टोकीयो (जपान) – जपानमधील ‘इंटरस्टेलर टेक्नोलॉजीस’ या आस्थापनाने गायीच्या शेणापासून इंधन बनवले असून त्याद्वारे रॉकेट (प्रक्षेपास्त्र) इंजिन यशस्वीपणे चालवण्यात आले. या इंधनाची चाचणी घेतली असता रॉकेटमधून १५ मीटर अंतरापर्यंत ज्वाळा निघाल्या होत्या. याचा व्हिडिओ संकेतस्थळावर प्रसारित झाला आहे. या रॉकेटला विकसित करणारे आस्थापन आणखी मोठे रॉकेट बनवण्याचा प्रयत्न करत आहे.
सौजन्य : इरो न्यूज
१. ‘बॅरन’ या संकेतस्थळावर या घटनेचे वृत्त प्रसिद्ध करण्यात आले आहे. या इंधनाची चाचणी जपानच्या तायकी शहरामध्ये करण्यात आली. या रॉकेटमध्ये गायीच्या शेणापासून बनवलेल्या इंधनाचे नाव ‘बायोमीथेन’ आहे. गोपालन करणार्या स्थानिक लोकांकडून यासाठी शेण विकत घेण्यात आले होते. त्याद्वारे प्रथम गॅस आणि नंतर त्यातून इंधन विकसित करण्यात आले.
२. ‘इंटरस्टेलर टेक्नोलॉजीस’चे मुख्य कार्यकारी अधिकारी ताकाहिरो इनागावा यांनी सांगितले की, गायीच्या शेणापासून बनवलेल्या इंधनाचा वापर केवळ पर्यावरणाला लाभ होण्यासाठीच केलेला नाही, तर याचा वापर स्थानिक स्तरावरही करता येऊ शकतो. तो एक स्वस्त आणि शुद्ध आहे. आम्ही हे सांगू शकत नाही की, याचा वापर संपूर्ण जगाने करावा; मात्र आम्ही एक खासगी आस्थापन आहे आणि आम्ही त्याचा वापर करत आहोत.
३. ‘इंटरस्टेलर’ने ‘एअरवॉटर’ या आस्थापनाशी करार केला आहे. हे आस्थापन शेतकर्यांकडून बायोगॅस गोळा करते. तसेच या आस्थापनाची मोठी गोशाळा असून तेथील गायींच्या शेणापासून बायोगॅस बनवले जाते.
४. या प्रयोगामधील एका अभियंते तोमोहिरो निशिकावा यांनी सांगितले की, या क्षेत्रातील गायींमध्ये पुष्कळ क्षमता आहे. जपानकडे एक असे इंधन स्रोत असावे, ज्यामुळे विदेशावर यासाठी अबलंबून रहावे लागू नये.
५. रॉकेटच्या इंजिनसाठी गायीच्या शेणातून बनवलेल्या इंधनाचा वापर होत असल्याने स्थानिक गावकरी आणि पशूपालक आनंदी आहेत. त्यांचे म्हणणे आहे की, अशा इंधनापासून रॉकेट उडतांना पहाणे सुखद असेल. या गावकर्यांनी जपान सरकारला याविषयी पुढाकार घेण्याचे आवाहन केले आहे.
संपादकीय भूमिकागायीच्या शेणाला आणि गोमूत्राला हीन लेखणार्यांना आतातरी त्यांचे महत्त्व कळेल का ? |