रत्नागिरी – संगणक परिचालकांचे आंदोलन चालू असतांनाच आता विविध प्रलंबित मागण्यांसाठी जिल्ह्यातील ११८ ग्रामविकास अधिकारी आणि ४३९ ग्रामसेवक मिळून एकूण ५५७ ग्रामसेवक यांनी संप केला आहे. परिणामस्वरूप जिल्ह्यातील ८४६ ग्रामपंचायतीचा कारभार ठप्प झाला आहे.
ग्रामसेवक आणि ग्रामविकास अधिकारी ही दोन्ही पदे एकत्रित करून पंचायत विकास अधिकारी पद निर्माण करणे, ग्रामसेवक आणि ग्रामविकास अधिकारी यांच्याकडील अतिरिक्त काम कमी करण्यासाठी स्थापन झालेल्या समितीच्या अहवालातील शिफारशींची कार्यवाही करणे, ग्रामसेवक पदाचे सेवा प्रवेश नियमात सुधारणा करणे, महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १८५८ चे कलम ४९ चे नियमात सर्व जिल्हा परिषदांच्या प्राप्त अहवालानुसार सुधारणा करणे, विस्तार अधिकारी पदाची संख्या वाढविणे, १ नोव्हेंबर २००५ पूर्वी भरती प्रक्रिया चालू झालेल्या ग्रामसेवकांना सरसकट जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करणे या अन्य मागण्यांसाठी ग्रामसेवकांनी संप केला आहे.