…‘महाराष्ट्र मंदिर न्यास परिषदे’चा आरंभ झाला !
महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये दौरा केल्यानंतर मंदिर क्षेत्राशी संबंधित मंदिर विश्वस्त, मंदिरातील पुजारी आणि पुरोहित यांना अन् मंदिरांशी संबंधित असलेल्या बर्याचशा अडचणी सातत्याने समोर आल्याने लक्षात येत होत्या. त्याविषयी ‘मंदिरांच्या संदर्भात आपण संघटनात्मक काहीतरी कृती करूया, एकत्र येऊया’, असा विचार गुरुमाऊलींच्या कृपेने प्रकर्षाने मनामध्ये येत होता. ‘या विचारांना दिशा कशी देऊ ?’, असा प्रश्न मनात असतांना उत्तर महाराष्ट्रामध्ये कोरोना महामारीच्या कालावधीनंतर मंदिर विश्वस्तांची बैठक पार पडली. त्या बैठकीला
५१ हून अधिक सदस्य उपस्थित होते. या बैठकीमध्ये मंदिरांशी संबंधित बर्याच गोष्टींची चर्चा झाली. त्यांच्या अडचणी, त्यांनी केलेले चांगले प्रयत्न, मंदिरांच्या सुव्यवस्थापनासाठी मंदिराला धर्मादाय आयुक्त कार्यालयातून येणार्या अडचणी, मंदिरांच्या जागांच्या समस्या, मंदिरांवर लावलेले दावे अशा विविध प्रकारच्या समस्या अन् त्याच्या उपाययोजना यांची चर्चा झाली. यानंतर ‘इरिगेशन’ आस्थापनाचे मालक आणि ‘पद्मालय’ देवस्थानचे अध्यक्ष श्री. अशोक जैन म्हणाले, ‘आपण व्यापक स्तरावर या संदर्भात काही प्रयत्न करू शकतो का ?’ सर्वांशी चर्चा केल्यानंतर ‘महाराष्ट्रामध्ये मंदिरांचे व्यापक संघटन करूया, मंदिरांना साहाय्य करूया, त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करूया’, हा विचार झाला आणि ‘महाराष्ट्र मंदिर-न्यास परिषदे’चा आरंभ झाला !
महासंघ मंदिरांच्या समस्या सोडण्यासाठी प्रयत्न करू शकतो, हा आत्मविश्वास निर्माण झाला !
४ आणि ५ फेब्रुवारी २०२३ या दिवशी महाराष्ट्र मंदिर महासंघाची पहिली परिषद पार पडली. या परिषदेला महाराष्ट्रातून २७४ हून अधिक मंदिर विश्वस्त, पुरोहित, पुजारी, मंदिर क्षेत्रात कार्य करणारे अधिवक्ते आणि मान्यवर, तसेच संत यांची उपस्थिती होती. ही परिषद अतिशय यशस्वीरित्या पार पडल्यानंतर आयोजक आणि मंदिर विश्वस्त यांच्यात आत्मविश्वास निर्माण झाला की, मंदिरांच्या समस्या सोडवायच्या असतील, तर आपण एकत्र येऊन प्रयत्न करायला, लढायला पाहिजे. आज या निमित्ताने जे संघटन झालेले आहे, ते सातत्याने चालू ठेवल्यास मंदिर विश्वस्त अन् पुजारी यांच्या समस्या सोडवण्यासाठी व्यासपीठ निर्माण होईल. त्या माध्यमातून पुढे जाता येईल. ‘महाराष्ट्र मंदिर महासंघ हे करू शकतो’, असा आत्मविश्वास सर्वांच्या मनात निर्माण झाला.
मंदिर संघटनाचे महत्त्व जाणून मंदिर महासंघ पुढे सरसावला !
मंदिरांच्या संघटनाची आवश्यकता का ? आज सर्वच क्षेत्रांत संघटन आहे. कामगारांचे संघटन आहे, महिलांचे संघटन आहे, आधुनिक वैद्यांचे संघटन आहे, अधिवक्त्यांचे संघटन आहे. प्रत्येक क्षेत्रात संघटन असतांना हिंदु धर्मात व्यापक स्तरावर काम करणार्या मंदिर व्यवस्थेत ते का नाही ? मंदिर संस्कृती किंवा मंदिर व्यवस्था धर्माचा मूलभूत आधार आहे. असे असतांना आतापर्यंत ते संघटित का झाले नाहीत ? मंदिराला आलेल्या अडचणी, समस्या याविषयी एकटेच लढत का राहिले ? त्याच्यामुळे कुठेतरी न्याय मिळाला नाही, अडचणी सुटल्या नाहीत आणि स्वतःच्या स्तरावर प्रयत्न होत राहिल्याने मनात एकप्रकारे दडी निर्माण झाली की, आपण काही करू शकत नाही. अशा स्थितीतीच मंदिरांचे संघटन करण्यासाठी मंदिर महासंघ पुढे सरसावला !
मंदिरांवरील आघात रोखण्यासाठी संघटित आणि व्यापक होण्याची आवश्यकता !
मंदिरांच्या संदर्भात एखादी घटना घडल्यानंतर, उदा. नागपूरच्या गणेश मंदिरात मूर्तीची विटंबना झाली, तर पुण्यातील गणेश मंदिराशी संबंधित असणारा शांत का बसतात ? दोन्ही ठिकाणी ‘गणपति’ एकच आहे. असे असतांना त्याच्याविषयी मनामध्ये दोन्ही जिल्ह्यांतील गणेशभक्तांमध्ये एकच भावना का नाही ? याचे कारण आहे, व्यापक विचार नसणे किंवा संकुचित विचार ठेवून आपल्या मंदिरापुरता विचार करणे, हे आहे. हे लक्षात घेऊन मंदिर विश्वस्तांना एकत्रित आणून त्यांना व्यापक बनवण्यासाठी त्यांचे संघटन करणे चालू केले !
पंचसूत्रीच्या आधारे कार्य !
संघटन, समन्वय, सुरक्षा, सुव्यवस्थापन आणि सनातन धर्मप्रचाराचे केंद्र या पंचसूत्रींच्या आधारे मंदिर महासंघ कार्य करेल. महासंघाच्या स्थापनेचा मुख्य उद्देश काय ? तर मंदिरे सरकारमुक्त करणे ! कोणतेही निधर्मी सरकार स्वतःला व्यवस्थित चालवू शकत नाही, तर हिंदूंची मंदिरे कह्यात घेऊन ते कसे चालवू शकते ? आज मशीद आणि मदरसा यांच्यासाठी ‘वक्फ बोर्ड’ आहे, चर्चसाठी ‘डायोसेशन सोसायटी’ आहे. मग मंदिरांचे मात्र सरकारीकरण का ? मंदिरांसाठीसुद्धा एका स्वतंत्र मंडळाची स्थापना व्हायला पाहिजे आणि मंदिरे सरकारमुक्त होऊन भक्तांच्या कह्यात दिली गेली पाहिजेत. सरकारने कह्यात घेतलेले देशभरातील प्रत्येक मंदिर सरकारमुक्त होऊन भक्तांच्या कह्यात येत नाही, तोपर्यंत आणि त्यानंतरही संघर्ष लढा करण्याचा मंदिर महासंघाचा निर्धार आहे !
१. संघटन
मंदिरांच्या समस्या सोडवण्यासाठी मंदिरात येणार्या अडचणी सोडवण्यासाठी एकाच मंदिराने प्रयत्न केले, तर त्याला पुष्कळ कालावधी लागू शकतो; परंतु अनेक मंदिरे याविषयी मागणी करत आहेत, लढत आहेत, असे चित्र निर्माण झाले, असा दबाव गट निर्माण झाला, तर निश्चितपणे त्याची नोंद घ्यावी लागते. यासाठी मंदिरांचे संघटन होणे आवश्यक आहे.
२. समन्वय
आज महाराष्ट्रामध्ये अनेक अशी मंदिरे आहेत, त्यांचा आपापसांत संबंध नाही. एखाद्या मंदिराने चांगल्या प्रकारे सुव्यवस्थापन केलेले आहे; परंतु ते सुव्यवस्थापन आपल्या मंदिरात कसे लागू करू शकतो ?, याविषयी आपापसांत समन्वय नसल्यामुळे माहिती होत नाही. मंदिरांच्या जिर्णोद्धाराच्या संदर्भात येणार्या अडचणी कशा सोडवू शकतो ? सरकारी योजनांचा लाभ कसा करून घेऊ शकतो ? धर्मादाय आयुक्त कार्यालय अडचणी कशा सोडवू शकते ? या संदर्भात जर मंदिरांचा आपापसांत समन्वय झाला, तर निश्चितपणे त्याला साहाय्य होऊ शकते. हा समन्वय या व्यासपिठाच्या माध्यमातून करण्यात येईल.
३. सुरक्षा
अन्य धर्मियांच्या प्रार्थनास्थळांविषयी छोटीशी जरी घटना घडली, तरी त्यांच्या धर्मातील सर्व लोक एकत्र येतात आणि त्यांच्या प्रार्थनास्थळाची सुरक्षा करतात; परंतु त्यातलाच मागच्या ८ ते १० वर्षांचा आढावा घेतला, तर अनेक ठिकाणी मंदिरातील चोर्या, मंदिरातील मूर्तींचे भजन, मंदिरांची तोडफोड, मंदिरातील तिजोरीची चोरी अशा अनेक घटना घडत असतांना मंदिराच्या सुरक्षेविषयी काय उपाययोजना काढता येतील ? हे पहायला हवे. आज मंदिरांनी हाक दिली, तर खरंच किती मंदिरांशी जोडलेले भक्त एकत्र येतील ? उत्सवाच्या दिवशी किंवा कार्यक्रमासाठी येणारे अनुयायी नव्हे, तर मंदिरांच्या सुरक्षेसाठी पुढे येणारे खरंच किती भक्त असतील ? हा विचार केला, तर त्याचे उत्तर ‘नाही’ असे होते. त्यामुळे पहिल्या मंदिर परिषदेत सर्वांनी मंदिर सुरक्षेच्या संदर्भात निर्णय घेऊन एकत्र येण्यासाठी आणि भक्तांना तशी दिशा देण्यासाठी निर्धार करणे आवश्यक होते. तो करायला आरंभ केला.
४. सुव्यवस्थापन
आज मंदिरांचे व्यवस्थापन कसे असावे ? या संदर्भात विचार केल्यास महाराष्ट्रातील पहिले उदाहरण येते, ते म्हणजे शेगावचे गजानन महाराज यांचे मंदिर ! नगर जिल्ह्यातील गड या ठिकाणचे दत्त संस्थान, पावसचे स्वामी स्वरूपानंदांचे संस्थान, महाराज संस्थान अष्टविनायक मंदिर या मंदिरांनीही चांगल्या प्रकारचे सुव्यवस्थापन केलेले आहे. स्वच्छता किंवा सुव्यवस्थापन या दोन गोष्टींमुळे येणारा भाविक भक्त प्रभावित होतो आणि मंदिरांशी जोडला जातो. भाविकांच्या मनातील इच्छा असते की, मंदिरात गेल्यावर आपल्याला शांतपणे आणि समाधानाने देवदर्शन झाले पाहिजे. मंदिरात स्वच्छता असली पाहिजे. मंदिरात सेवेकरी आणि कर्मचारी यांनी सर्वांशी नम्रतेने वागले पाहिजे. या सर्व गोष्टी मंदिर सुव्यवस्थापनाशी संबंधित असतात. मंदिरातील हिशेब, लेखा, मंदिरातील आर्थिक व्यवहार आदी सर्वांचे व्यवस्थापन करणार्या अनेक चांगल्या गोष्टी इतरांकडून शिकता येतात. आदर्श मंदिरांशी सर्वांनी एकत्रितपणे समन्वय ठेवला आणि त्यांच्याकडून आपण शिकलो, तर महाराष्ट्रातील प्रत्येक मंदिर आदर्श सुव्यवस्थापन करेल. तो हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यातील मुख्य भाग असेल ! मंदिरांचे सुव्यवस्थापन करणे आवश्यक आहे, यासाठीची दिशा सर्वांना या मंदिर परिषदेतून मिळाली.
५. सनातन धर्मप्रचाराचे केंद्र
आज अन्य धर्मियांच्या प्रार्थनास्थळांमध्ये त्यांना त्यांच्या धर्माचे शिक्षण दिले जाते. मुसलमानांना मशिदींमध्ये, तर ख्रिस्त्यांना चर्चमधून धर्माचे शिक्षण मिळते; परंतु हिंदु बांधव, हिंदु भाविक भक्त यांना मंदिरातून धर्माचे शिक्षण मिळाले पाहिजे, अशी एक व्यवस्था मंदिरातच निर्माण झाली पाहिजे; कारण भाविक किंवा भक्त हे मंदिराशी जोडलेले असतात. पूर्वीच्या काळी मंदिरे ही धर्मशिक्षणाची केंद्रे होती. तेथे गुरुकुल, गोशाळा आणि वेदपाठशाळा चालायच्या. अशाच प्रकारे हिंदूंच्या प्रत्येक मंदिरातून धर्मशिक्षण दिले गेले, तर येणार्या काळामध्ये प्रत्येक हिंदु भाविक किंवा भक्त हा धर्मशिक्षित होईल. या व्यापक उद्देशाने मंदिरांमध्ये धर्मशिक्षण देणारे व्याख्यान घ्यावे, धर्मफलक लावावेत, ग्रंथालये चालू करावीत, या क्षेत्रात कार्यरत असणार्या संत-महंत यांची प्रवचने ठेवावीत; म्हणजे भाविक किंवा भक्त हे मंदिरांमध्ये येऊन केवळ दर्शन न घेता धर्मशिक्षित होऊनच बाहेर पडतील. धर्मशिक्षित प्रत्येक भाविक किंवा भक्त हा मंदिराचा आधार होऊ शकतो.
वरील पंचसूत्रीच्या आधारे कार्य करायचे ठरवल्यानंतर मंदिराचे विश्वस्त, पुरोहित, पुजारी यांना ते भावले. त्यामुळे या व्यासपिठाच्या माध्यमातून एकत्रित कार्य करण्याचा सगळ्यांनी निर्धार केला.
– श्री. सुनील घनवट, महाराष्ट्र आणि छत्तीसगढ राज्य समन्वयक, हिंदु जनजागृती समिती