वैयक्‍तिक कामासाठी गोव्‍यात वास्‍तव्‍याला असतांना गुरुमाऊलींच्‍या कृपेने रहात्‍या इमारतीतच सेवा उपलब्‍ध होणे

‘मी गोवा येथे विकत घेतलेल्‍या घराचा आर्थिक व्‍यवहार पूर्ण करण्‍यासाठी गोव्‍यातील एका साधकाच्‍या घरी काही दिवस राहिलो. त्‍यानंतर स्‍वतःच्‍या नवीन घरात रहाण्‍याचा निर्णय घेतला. घर रहाण्‍याजोगे होण्‍यासाठी अनेक गोष्‍टींची पूर्तता करावी लागली. तसे करण्‍यात काही दिवस गेले.

श्री. सुरेश सावंत

त्‍यानंतर एकदा माझ्‍या मनात विचार आले, ‘गुरुपौर्णिमेला काही दिवस राहिले आहेत; परंतु मायेतील कामामध्‍ये माझा पुष्‍कळ वेळ वाया जात आहे.’ त्‍याच दिवशी रात्री मी प.पू. गुरुदेवांच्‍या चरणी शरणागतभावाने आत्‍मनिवेदन केले, ‘हे गुरुदेवा, सध्‍या माझ्‍याकडून काहीच सेवा होत नाही. घराची कागदपत्रे तयार होण्‍यास फार विलंब होत आहे. गुरुपौर्णिमेला ३८ दिवस शेष आहेत. तुम्‍हीच मला सेवा उपलब्‍ध करून द्यावी’, अशी आपल्‍या सुकोमल चरणी कळकळीची प्रार्थना आहे.’ त्‍यानंतर रात्री अनुमाने ११.३० वाजता मला जाग आली. ‘सावंत, मी तर इथेच आहे’, असे मला कोणीतरी सांगत असल्‍याचे जाणवले. हा आवाज परिचयाचा आणि चैतन्‍यमय होता. त्‍या वेळी ‘मला भास झाला असावा’, असे समजून मी परत झोपी गेलो.

दुसर्‍या दिवशी माझा मुलगा यज्ञेश याला आमच्‍या इमारतीमध्‍ये रामनाथी आश्रमातून आलेले काही साधक दिसले. यज्ञेश त्‍यांना भेटला. तेव्‍हा तेथे एक सेवा चालू झाल्‍याचे कळले. ‘मला काही सेवा मिळू शकते का ?’, असे साधकांना विचारल्‍यावर त्‍यांनी मला सेवा दिली. यावरून ‘४ दिवसांपूर्वी रात्रीच्‍या वेळी माझ्‍याशी बोलणारी माझी गुरुमाऊलीच होती’, हे माझ्‍या लक्षात आले. ‘साधकाला सेवा मिळावी’, अशी त्‍यांचीच तळमळ होती. ‘त्‍यांच्‍याच कृपेने माझी सेवा चालू झाली’, याबद्दल गुरुदेवांच्‍या चरणी कोटीशः कृतज्ञता व्‍यक्‍त करतो.’

– श्री. सुरेश सावंत (वय ७१ वर्षे), गोवा (२६.६.२०२१)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक