चीनने वायूप्रदूषण अल्प केल्याचा परिणाम
नवी देहली – भारतातील अनेक शहरांना वायूप्रदुषणाच्या समस्येने भेडसावले आहे. पूर्वी ‘जगातील सर्वाधिक प्रदूषित शहरां’च्या सूचित चीनमधील अधिकाधिक शहरांचा समावेश होता; मात्र आता परिस्थिती पालटली आहे. चीनमधील शहरांतील वायूप्रदूषण अल्प करण्यासाठी कठोर पावले उचलल्यामुळे तेथील अनेक शहरांमधील वायूप्रदूषणाची पातळी घटली आहे. वर्ष २०१७ मध्ये, म्हणजे ६ वर्षांपूर्वी चीनमधील ७५ शहरे आणि भारतातील १७ शहरे जगातील सर्वाधिक प्रदूषित शहरांच्या सूचित अंतर्भूत होती. ६ वर्षांनंतर ही परिस्थिती पूर्णपणे पालटली आहे. वर्ष २०२२ मधील १०० सर्वाधिक प्रदूषित शहरांपैकी ६५ भारतातील, तर केवळ १७ शहरे चीनमधील होती.
१. वर्ष २०१४ मध्ये चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी, ‘वायूप्रदूषण ही बीजिंगची सर्वांत मोठी समस्या आहे’, याची स्वीकृती दिली. त्यानंतर चीनने अनेक महत्त्वाची पावले उचलली.
२. चीनने वायूप्रदूषण रोखण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर कृती योजना आखून त्यासाठी अनुमाने २२.५ लाख कोटी रुपयांची तरतूद केली.
३. या योजनेच्या अंतर्गत बीजिंग, शांघाय आणि ग्वांगझू या मोठ्या शहरांमध्ये वाहनांची संख्या नियंत्रित केली. लोह आणि पोलाद उद्योगांसारख्या अवजड उद्योगांसाठी प्रदूषणाचे कठोर नियम केले. चीनने अनेक कोळसा ऊर्जा प्रकल्प बंद करून नवे प्रकल्प उभारण्यास बंदी घातली.
४. शिकागो विद्यापिठातील ‘एनर्जी पॉलिसी इन्स्टिट्यूट’च्या मते, ‘चीनच्या या निर्णयांमुळे वर्ष २०१४ ते २०२१ पर्यंत चीनमधील वायू प्रदूषणात ४२.३ टक्क्यांनी घट झाली.’
संपादकीय भूमिकावायू प्रदूषण रोखण्यासाठी चीन जे करू शकतो, ते भारत का नाही करू शकत ? |