१. जिज्ञासूंना संपर्क करतांना ‘परात्पर गुरु डॉ. आठवले समवेत असून तेच सर्वकाही करून घेतात’, याची जाणीव मनाला सतत होत असल्याने भीती न्यून होणे
‘वर्ष २००७ पासून मी साधनेत आहे. साधना करण्याआधी मला समाजात वावरतांना पुष्कळ भीती वाटत होती. मला कुणाशी बोलायचे असले, तरी बोलण्याचे धाडस व्हायचे नाही. नंतर मी साधना करू लागले. सत्संगात जाणे, नामजप करणे, सेवेच्या माध्यमातून अध्यात्मप्रसार करतांना इतरांशी संपर्क करणे इत्यादी साधनेची अंगे कृतीत आणल्यामुळे माझ्यात आत्मविश्वास निर्माण झाला. अध्यात्मप्रसारासाठी संपर्क करतांना साधकांकडून ‘समाजातील जिज्ञासूंशी कसे बोलायचे ?’, हे मी शिकले. आता मी जिज्ञासूंना सहज संपर्क करू शकते. हे केवळ परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेमुळे होऊ शकले. आता बाहेर सेवेला जातांना ‘परात्पर गुरु डॉ. आठवले माझ्या समवेतच आहेत’, या जाणिवेमुळे मला भीती वाटत नाही.
२. मंदिराची स्वच्छता करतांना गुरूंवरील दृढ श्रद्धेमुळे मन निर्विचार होणे
मी एका मंदिराच्या स्वच्छतेसाठी गेले होते. त्या वेळी मी मंदिरात महादेवाच्या गाभार्याची स्वच्छतेची सेवा करत होते. ती सेवा माझ्याकडून गुरुमाऊलीने भावपूर्ण आणि एकरूप होऊन करून घेतली. सेवा करतांना माझ्या मनात कोणताच विचार नव्हता.
३. यजमान कारखान्यात काम करत असतांना यंत्राचा एक भाग अचानक तुटून त्यांच्या छातीवर आपटूनही परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेमुळे त्यांचे प्राण वाचल्याची जाणीव होणे
मंदिराची स्वच्छता करून मी घरी आल्यावर मला समजले, ‘माझे यजमान (श्री. पंकज चव्हाण) यांचा अपघात झाला आहे.’ मी यजमानांना बघायला रुग्णालयात गेले. त्यांनी मला घडलेला सर्व प्रसंग सांगितला. ते मला म्हणाले, ‘‘मी यंत्रावर पत्र्याचा तुकडा कापण्यासाठी गेलो होतो. त्या वेळी पत्र्याचा तुकडा कापतांना यंत्राचा एक भाग (पार्ट) तुटला. त्याचा एक तुकडा माझ्या छातीवर आणि दुसरा तुकडा माझ्या उजव्या हाताच्या तीन बोटांवर पडला. यंत्राचा तो तुकडा माझ्या छातीवर एवढ्या जोरात आपटला की, ‘आता आपले सर्व संपले. आता मी मरणार’, असे मला वाटले. त्या वेळी मला वेदनाही पुष्कळ होत होत्या. नंतर मी पाहिले की, यंत्राचा तुकडा खिशातील भ्रमणभाषवर आपटल्यामुळे मला तेथे जखम झाली नाही.’’ हे सर्व ते सांगत असतांना ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांनीच त्यांना वाचवले आहे’, असे मला वाटले आणि माझ्या डोळ्यांतून भावाश्रू वाहू लागले.
४. अपघाताच्या घटनेमुळे यजमानांचा साधनेला असलेला विरोध अल्प होऊन त्यांची गुरुदेवांवर श्रद्धा बसणे
मला यजमान स्वतःहून म्हणाले, ‘‘तुझे गुरुदेव आणि तू महादेवाची सेवा करत होतीस; म्हणून महादेव यांच्या कृपेने मला वाचवले.’’ त्या वेळी ‘गुरुदेव सर्व साधकांच्या कुटुंबाची किती काळजी घेतात !’, हे मला अनुभवायला मिळाले. तेव्हापासून माझे यजमान माझ्या साधनेला विरोध करेनासे झाले. त्यांची गुरुदेवांवर श्रद्धा बसली.
५. आधुनिक वैद्य यजमानांच्या हाताचे शस्त्रकर्म करत असतांना ‘स्वतः गुरुमाऊलीच ते करत आहे’, असा भाव अखंड असणे
यंत्रामुळे यजमानांची तीन बोटे तुटली होती. त्यांचे शस्त्रकर्म होते. त्या वेळी ‘शस्त्रकर्म आधुनिक वैद्यांच्या माध्यमातून स्वतः गुरुमाऊलीच करत आहेत’, असा माझा भाव अखंड होता. त्यामुळे अवघड असे शस्त्रकर्म सहज झाले आणि त्यांची बोटे व्यवस्थित झाली.’
– सौ. सविता पंकज चव्हाण, कराड, जिल्हा सातारा. (१६.६.२०२२)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |