१. ‘मी प्रतिदिन कलशातील नारळाला अभिषेक करून चंदन, हळद, कुंकू आणि अक्षता लावते. त्या अक्षतांचा आकार कधी ‘ॐ’सारखा, तर कधी स्वस्तिकासारखा होतो.
२. नामजप करतांना आसन देव्हार्याच्या दिशेने सरकणे आणि देवतेची शक्ती शरिरात जाऊन शरीर आतून पुष्कळ मोठे होत असल्याचे जाणवणे
नामजप करतांना मी चौरंगासारख्या एका लहानशा पटलावर कापडी आसन घालून बसते. नामजपाला आरंभ केल्यावर मी ज्या आसनावर बसते, ते आसन हळूहळू देव्हार्याच्या दिशेने सरकू लागते. नामजप करतांना ‘देवतेची शक्ती माझ्या शरिरात जाऊन शरीर आतून पुष्कळ मोठे होत आहे’, असे मला वाटते.
३. साईबाबांनी सूक्ष्मातून दत्तगुरूंची उपासना करण्यास सांगणे
बर्याच वर्षांपूर्वी दसर्याच्या दिवशी अकस्मात् साईबाबा सूक्ष्मातून घरी आले. त्यांनी मला सांगितले, ‘आता तू दत्तगुरूंची उपासना कर.’ मी साईबाबांची पोथी वाचत असल्याने त्या वेळी माझे मन दत्तगुरूंची उपासना करण्यास सिद्ध नव्हते; परंतु सत्संगात आल्यावर ‘माझी आध्यात्मिक उन्नती होण्यासाठीच साईबाबांनी मला येऊन तसे सांगितले होते’, याचा मला प्रत्यय आला.
४. स्वप्नात रामनाथी आश्रमात श्री भवानीदेवीची पूजा चालू असल्याचे दिसणे आणि नंतर श्री भवानीदेवीच्या ठिकाणी निळसर रंगाचा हसरा बाळकृष्ण दिसणे
एकदा मला स्वप्नात रामनाथी आश्रम दिसला. आश्रमातील वरच्या माळ्यावरील मोकळ्या जागेत श्री भवानीदेवीची पूजा चालू होती. देवीच्या गळ्यात हार घातला होता. देवीसमोर धूप, दीप आणि उदबत्ती लावून सर्व जण देवीला प्रार्थना करत होते. त्यानंतर अकस्मात् सर्व शांत झाले आणि त्या ठिकाणी ‘केवळ देवी अन् मी आहोत’, असे मला दिसले. नंतर त्या ठिकाणी मला श्री भवानीदेवी न दिसता निळसर रंगाचा हसरा सचेतन बाळकृष्ण दिसू लागला. त्यानंतर मला जाग आली. त्या वेळी पहाटेचे ५.३० वाजले होते.
५. कुत्रा मेल्याने घरातील वातावरणात नकारात्मकता जाणवणे, देवीला प्रार्थना केल्यावर देव्हार्यातील कलशावरील नारळ फुटल्याने मोठा आवाज येणे आणि ‘देवीने नारळाच्या माध्यमातून संकट दूर केले’, असे जाणवणे
मी पाळलेल्या कुत्र्याचे अकस्मात् निधन झाले. त्यामुळे घरातील वातावरणात नकारात्मकता जाणवत होती. त्या वेळी मी देवीला ‘संकटकाळी उभी रहा’, अशी प्रार्थना करत होते. अमावास्येच्या आदल्या दिवशी माझा मुलगा देवघरात बसलेला होता. त्या वेळी त्याला मोठा आवाज आला. त्याने घाबरून मला हाक मारली. देव्हार्यातून आवाज आला होता. त्यामुळे मी देव्हार्यात पाहिले; परंतु आरंभी मला काही कळले नाही. नंतर कलशावरील नारळाकडे माझे लक्ष गेले. नारळाला तडा जाऊन तो फुटला होता आणि आतील खोबरे दिसत होते. त्या वेळी मला वाटले, ‘देवीने नारळाच्या माध्यमातून संकट दूर केले.’ दुसर्या दिवशी सकाळी कलशातील पाणी पालटून नवीन नारळ ठेवावा; म्हणून मी कलशातील पाणी झाडांना घालण्यासाठी गेले. तेव्हा ‘ते पाणी फिकट लालसर होते’, असे माझ्या लक्षात आले. अशा प्रकारे पुष्कळ वेळा ‘देवी रक्षण करते’, अशी अनुभूती मला आली आहे.
६. मंदिरात नामजप करत असतांना समोरील काचेचा दरवाजा फुटणे; परंतु काचेचा एकही तुकडा न लागणे आणि त्या वेळी देवाचे अस्तित्व जाणवून देवानेच रक्षण केल्याची प्रचीती येणे
मी एका मंदिरात नामजप करत बसले होते. माझ्या समोर बाजूला सरकवण्याचा (स्लायडिंगचा) काचेचा दरवाजा होता. अकस्मात् बाहेरून एक व्यक्ती येऊन दरवाजावर आदळली. त्यामुळे काच फुटली आणि माझ्या आजूबाजूला सर्वत्र काचेचे तुकडे पडले. आजूबाजूच्या सर्व मंडळींना वाटले, ‘मला काचेचा तुकडा लागला असेल’; परंतु मला काचेचा एकही तुकडा लागला नाही. त्या वेळी मला तिथे देवाचे अस्तित्व जाणवले. देवानेच माझे रक्षण केले.’
– श्रीमती प्रियांका पांडुरंग सावंत, ठाणे (१०.७.२०२०)
|