ठाणे येथे श्रीराम अक्षत मंगल कलश यात्रा पार पडली !
ठाणे, १८ डिसेंबर (वार्ता.) – श्रीराम मंदिर हा विषय अस्मिता आणि श्रद्धा यांचा आहेच; पण हा देशाचा अभिमान आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे कोट्यवधी राम भक्तांचे स्वप्न पूर्ण होत आहे. भव्य श्रीराम मंदिर सिद्ध झाले आहे. हे मंदिर २२ जानेवारीला रामभक्तांसाठी खुले होणार आहे. या कार्यक्रमासाठी संपूर्ण देशात उत्साह आहे, असे विधान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे येथील कार्यक्रमात केले.
ठाणे शहरातील गडकरी रंगायतन ते कौपिनेश्वर मंदिर अशी श्रीराम अक्षत मंगल कलश यात्रा १७ डिसेंबरला दुपारी काढण्यात आली होती. या यात्रेत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सहभागी झाले होते. यासह भाजप, शिवसेनेच्या नेत्यांसह कार्यकर्ते, विश्व हिंदु परिषद आणि बजरंग दलाचे कार्यकर्ते अन् हिंदुत्वनिष्ठ नागरिक सहभागी झाले होते. लेझीम, ढोल-ताशांच्या गजरात निघालेल्या यात्रेत ‘जय श्रीराम’ अशा घोषणा देण्यात आल्या. यात्रेसाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. या यात्रेनंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी उपस्थितांशी संवाद साधला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, ‘‘अयोध्येत राम मंदिर व्हावे’, अशी दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची इच्छा होती आणि ठाणे येथे आलेल्या कारसेवा यात्रेत दिवंगत शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांनी चांदीची वीट देऊन ती अयोध्याला पाठवली होती. त्यामुळे तेव्हापासून ठाणे आणि अयोध्या यांचे एक जुने नाते निर्माण झाले आहे. ’’