‘८.११.२०२३ या दिवशी अकोला येथील मोहन माधव जडी यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय ७५ वर्षे होते. आज ९.१२.२०२३ या दिवशी त्यांचे मासिक श्राद्ध आहे. त्यानिमित्त त्यांच्या कुटुंबियांना कै. मोहन जडी यांच्या निधनापूर्वी आणि निधनानंतर त्यांच्याविषयी जाणवलेली सूत्रे येथे दिली आहेत.
१. श्रीमती प्रतिभा मोहन जडी (कै. मोहन जडी यांच्या पत्नी), अकोला
१ अ. ‘माझे यजमान नेहमी उत्साही आणि तत्पर होते. ते प्रत्येक सेवा समयमर्यादेत करत असत.
१ आ. शेवटच्या क्षणापर्यंत नित्यकर्मे आणि सेवा करणे : ८.११.२०२३ या दिवशी माझ्या यजमानांनी सकाळी लवकर उठून नित्याची कामे केली, उदा. गीतेचा पंधरावा अध्याय म्हणणे, व्यंकटेश स्तोत्र म्हणणे, बगलामुखी स्तोत्र ऐकणे, नामजप करणे. त्यांनी सकाळी ‘सनातन प्रभात’ नियतकालिकांच्या वाचकांना भेटकार्डे, आकाशकंदिल आणि सनातन पंचांग नेऊन दिले. त्यानंतर दुपारी त्यांचे आकस्मिक निधन झाले.
१ इ. यजमानांनी बनवलेल्या वैशिष्ट्यपूर्ण यंत्राचे परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी कौतुक करणे : यजमान कुशल कारागीर (मेकॅनिक) होते. त्यांनी घरी एक यंत्र बनवले होते. त्या यंत्रातील पृष्ठाच्या अर्ध्या बाजूला प.पू. भक्तराज महाराज यांच्याविषयी काही प्रश्न लिहिले होते आणि दुसर्या अर्ध्या भागात त्यांची उत्तरे वर-खाली अशा पद्धतीने लिहिली होती. प्रश्नाच्या योग्य उत्तरावर वायरची दोन टोके ठेवल्यावर पृष्ठाच्या वरच्या भागात असलेला लहान दिवा (बल्ब) लागत असे. काही वर्षांपूर्वी यजमान रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात गेले होते. तेव्हा त्यांनी हे यंत्र परात्पर गुरु डॉ. आठवले यांना दाखवले. परात्पर गुरु डॉ. आठवले यांना ते यंत्र आवडले. त्यांनी यजमानांना खाऊ आणि श्रीकृष्णाची मूर्ती भेट दिली. यजमान ती मूर्ती आमच्या घरी येणार्या सर्व साधकांना दाखवत असत.
१ ई. कुटुंबियांना साधनेत साहाय्य करणे : आम्ही सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना चालू केल्यावर कुलदेवता आणि दत्त यांचा नामजप करू लागलो. त्यामुळे आमच्या कुटुंबियांत पालट झाला. मी सतत सेवेत असे; मात्र यजमानांनी मला कधीही विरोध केला नाही. आमच्या घरी सत्संग, शिबिर किंवा अन्य सोहळा असल्यास ते मला साहाय्य करत.
१ उ. शिर्डीच्या साईबाबांवर श्रद्धा असणे : यजमानांच्या लहानपणी ते शिर्डीला जात असतांना रेल्वेगाडीच्या खाली आले होते. तेव्हा सर्वांना वाटले, ‘हा मुलगा गेला’; मात्र त्यांचा जीव वाचला. तेव्हापासून यजमानांच्या मनात साईबाबांविषयी पुष्कळ भाव होता. ‘साईबाबांनीच माझे रक्षण केले. त्यांचा मला आशीर्वाद आहे’, असा त्यांचा भाव होता.
१ ऊ. संत, सद्गुरु आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या प्रती भाव : यजमान घरी येणार्या प्रत्येक साधकाशी हसून आणि हात जोडून बोलत असत. आमच्या घरी संतांचा निवास असल्यावर यजमानांना आनंद होत असे. ‘सद्गुरु नंदकुमार जाधव किंवा पू. अशोक पात्रीकर घरी येणार आहेत’, असे समजल्यावर ‘साक्षात् परम पूज्य (परात्पर गुरु डॉ. आठवले) घरी येत आहेत’, असा यजमानांचा भाव असे. ते परम पूज्यांविषयी बोलत असतांना त्यांचा भाव दाटून येत असे.’
२. श्री. अमोल जडी (कै. मोहन जडी यांचा मोठा मुलगा), संभाजीनगर
अ. ‘बाबांचे निधन झाल्याचे समजल्यावर मी प्रार्थना करून स्थिर रहाण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी मला स्थिर रहाता आले. मी ४ – ५ घंटे चारचाकी गाडी चालवून अकोला येथे पोचलो.
आ. घरी आल्यावर मला शांत वाटत होते. ‘बाबा झोपले आहेत. ते माझ्या जवळ आहेत’, असे मला जाणवत होते.
इ. बाबांच्या अंत्यसंस्काराच्या विधीच्या वेळी घरात सर्व जण नामजप करत होते. त्या वेळी मी स्थिर आणि शांत होतो.
ई. पिंडाला कावळा शिवण्याच्या विधीच्या वेळी त्या परिसरात एकही कावळा दिसत नव्हता. आम्ही पिंड एका भिंतीवर ठेवून घरी गेलो. दुसर्या दिवशी सकाळी ४ वाजता मला स्वप्नात दिसले, ‘एका कावळ्याने पिंडाला शिवले आणि पिंड खाली पडला आहे.’ दुसर्या दिवशी आम्ही स्मशानात गेल्यावर माझा भाऊ मला म्हणाला, ‘‘पिंडाचा अर्धा भाग खाल्ला गेला आहे आणि अर्धा भाग भिंतीवरून खाली पडला आहे.’’ मला स्वप्नात जसे दिसले, तसेच घडलेले होते. ही गुरुदेवांची कृपा आहे.’
३. श्री. अभिनय जडी (कै. मोहन जडी यांचा लहान मुलगा), अकोला
३ अ. स्थिर रहाता येणे : ‘बाबा अकस्मात् बेशुद्ध झाल्यावर आम्ही त्यांच्यावर प्रथमोपचार केले आणि त्यांना रुग्णालयात नेले. तेव्हा मी ‘देवा, तुझ्या इच्छेप्रमाणे होऊ दे. मला आई आणि कुटुंबातील अन्य सदस्य यांना सांभाळायचे आहे. मला शक्ती दे’, अशी प्रार्थना केली. देवाच्या कृपेने मला या प्रसंगात स्थिर रहाता आले.
३ आ. घरात पार्थिव असतांनाही दाब न जाणवणे : घरात बाबांचे पार्थिव रात्रभर ठेवले होते; मात्र घरात कोणताही दाब जाणवत नव्हता. आम्ही नामजपादी उपाय करत होतो. ‘बाबा शांत झोपले आहेत’, असे मला वाटत होते.’
(लेखातील सर्व सूत्रांचा दिनांक : ५.१२.२०२३)