क्रियमाणकर्माचे महत्त्व

‘सूतो वा सूतपुत्रो वा यो वा को वा भवाम्यहम् ।
दैवायत्तं कुले जन्म मदायत्तं तु पौरुषम् ॥
– वेणीसंहार, अंक ३, सुभाषित ३७

अर्थ : ‘माझा जन्म अमक्या आई-वडिलांच्या पोटी झाला किंवा अमक्या कुळात मी जन्माला आलो, ही गोष्ट  परमेश्वराच्या आधीन आहे. त्याला माझा निरुपाय आहे; पण मी जन्मल्यापासून काय काय केले, ते पहा आणि त्याप्रमाणे मला मान द्या’, असे कर्णाप्रमाणे म्हणता येईल.’

चिंताज्वरो मनुष्याणां क्षुधां निद्रां बलं हरेत् ।
रूपमुत्साहबुद्धिं श्रीं जीवितं च न संशयः ॥ – स्कंदपुराण

अर्थ : चिंताज्वर मनुष्याची क्षुधा, निद्रा, शक्ती, सुंदरता, उत्साह, वृत्ती, बुद्धी, लक्ष्मी आणि आयुष्य या सर्वांचा नाश करतो, यात शंका नाही.


माणसांचे काही प्रकार

‘एते सत्पुरुषाः परार्थघटकाः स्वार्थान् परित्यज्य ये
सामान्यास्तु परार्थमुद्यमभृताः स्वार्थाविरोधेन ये ॥
तेऽमी मानवराक्षसाः परहितं स्वार्थाय निघ्नन्ति ये
ये निघ्नन्ति निरर्थकं परहितं ते के न जनीमहे ॥

– नीतीशतक, श्लोक ५३

अर्थ : जे स्वार्थ सोडून देऊन दुसर्‍यांचे हित साधतात, ते सत्पुरुष होत. स्वार्थाला विरोध न होेईल, अशा रितीने जे दुसर्‍यांच्या उपयोगी पडतात, ते सामान्य. जे स्वार्थासाठी इतरांच्या हिताचा घात करतात, ते मानवरूपी राक्षस होत; परंतु जे अकारण दुसर्‍याच्या हिताचा नाश करतात ते कोण ? हे आम्हास कळत नाही.’