पाचल (जिल्हा रत्नागिरी) येथील ‘ख्वाजा ट्रेडर्स’ने पावतीवरून हटवला ‘फ्री पॅलेस्टाईन हॅशटॅग’ !

  • राष्ट्रप्रेमींच्या एकजुटीचा परिणाम !

  • राष्ट्रप्रेमींनी खडसावल्यावर व्यापार्‍याने केली क्षमायाचना !

फ्री पॅलेस्टाईन हॅशटॅगची पावती

पाचल, २० डिसेंबर (वार्ताहर) – येथील ख्वाजा ट्रेडर्स (के.टी. मार्ट) ग्राहकांना देत असलेल्या पावतीवर ‘फ्री पॅलेस्टाईन हॅशटॅग’ छापून येत असे. या ‘हॅशटॅग’च्या विरोधात परिसरातील राष्ट्रप्रेमी संघटित होत असल्याची कुणकुण लागल्याने या दुकानाचे मालक हनीफ मेमन यांनी हा ‘हॅशटॅग’ हटवला, तसेच याविषयी राजापूर पोलीस निरीक्षक भरत धुमाळ यांनी बोलावलेल्या बैठकीत मेमन यांनी क्षमायाचना केली. या वेळी रायपाटणचे सरपंच महेंद्र गांगण, पांगरी खुर्दचे सरपंच श्री. अमर जाधव, डॉ. परशुराम सुतार, डॉ. चेतन रेडीज, पत्रकार तुषार पाचलकर यांच्यासह २६ राष्ट्रप्रेमी नागरिक उपस्थित होते.

१. काही दिवसांपूर्वी येथील डॉ. परशुराम सुतार यांना ‘ख्वाजा ट्रेडर्स’मधून सामान खरेदी केल्यानंतर मिळालेल्या पावतीवर ‘फ्री पॅलेस्टाईन हॅशटॅग’ छापल्याचे निदर्शनास आले. डॉ. सुतार यांनी हा प्रकार परिसरातील काही प्रमुख व्यक्तींच्या कानावर घातला. (असे सतर्क राष्ट्रप्रेमी नागरिक, हीच हिंदु राष्ट्राची खरी शक्ती होय! – संपादक)

२. प्रमुख व्यक्तींनी विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन हा विषय परिसरातील अधिकाधिक लोकांपर्यंत पोचवण्याच्या दृष्टीने १४ डिसेंबर २०२३ या दिवशी बैठक आयोजित केली. या बैठकीला २८ राष्ट्रप्रेमी उपस्थित होते. (राष्ट्रावरील आघाताच्या विरोधात संघटित होणार्‍या राष्ट्रप्रेमींचे अभिनंदन ! –  संपादक)

३. या बैठकीत मेमन यांनी केलेल्या चुकीची त्यांना जाणीव करून देण्यासाठी त्यांच्या दुकानात जाऊन भेटण्याचे, तसेच याविषयी पोलिसांना निवेदन देण्याचे ठरवण्यात आले. त्याप्रमाणे १७ डिसेंबर या दिवशी राष्ट्रप्रेमी मारुति मंदिर येथे जमत असतांना त्यांना रायपाटण पोलीस दूरक्षेत्र येथे बोलावल्याचा निरोप आला. त्यानुसार राष्ट्रप्रेमी तेथे गेले. त्या वेळी तेथे व्यापारी मेमन त्यांच्या दानिश आणि फैजान या मुलांसमवेत उपस्थित होते.

हॅशटॅग काढून टाकल्याची पावती

४. राष्ट्रप्रेमी नागरिकांच्या वतीने राजापूर पोलीस निरीक्षक भरत धुमाळ यांना निवेदन देण्यात आले. तेव्हा राष्ट्रप्रेमींनी ‘असे छापण्यामागील मेमन यांनी भूमिका स्पष्ट करावी’, अशी एकमुखी मागणी केली. त्यावर मेमन यांचा धाकटा मुलगा फैजान (वय २० वर्षे) याने ते केल्याचे सांगितले. त्याप्रमाणे त्याने स्वीकृतीही दिली. त्यावर भरत धुमाळ यांनी ‘असे का केले ?’ असे फैजानला विचारताच त्याने ‘चुकून झाले’, असे सांगितले. त्यावर राष्ट्रप्रेमींनी आक्षेप घेत मग ‘फ्री पीओके’ असे एकदाही चुकून का छापले नाही ?’, अशी विचारणा केली. त्यावर तो निरुत्तर झाला. ‘असे करण्याची प्रेरणा तुला कुठून मिळाली?’ असे भरत धुमाळ यांनी विचारताच त्याने सामाजिक माध्यमांवरून मिळालेल्या संदेशातून केल्याचे सांगितले. त्यावर राष्ट्रप्रेमींनी ‘बोलविता धनी’ वेगळा असण्याच्या शक्यतेकडे लक्ष वेधले.

५. भरत धुमाळ यांनी ‘असे किती दिवसांपासून छापत आहेस ?’, असे विचारताच त्याचा भाऊ दानिश याने ‘८-१० दिवसांपासून असेल. ४ दिवसांपूर्वी आमच्या लक्षात आल्यानंतर त्याला असे न छापण्याविषयी सांगितले आणि त्याने छापण्याचे बंद केले’, असे सांगितले. त्यावर राष्ट्रप्रेमींनी त्यांच्याकडील २५ ऑक्टोबर २०२३ ची पावती दाखवून ‘किमान दीड मासांपासून असे छापत होता’, हे निदर्शनास आणून देऊन दानिश याचा खोटारडेपणा उघड केला. तसेच ‘हे तुम्ही स्वतःहून छापण्याचे बंद केले नाही, तर राष्ट्रप्रेमी संघटित होत असल्याची तुम्हाला कुणकुण लागल्यामुळेच असे छापण्याचे बंद केले’, असे आमचे स्पष्ट मत आहे’, असे सांगितले.

६. त्यानंतर भरत धुमाळ यांनी फैजानने केलेल्या चुकीच्या परिणामांची जाणीव करून देऊन यापुढे असे न करण्याची समज दिली. तसेच राष्ट्रप्रेमींनीही फैजान याने असे करून आतंकवादाचे अप्रत्यक्ष समर्थन, तसेच राष्ट्रद्रोह केल्याची जाणीव करून दिली.
परिणामी त्याने केलेल्या या चुकीविषयी त्याच्यासह त्याचे वडील आणि भाऊ यांनी क्षमायाचना करून ‘यापुढे अशी चूक होणार नाही’, अशी स्वीकृती दिली.

७. शेवटी उपस्थित राष्ट्रप्रेमींनी केलेल्या एकमुखी मागणीनुसार फैजान याने केलेल्या चुकीचे तात्पुरते परिमार्जन म्हणून त्याच्याकडून ‘वन्दे मातरम् !’ हे शब्द वदवून घेण्यात आले.