देवद, पनवेल येथील कै. प्रभाकर प्रभुदेसाई यांचे २७.११.२०२३ या दिवशी वयाच्या ८१ व्या वर्षी कर्करोगामुळे निधन झाले. ९.१२.२०२३ या दिवशी त्यांचा निधनानंतरचा १३ वा दिवस आहे. त्या निमित्ताने आश्रमातील साधकांना त्यांच्याविषयी जाणवलेली सूत्रे आणि निधनानंतर आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.
१. गुणवैशिष्ट्ये
१ अ. श्रीमती शशिकला भगत (वय ६७ वर्षे)
१. ‘काका वयोवृद्ध असूनही आश्रमातील इतर वयोवृद्ध साधकांना साहाय्य करण्यासाठी त्यांना रुग्णालयात घेऊन जाण्याची सेवा सहजतेने करत.
२. ‘येणार्या परिस्थितीशी जुळवून घेऊन आनंदात कसे रहायचे’, हे काकांकडून शिकण्यासारखे होते.
३. काकांच्या प्रतिष्ठित लोकांशी पुष्कळ ओळखी होत्या. अनेक जण त्यांना मान देत; पण काकांचे बोलणे किंवा कृती यांतून कधीही अहंचा लवलेश जाणवला नाही.’
१ आ. श्री. प्रवीण नारखेडे (वय ६४ वर्षे)
१. ‘काकांमध्ये पुष्कळ प्रेमभाव होता. ते साधकांची आस्थेने विचारपूस करत असत.
२. त्यांच्या आजारपणाच्या काळात त्यांना प्रचंड वेदना होत होत्या आणि जेवता येत नव्हते. अन्न पातळ स्वरूपात ग्रहण करायला लागायचे; पण त्या काळातही त्यांची गुरुदेवांप्रती निष्ठा जाणवत होती. त्या परिस्थितीतही ते स्थिर होते.’
१ इ. सौ. संध्या जामदार (आध्यात्मिक पातळी ६४ टक्के, वय ७१ वर्षे), श्रीमती सुनंदा नाईक (वय ६५ वर्षे), श्रीमती रुक्मिणी पोशे (वय ७० वर्षे), श्रीमती अनुराधा माळगावकर (वय ६९ वर्षे), सुश्री मनीषा पोशे (वय ५० वर्षे)
१. ‘काका पुष्कळ मनमिळाऊ होते.
२. ते झोकून देऊन सेवा आणि साधना करत. ते त्यांना सांगितलेल्या सर्व सेवा नकार न देता अधिकाधिक भावपूर्ण आणि अचूक करत.
३. त्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत साधना केली. कर्करोगासारखा रोग बळावल्यावर त्यांनी त्या रोगाशी संघर्ष केला. ’
१ ई. श्री. कृष्णकुमार जामदार (वय ७३ वर्षे)
१. ‘त्यांच्या प्रेमळ स्वभावामुळे ते सर्वांना प्रिय होते आणि साधकांना त्यांचा आधार वाटायचा.’
१ उ. श्री. राजेंद्र नारायण सांभारे (आध्यात्मिक पातळी ६० टक्के, वय ६५ वर्षे), सनातन आश्रम, देवद, पनवेल.
१ उ १. आदर्श व्यक्तीमत्त्व : ‘कै. प्रभुदेसाईकाका यांची रहाणी साधी होती. ‘शांत स्वभाव, नम्रता, प्रामाणिकपणा आणि लीनता’, असे अनेक गुण त्यांच्यामध्ये होते. ते कधीही कुणाशीही उद्धटपणे, रागाने किंवा चिडून बोललेले माझ्या पहाण्यात आले नाही. ‘उच्चशिक्षित आणि उच्च शासकीय पदावर चाकरीतील काळ पूर्ण करणारी व्यक्ती’, असे ते आदर्श होते.
१ उ २. इतरांना साहाय्य करणे : सेवानिवृत्तीनंतर ते पनवेल येथील ‘लक्ष्मी नेत्र रुग्णालय’ येथे व्यवस्थापनात प्रशासकीय पदावर चाकरी करत होते. त्या वेळी त्यांनी सनातनच्या साधकांसाठी विनामूल्य नेत्र तपासणीच्या सुविधेला व्यवस्थापनाकडून मान्यता मिळवून दिली.
१ उ ३. तत्त्वनिष्ठ : प्रभुदेसाईकाका भावनिक स्तरावर न रहाता तत्त्वनिष्ठपणे वागत असत.
१ ऊ. सौ. राधा साळोखे (वय ३७ वर्षे), सनातन आश्रम, देवद, पनवेल.
१ ऊ १. आदर्श दिनचर्या : ‘काका पहाटे उठून दिनचर्येला आरंभ करून सेवा परिपूर्ण अधिकाधिक कशी करता येईल, यासाठी प्रयत्नरत असायचे. काकांना कर्करोग होण्याआधी ‘त्यांचे वय ८१ वर्षे आहे’, असे वाटत नव्हते. काका नियमित व्यायाम आणि योगासने करत. वयाच्या ४० व्या वर्षी चालू केलेली योगासने ते नियमित करत होते. त्यांनी देहाची योग्य काळजी घेतल्यामुळे ते ८० वर्षे वयापर्यंत सर्व प्रकारच्या सेवा करू शकत होते. त्यांनी त्यांच्या या क्षमतेचा संपूर्ण वापर गुरुसेवेसाठी केला.
१ ऊ २. गुरुदेवांवर दृढ श्रद्धा : काकांच्या कुटुंबियांना शारीरिक, मानसिक किंवा आध्यात्मिक स्वरूपाचे त्रास आहेत. काकांची गुरुदेवांवर दृढ श्रद्धा असल्याने त्यांनी याविषयी कधीही तक्रार केल्याचे आठवत नाही.’
२. अनुभूती
२ अ. निधनापूर्वी
२ अ १. सुश्री नलिनी राऊत, (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के) सनातन आश्रम, देवद, पनवेल.
२ अ १ अ. ‘मृत्यूपूर्वी कै. प्रभाकर प्रभुदेसाईकाका (वय ८१ वर्षे) देवद येथील सनातनच्या आश्रमाचे, तसेच आश्रमातील सर्व सद्गुरु, संत अन् साधक यांचे अखेरचे दर्शन घेऊन गेले’, असे वाटणे : ‘२७.११.२०२३ या दिवशी सकाळी ९ वाजता मी आश्रमसेवा झाल्यावर अल्पाहार घेऊन आश्रमाच्या लगत असलेल्या संकुलात निवासाच्या ठिकाणी जात होते. तेव्हा थोड्या अंतरावर मला प्रभुदेसाईकाका केशरी रंगाच्या झब्ब्यात चालत येतांना दिसले. त्यांना पाहून मला अतिशय आनंद झाला. माझ्या मनात विचार आला, ‘अरे वा ! प्रभुदेसाईकाका एवढे बरे झाले की, आता स्वतः चालत आश्रमात सेवेला येऊ लागलेत.’ (कै. प्रभुदेसाई काकांना कर्करोग झाल्याने ते मागील काही मासांपासून आश्रमात सेवेसाठी येत नव्हते.) ते माझ्यापासून दूर अंतरावर असल्यामुळे मी त्यांना भेटण्यासाठी न थांबता, ‘काका आता आश्रमातच येत आहेत’, असे मला वाटले आणि तिथे त्यांना भेटता येईल’, असा माझा विचार करून मी निवासाच्या खोलीत गेले. त्यानंतर सेवेच्या गडबडीत मी काकांचा विषय विसरून गेले.
त्याच दिवशी प्रभुदेसाईकाका यांचे निधन झाल्याचा निरोप आम्हाला मिळाला. तेव्हा मला वरील प्रसंग आठवला. मी सहसाधकांना हा प्रसंग सांगत असतांना त्यांनी गेल्या ८ दिवसांपासून काका उपचारांकरता रुग्णालयात भरती असल्याचे मला सांगितले. त्या वेळी मला पुष्कळ आश्चर्य वाटून असे जाणवले की, मृत्यूपूर्वी काका आश्रमाचे आणि आश्रमातील सर्व सद्गुरु, संत अन् साधक यांचे अखेरचे दर्शन घेऊन गेले.
अशी विलक्षण अनुभूती दिल्याबद्दल गुरुमाऊलीच्या प्रती कोटीशः कृतज्ञता व्यक्त झाली.’
२ आ. निधनानंतर
२ आ १. सौ. शुभांगी पात्रीकर (वय ७० वर्षे)
अ. ‘त्यांच्या पार्थिवाला नमस्कार करत असतांना ‘ते शांत झोपले आहेत’, असे मला वाटले आणि त्यांच्याकडे बघून मला सात्त्विकता जाणवली.’
२ आ २. सौ. स्मिता नाणोसकर
अ. ‘काकांचे निधन झाले, तेव्हा काका जसलोक रुग्णालयात होते. मला आणि एक साधिका यांना त्यांच्या घरी जायला सांगितले होते; म्हणून मी त्यांच्या घरी काकूंना भेटायला गेले होते. त्यांच्या घरी गेल्यानंतर त्यांच्या घरात पुष्कळ चांगले वाटत होते. काकांच्या खोलीत गेल्यानंतर छान वाटत होते. काकांचे निधन झाले, तरी त्यांच्या चेहर्यावर आनंद वाटत होता. ‘जणू काकांचा नामजप चालूच आहे’, असे मला वाटले.’
२ आ ३. श्री. राजेंद्र नारायण सांभारे, सनातन आश्रम, देवद.
अ. प्रभुदेसाईकाकांच्या पार्थिवाचे दर्शन घेतांना मला त्यांचा चेहरा निरागस दिसला. मला त्यांच्या चेहर्यावर तेज जाणवत होते. ‘ते शांत झोपले आहेत’, असेच मला जाणवत होते. ‘त्यांच्यातील सात्त्विकतेमुळे ते सजीव आहेत’, असे मला जाणवले.’
(सर्व सूत्रांचा दिनांक १.१२.२०२३)