोकळेपणाने आणि प्रतिमा न जपता सांगावेसे वाटले पाहिजे.

२ ए. समुपदेशकाने वर्तमानकाळात राहून ऐकावे ! : समुपदेशकाने पूर्वग्रहदूषितपणे ऐकू नये. व्यक्ती पुन्हा भेटल्यावर स्वतःच्या मनाचे कोरे पान उघडावे आणि त्यावर त्याचे विचार लिहावेत. म्हणजे पूर्वीचे काहीही मनात न ठेवता निर्मळ मनाने ऐकावे. थोडक्यात वर्तमानकाळात राहून ऐकावे.

२ ऐ. शांत आणि स्थिर रहाणे आवश्यक : समुपदेशकाने मन विशाल आणि निर्विचार करून पीडित व्यक्तीचे सर्व ऐकून घेतले पाहिजे, तसेच त्याने स्थिर आणि शांत राहिले पाहिजे. समुपदेशकाने स्वतःच्या मनामध्ये पोकळी निर्माण केली पाहिजे; कारण पोकळी निर्माण केल्याने त्याची आत्मशक्ती (Inner arising) जागृत होते. त्यामुळे दुसरा जे सांगतो, ते सर्व ऐकून घेण्याची क्षमता निर्माण होते. दुसर्‍यांचे म्हणणे आत्मीयतेने ऐकले पाहिजे. त्यांचा विश्वास संपादन केला पाहिजे.

२ ओ. वेळ आली, तर तत्त्वनिष्ठ राहून आत्मविश्वासाने सांगितले पाहिजे.

२ औ. निष्कर्ष काढू नये ! : समुपदेशकाने दुसर्‍याचे ऐकतांना त्याविषयी निष्कर्ष काढू नये, म्हणजे ‘हा असा आहे, तो तसा आहे’, असे ठरवू नये.

२ अं. कल्पनेने दुसर्‍याच्या अंतरंगात शिरून त्याच्या भावना जाणून घेण्याची क्षमता समुपदेशकामध्ये असायला पाहिजे ! : पीडित व्यक्ती भावनावश होऊन रडत किंवा शिव्या देत सांगत असेल, तरीही समुपदेशकाने त्याचे म्हणणे शांतपणे ऐकून घ्यावे. ‘त्याच्या भावना म्हणजे माझ्या भावना !’ असे समजून भावनावश होऊन त्यात अडकण्यापेक्षा दुसर्‍याचे दुःख जाणून घेणे महत्त्वाचे असते. कल्पनेने दुसर्‍याच्या अंतरंगात शिरून त्याच्या भावना जाणून घेण्याची क्षमता समुपदेशकामध्ये असायला पाहिजे.

२ क. पीडित व्यक्ती स्वावलंबी बनवणे आवश्यक : दुसर्‍याने सांगितलेले उपाय ती पीडित व्यक्ती कृतीत आणेलच, असे सांगता येत नाही. अशा रितीने पीडित व्यक्ती स्वावलंबी बनते. परिस्थितीत पालट होतो आणि वाईट गोष्टीचे रूपांतर चांगल्यात होते, उदा. सौ. मिनू रतन या मुंबईतील एस्.एन्.डी.टी. वुमन्स कॉलेजमध्ये समुपदेशक असतांना एक मुलगी खोड्या करायची आणि कुणाचेच ऐकत नव्हती; मात्र त्यांनी तिला समुपदेशन केल्यावर ती वर्गाची ‘मॉनिटर’ आणि आदर्श विद्यार्थीनी बनली.

२ ख. विश्वमनाशी एकरूप होण्याची, म्हणजे चांगली साधना असणे अपेक्षित : शांत आणि स्थिर पाण्यात आपले प्रतिबिंब दिसते, तसे समुपदेशकाचे मन शांत असेल, तर पीडित व्यक्तीला बिंब-प्रतिबिंब या न्यायाने त्याच्या समस्येचे उत्तर बोलता-बोलता स्वतःलाच सुचते. त्या वेळी तो समुपदेशकाकडून त्याची निश्चिती करून घेतो आणि त्याला सुचलेले उत्तर किंवा उपाय तो स्वतःहून कृतीत आणतो.

ऐकणार्‍याने शुद्ध आणि रिकाम्या मनाने ऐकल्याने तेथे मनोलय साधला जाऊन तो विश्वमनाशी जोडला जाऊ शकतो. त्यामुळे त्याच्या मनात भगवंताचा वास होऊ शकतो. यामुळे पीडित व्यक्तीच्या समस्यांना बिंब-प्रतिबिंब न्यायाने भगवंताकडून चैतन्याच्या स्तरावर विचार स्फुरून त्याचे उत्तर त्याला स्वतःलाच मिळू शकते.’

– पू. शिवाजी वटकर (वय ७७ वर्षे, सनातनचे १०२ वे (समष्टी संत), सनातन आश्रम, देवद, पनवेल. (९.६.२०१९)

लेखाचा भाग २ पाहण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/747871.html