US Hate Crime : अमेरिका भारतियांविरुद्धच्या द्वेषपूर्ण गुन्ह्यांचे अन्वेषण करणार !

१२ राज्यांमध्ये विशेष आयोग स्थापन

वॉशिंग्टन – अमेरिका भारतियांच्या विरोधातील द्वेषपूर्ण गुन्ह्यांचे (हेट क्राइम) अन्वेषण  करणार आहे. अमेरिकेतील १२ राज्यांमध्ये भारतियांसाठी विशेष आयोग स्थापन करण्यात आले आहेत. यामध्ये भारतियांच्या विरोधातील द्वेषाच्या गुन्ह्यांची विशेष सुनावणी होणार आहे. पहिल्या टप्प्यात आयोगाला २० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. न्यूयॉर्कसह कॅलिफोर्निया, मेरीलँड आणि मिशिगन या राज्यांमध्ये सिद्ध करण्यात आलेल्या विशेष आयोगांना न्यायिक अधिकारही देण्यात आले आहेत. आयोग भारतियांच्या सुरक्षेच्या सूत्रांसह सांस्कृतिक हितसंबंधांची काळजी घेईल.

कोरोनानंतर द्वेषपूर्ण गुन्ह्यांमध्ये वाढ !

कोरोनाच्या कालावधीनंतर अमेरिकेत भारतियांविरुद्ध द्वेषपूर्ण गुन्ह्यांच्या घटना अनेक पटींनी वाढल्या आहेत. कामाच्या ठिकाणीही भारतियांविरुद्ध भेदभावाची प्रकरणे नोंदवली गेली आहेत. ‘प्यू रिसर्च’ संस्थेच्या मते, गेल्या दोन वर्षांत पोलीस सुरक्षा तपासणीच्या नावाखाली भारतियांविरुद्ध जातीय भेदभावाच्या घटनांमध्ये २५ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे.

अर्थव्यवस्थेत भारतियांची महत्त्वाची भूमिका !

अमेरिकेत रहाणार्‍या भारतियांना ‘आदर्श प्रवासी’ म्हटले जाते. ‘अर्थव्यवस्थेतही त्यांची महत्त्वाची भूमिका आहे’, असे न्यूयॉर्क राज्य विधानसभेच्या सदस्य जेनिफर राजकुमार यांनी म्हटले आहे. ‘भारतियांसाठी विशेष आयोग सिद्ध करणे, हे अमेरिकेतील एक ऐतिहासिक पाऊल आहे’, असेहीजेनिफर यांनी म्हटले आहे.