‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांची अनमोल शिकवण (खंड १)’ हा ग्रंथ वाचतांना श्री. गिरीश पाटील यांना स्थळ, काळ आणि वेळ यांच्या पलीकडील भावाच्या स्तरावर आलेल्या अनुभूती

‘वर्ष २०१९ मध्ये वयाच्या २३ व्या वर्षी मी सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधनेला आरंभ केला. प्रारंभी मी केवळ प्रासंगिक सेवा करायचो; पण आता पूर्णवेळ साधनेला आरंभ केला आहे. मला नेहमी असे वाटायचे की, जर मी काही वर्षे आधी साधना चालू केली असती, तर कदाचित् मलाही गुरुदेवांचा (सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर आठवले यांचा) प्रत्यक्ष सत्संग मिळाला असता. ‘परम पूज्य गुरुदेव अभ्यासवर्ग कसे घेत असतील ? किंवा त्यांच्या समवेत सेवा करणार्‍या साधकांची भावावस्था कशी असेल ?’, याविषयी मला नेहमी जिज्ञासा असायची. माझ्या मनातील ही इच्छा ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांची शिकवण (खंड १)’ या ग्रंथाचे वाचन करतांना पूर्ण झाली. त्या वेळी मला आलेल्या अनुभूती आणि शिकायला मिळालेली सूत्रे पुढे दिली आहेत.

ग्रंथाचे मुखपृष्ठ

१. ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांची शिकवण (खंड १)’ या ग्रंथाचे वाचन करतांना आलेल्या अनुभूती

१ अ. ग्रंथ मालिकेतील सर्वच ग्रंथ स्थळ, वेळ आणि काळ यांच्या पलीकडील अनुभूती देणारे असणे

‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांची अनमोल शिकवण (खंड १)’ या ग्रंथामध्ये साधकांनी प.पू. डॉक्टर यांच्या अभ्यासवर्गांच्या काळापासूनचे (वर्ष १९९१ पासूनचे) अनुभव सांगितले आहेत. मी प्रवासात असतांना या ग्रंथाचे वाचन केले; परंतु ‘मी प्रवास करत नसून प्रत्यक्ष त्या ठिकाणी जाऊन ते अनुभवत आहे’, असे मला जाणवले. यावरून देवाने मला लक्षात आणून दिले, ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचा साधनाप्रवास, तसेच त्यांची अनमोल शिकवण या ग्रंथ मालिकेतील सर्व ग्रंथ हे स्थळ, काळ आणि वेळ यांच्या पलीकडे असून प्रत्येक साधकाच्या भावानुसार त्याला अनुभूती देणारे आहेत, तसेच साधनेत नवीन असणार्‍या प्रत्येकाला अध्यात्माचे अनेक पैलू शिकवणारे आहेत.’

श्री. गिरीश पाटील

१ आ. ग्रंथाचे मुखपृष्ठ पाहून आलेली अनुभूती

ज्या वेळी मी या ग्रंथाचे मुखपृष्ठ बघितले, त्या वेळी असे वाटले, ‘मी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या सत्संगामध्येच बसलो आहे आणि त्यांच्या हाताच्या मुद्रेतून या ग्रंथाचे वाचन करणार्‍या प्रत्येकाला आशीर्वाद मिळत आहे.’

१ इ. ग्रंथाचे वाचन करतांना दैवी कणांची अनुभूती येणे

‘मी प्रवासात असतांना जिथे बसून ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांची शिकवण (खंड १)’ हा ग्रंथ वाचत होतो, त्या ठिकाणी सोनेरी आणि चंदेरी रंगाचे अनेक दैवी कण आले आहेत’, असे माझ्या लक्षात आले.

२. ग्रंथाचे वाचन करतांना शिकायला मिळालेली सूत्रे 

२ अ. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या हस्तलिखिताच्या स्वरूपातील छायाचित्रामुळे, तसेच ग्रंथ ब्रह्मोत्सवाच्या दिवशी प्रकाशित झाल्याने त्यात चैतन्य जाणवणे

या ग्रंथामध्ये सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या हस्तलिखिताच्या स्वरूपातील पत्राचे छायाचित्र आहे. साधकांना गुरुदेवांच्या या हस्तलिखितामुळे विविध आध्यात्मिक लाभ होतील, तसेच या ग्रंथाची पहिली आवृत्ती सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या ब्रह्मोत्सवाच्या दिवशी (११ मे २०२३) प्रकाशित केली गेल्यामुळे या ग्रंथामध्ये पुष्कळ चैतन्य आहे.

२ आ. ग्रंथामध्ये छायाचित्रे घेण्यापूर्वी त्यात पालट केले असल्याने छायाचित्रांची सात्त्विकता वाढणे

ग्रंथाच्या शेवटी रंगीत छायाचित्रे आहेत. या सर्व छायाचित्रांचे ‘एडिटींग’ (संगणकावर केलेले पालट) अचूकतेने केल्यामुळे आपले लक्ष थेट संतांकडे जाते आणि ते पाहून आपल्याला आनंद मिळतो. यातून ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले हे सनातन संस्थेच्या कलेशी संबंधित साधकांना कोणतेही छायाचित्र प्रकाशित करण्यापूर्वी त्यामध्ये पालट करायला का सांगतात ?’, हे लक्षात आले. ‘हे पालट केल्याने इतरत्र लक्ष न जाता जे आवश्यक आहे, त्याकडे लक्ष जाते आणि छायाचित्राची सात्त्विकताही वाढते’, हे मला शिकायला मिळाले.

२ इ. ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या समवेत सेवा करतांना साधकांना येणारी अनुभूती स्वतःलाही अनुभवायला मिळावी’, ही इच्छा ग्रंथाच्या माध्यमातून पूर्ण होणे

‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले अभ्यासवर्ग घेत असतांना, तसेच त्यांच्या समवेत अध्यात्मप्रसाराची प्रत्यक्ष सेवा करणार्‍या साधकांना काय अनुभूती येत असतील ?’, याचे मला कुतूहल होते. तसेच ‘मलाही हे अनुभवायला मिळावे’, अशी माझी इच्छा असे आणि ईश्वराने ती या ग्रंथाच्या माध्यमातून पूर्ण केली. यावरून मला देवाने हे शिकवले, ‘अध्यात्मात आपण ईश्वराकडे साधनेला पूरक असे काहीही मागितले की, ईश्वर आपल्याला ते लगेच देतो.’

३. प्रवासाच्या आधी ग्रंथ उपलब्ध होऊन प्रवासात ग्रंथाचे वाचन करता आल्याने कृतज्ञता व्यक्त होणे

मी प्रवासासाठी निघण्याच्या एक दिवस आधी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात हा ग्रंथ उपलब्ध झाला, तसेच मी मागणी दिली नसूनही एका सहसाधकाने अधिकची मागणी दिली असल्यामुळे मला हा ग्रंथ घेता आला. त्यामुळेच प्रवासामध्ये मला या ग्रंथाचे वाचन करता आले. ‘मी प्रवासामध्ये देवाच्या अनुसंधानात रहावे’, यासाठीच गुरुदेवांनी हा प्रसंग घडवला आणि मला शिकण्याच्या स्थितीमध्ये ठेवले.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचा साधनाप्रवास, तसेच त्यांची अनमोल शिकवण या ग्रंथ मालिकेतील ग्रंथांमधून गुरुदेव ‘सर्व साधकांवर जी ज्ञानरूपी आणि भक्तीरूपी कृपा करत आहेत’, त्यासाठी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करतो.’

– श्री. गिरीश पंडित पाटील, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (७.८.२०२३)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक