१. जोराचा वारा आणि पाऊस येऊन ओढ्याचे पाणी घराच्या पायरीपर्यंत येणे
‘२१.७.२०२३ ला रात्रीपासून जोराचा वारा आणि पाऊस चालू होता. दुसर्या दिवशीपर्यंत गावातल्या नदीला पूर आला. आमच्या घराच्या पाठीमागे असलेल्या ओढ्याचा प्रवाह आणि पाणी वाढले अन् घराच्या पायरीपर्यंत आले. आरंभी मनात भीती वाटली, ‘आता पाणी घरात शिरणार !’, तसेच पाण्याच्या प्रवाहात मला ५ – ६ साप दिसले. मी अशी स्थिती आधी कधीच अनुभवली नव्हती.
२. सनातनच्या तिन्ही गुरूंना प्रार्थना करून ‘ॐ निसर्गदेवो भव…।’ हा नामजप केल्यावर पुराचे पाणी ओसरणे
घराच्या वरच्या माळ्यावर गेल्यावर सनातनच्या तिन्ही गुरूंना, म्हणजे परात्पर गुरुदेव (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले), श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांना प्रार्थना केली. मी ‘ॐ निसर्गदेवो भव । ॐ वेदं प्रमाणं । हरि ॐ जयमे जयम् । जय गुरुदेव ।’ हा नामजप चालू केला. (आपत्काळात साधकांचे रक्षण व्हावे, यासाठी नाडीपट्टीच्या माध्यमातून महर्षींनी साधकांना हा जप करण्यास सांगितले होते. – संकलक) काही वेळातच पाऊस न्यून झाला आणि पाणी ज्या गतीने आले होते, त्याच गतीने मागे सरकू लागले अन् सूर्य नारायणाचेही क्षणभर दर्शन झाले.
३. पू. अशोक पात्रीकर ज्या मंदिरात येऊन गेले होते, त्या मंदिरापर्यंतच पाणी येणे आणि धर्मप्रेमी अन् प्रशिक्षणार्थी यांच्या घरात पाणी न येणे
पाणी ओसरल्यानंतर मी जे अनुभवले ती केवळ भगवंताची लीला होती, हे मला शिकायला मिळाले. सर्व धर्मप्रेमी ज्या भागात रहातात, तेथे मंदिरापर्यंत पाणी येऊन थांबले. या मंदिरात सनातन संस्थेचा सत्संग असतो. सनातनचे ४२ वे (समष्टी) संत पू. अशोक पात्रीकरकाका एकदा येथे येऊन गेले आहेत. ‘पू. पात्रीकरकाका, जिथे जिथे तुमचे चरण लागले, तिथे पाणी आत शिरू शकले नाही, जसे काही बाल श्रीकृष्णाचा चरण स्पर्श झाल्यावर नदीचे पाणी ओसरले !’ एकाही धर्मप्रेमीच्या घरात पाणी आले नाही. कर्मामाई मंदिराच्या अलीकडेच पाणी थांबले. या प्रसंगातून येणार्या आपत्कालीन स्थितीला तोंड देण्याचा सराव देवाने करून घेतला आणि साधकांची श्रद्धा अन् भाव वाढवला. या वेळी ‘प्रत्येक क्षणी गुरुमाऊली (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले) समवेत आहेत’, याची प्रचीती आली. त्याबद्दल श्रीगुरुचरणी कोटीशः कृतज्ञ आहे.’
– सौ. कीर्ती महेश जाजडा, दिग्रस, यवतमाळ. (२२.७.२०२३)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |