China Taiwan : तैवान लवकरच चीनशी जोडला जाईल ! – शी जिनपिंग

चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग

सॅन फ्रॅन्सिस्को (अमेरिका) – येत्या काही काळात तैवान चीनच्या मुख्य भूप्रदेशाशी जोडला जाईल. शांततेच्या मार्गाने तैवानचा चीनमध्ये समावेश करून घेण्याचा आमचा प्रयत्न आहे. आम्हाला कसलीही बळजोरी करायची नाही, असे वक्तव्य चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी केले. ते येथे झालेल्या शिखर परिषदेत बोलत होते. या शिखर परिषदेत अमेरिका आणि चीन यांचे अनेक अधिकारी उपस्थित होते. इस्रायल-हमास युद्ध आणि तैवान या दोन विषयांवर या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याची शक्यता आहे.

१. अमेरिकेने तैवानला नुकतेच सैनिकी साहाय्य देऊ केले आहे. त्यामुळे अमेरिका आणि चीन यांच्यातील संबंध ताणले गेले आहेत.

२. अशातच अमेरिकेने ‘चीन वर्ष २०२५ किंवा २०२७ पर्यंत तैवानवर नियंत्रण मिळवेल’, असे म्हटले होते. त्यावरून चीनने अमेरिकेला सुनावले. अमेरिकेने घोषित केलेला हा दिनांक चुकीचा असून तैवानवर नियंत्रण मिळवण्यासंदर्भात अद्याप वेळ निश्‍चित झाली नसल्याचे जिनपिंग यांनी स्पष्ट केले, अशी माहिती काही अधिकार्‍यांनी दिली.

३. दुसरीकडे ‘तैवानशी शांततापूर्ण एकीकरणाच्या चीनच्या उद्दिष्टांना अमेरिकेचे समर्थन आहे’, असे काही चिनी अधिकार्‍यांनी सांगितले होते. व्हाईट हाऊसने मात्र हे वृत्त फेटाळून लावले आहे.

संपादकीय भूमिका

विस्तारवादी चीनला शह देण्यासाठी आता भारताने चीनविरोधी शक्तींना एकत्र करून त्यांचे नेतृत्व केले पाहिजे. हे अप्रत्यक्ष भारताच्या हिताचेही असणार आहे !