Liquor:संगमेश्वर येथे ४ लाख ६५ सहस्र १२० रुपयांचा गोवा बनावटीचा मद्यसाठा जप्त

गोवा बनावटीचा मद्यसाठा जप्त

रत्नागिरी – मुंबई-गोवा महामार्गावर राज्य उत्पादन शुल्काच्या रत्नागिरी विभागाने ११ डिसेंबरच्या पहाटे संगमेश्वर बसस्थानकासमोर ४ लाख ६५ सहस्र १२० रुपयांचा  गोवा बनावटीचा मद्यसाठा जप्त केला. या कारवाईत ओंकार इंद्रजीत सावंत आणि वैभव मनोज कांबळी यांना कह्यात घेऊन गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, संचालक सुनील चव्हाण, विभागीय उपायुक्त विजय चिंचाळकर आणि रत्नागिरी जिल्ह्याचे अधीक्षक सागर धोमकर यांच्या मार्गदर्शनाखाली नाताळ आणि ३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर महामार्गावर गस्त घालण्यास प्रारंभ करण्यात आला आहे.

गोवा राज्य बनावट मद्याची वाहतूक होणार असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाला मिळाल्यानंतर या पथकाने संगमेश्वर बसस्थानकासमोर वाहनांची तपासणी केली. या तपासणी दरम्यान गोव्याच्या दिशेकडून येणार्‍या राखाडी रंगाच्या चारचाकी वाहनाला थांबवण्याचा प्रयत्न केला असता चालकाने वाहन न थांबवता भरधाव वेगाने पळ काढत होता; मात्र भरारी पथकाने त्याला अडवले. या वाहनाची तपासणी केली असता गोवा बनावटी विदेशी मद्याचे विविध ‘ब्रॅण्ड’चे एकूण ४ लाख ६५ सहस्र १२० रुपये किमतीचे ८१ मद्याचे बॉक्स मिळाले. या कारवाईत वाहनासहीत एकूण १६ लाख ६५ सहस्र १२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.