सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी साधकांना साधनेविषयी केलेले अमूल्य मार्गदर्शन !

सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे

१. ‘ध्येयप्राप्तीसाठी प्रयत्न होत आहेत ना ?’, याचा विचार करा !

‘साधनेत मी कोणते ध्येय प्राप्त करण्यासाठी आलो होतो ?’, असा विचार करावा. ‘साधनेत आल्यावर पहिल्या दिवशी आपले लक्ष ध्येयाकडे  होते. तेवढेच प्रयत्न आज ध्येयप्राप्तीसाठी माझ्याकडून होत आहेत का ?’, असा आपण स्वतःच विचार करावा.

२. आपण जन्माला आलो. त्या वेळी स्वतःसह काही आणले नव्हते. येथून जातांनाही सर्वकाही येथेच सोडून जाणार आहोत. आपण समवेत काहीही घेऊन जात नसतो.

कु. मनीषा माहुर

३. ‘श्री गुरूंचा प्रतिनिधी’ हीच आपली ओळख आहे’, असा भाव ठेवावा !

वर्तमानात आपल्याला जी काही सेवा किंवा दायित्व मिळाले आहे, ती गुरूंनी दिलेली ओळख आहे. त्यांनी एवढा विश्वास ठेवून आपल्याला ते दिले आहे. आपण गुरूंचे प्रतिनिधी आहोत. आपले वैयक्तिक काहीच नाही. आपण जेथे जातो, तेथे आपली वैयक्तिक अशी काहीच ओळख नसते. ‘आपण श्री गुरूंचे प्रतिनिधी आहोत’, हीच आपली खरी ओळख आहे’, हा भाव ठेवून आपल्याला सेवा करत रहायची आहे.

४. धर्मसंस्थापना

याचा अर्थ आहे ‘सम्यकतेची स्थापना.’ सम्यकतेची स्थापना, म्हणजे सुख-दुःख किंवा भौतिकता यांच्या पलीकडे जाऊन स्वरूप किंवा आत्मा यांमध्ये स्थिर होणे होय.

५. अहंचा मृत्यू, हेच साधकासाठी अमृत !

अहंरूपी मरण साधकासाठी प्रतिदिन होऊ शकते. साधनेत ‘अहंचा लय होणे’, हे अमृत आहे. एक प्रकारे ‘मृत्यूवर विजय प्राप्त करणे’, म्हणजे अमृत आहे. एक साधक जेव्हा दुसर्‍या साधकाची चूक सांगत असतो, तेव्हा त्या साधकातील अहंचा लय होतो आणि अहंचा मृत्यू होत असतो, म्हणजे साधकाला अमृत प्राप्त होत असते.

अहंरूपी मृत्यूनंतरच साधकाला अमृत मिळते. अमृत म्हणजे अ + मृत. मृत म्हणजे विनाश. विनाशाचे भय दूर होऊन त्याला अविनाशित्व प्राप्त होते आणि तो आत्मस्थितीमध्ये स्थिर होतो.

६. सेवा करतांना भाव कसा ठेवावा ?

सदा सर्वदा योग तुझा घडावा ।
तुझे कारणी देह माझा पडावा ।।

अर्थ : समर्थ रामदासस्वामी म्हणतात, ‘हे श्रीरामा, माझ्या मनाला सदैव तुझेच स्मरण रहावे आणि तुझ्या सेवेसाठी हा देह सतत झिजावा.’

‘हे गुरुदेव, ‘माझ्या डोळ्यांसमोर सदैव तुमचेच रूप रहावे. सर्व रूपांमध्ये मला केवळ तुमचेच दर्शन व्हावे. माझा हा देह सदैव आपल्या सेवेतच कार्यरत रहावा आणि आपली सेवा करतच त्याचा अंत व्हावा’, असा भाव ठेवून प्रत्येक क्षणी आपल्याला सेवारत रहाता आले पाहिजे.

७. आवाहन म्हणजे काय ?

अनेक पूजा किंवा धार्मिक विधी यांमध्ये आपण भगवंताला आवाहन करतो. आवाहन म्हणजे, ‘हे भगवंता, आपण आपल्या वाहनासह यावे’, अशी देवाला प्रार्थना करणे. वाहन हे भगवंताचे सूक्ष्मातीसूक्ष्म रूपात प्रगटीकरण आहे (स्थुलात प्रगट होणे). ‘भगवंताचे वाहन हे साक्षात् भगवंताचेच रूप आहे’, असा आपला भाव असला पाहिजे.

८. व्यक्त भाव आणि अव्यक्त भाव यांमधील भेद

जेव्हा अतिथी आपल्या घरी येतात, तेव्हा आपण जर बसलेलो असलो, तर उठून उभे रहातो आणि आदराने अतिथींचे स्वागत करतो; कारण आपला अतिथीप्रती आदर असतो अन् आपण तो आदर व्यक्त करतो; परंतु घरात आईसमोर आपण उभे रहात नाही. तिने काही सांगितले, तर आपण आदराने अवश्य करतो.

येथे अतिथीच्या समोर आपण आदर व्यक्त करतो. घरात आईसमोर तिच्याप्रतीचा आपला आदर अव्यक्त असतो. व्यक्त भाव आणि अव्यक्त भाव यांमध्ये असाच भेद असतो. ‘व्यक्त भाव कुठे प्रगट करायचा ?’, हे आपण अनुभवाने शिकायला पाहिजे.’

– (सद्गुरु) डॉ. चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती. (१४.४.२०२३)

संग्राहक : कु. मनीषा माहुर, देहली सेवाकेंद्र, देहली. (१४.४.२०२३)