सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपेने देवद आश्रमासाठी लाभलेली मायमाऊली पू. (सौ.) अश्विनी अतुल पवार (सनातनच्या ६९ व्या संत, वय ३४ वर्षे) !

कार्तिक कृष्ण एकादशी (८.१२.२०२३) या दिवशी सनातनच्या ६९ व्या (समष्टी) संत पू. (सौ.) अश्विनी अतुल पवार यांचा ३४ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त सौ. काव्या चेऊलकर यांनी पू. (सौ.) अश्विनीताईंना पत्र लिहिले आहे. त्या पत्रातील काही भावपूर्ण लिखाण येथे दिले आहे.

पू. (सौ.) अश्‍विनी पवार

पू. ताई,

माझ्या आयुष्यात प.पू. गुरुमाऊली तुमच्या रूपाने आली, तेव्हापासून माझ्या जीवनाचे सोने झाले.

सौ. काव्या चेऊलकर

१. पू. (सौ.) अश्विनी पवार यांच्यामुळे जीवनात संकटे किंवा अडचणी न रहाणे

माझ्या आतापर्यंतच्या आयुष्यात आलेल्या संकटांना मला केवळ आणि केवळ तुमच्याच कृपेने धैर्याने तोंड देता आले. तुमच्यामुळे माझ्या आयुष्यात आता संकटे किंवा अडचणी असे काहीच राहिले नाही. तुम्ही मला जन्माला घातले नसले आणि तुम्ही माझ्यापेक्षा वयानेही लहान असलात; तरी तुम्ही माझी आईच आहात !

२. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रमाणे साधकांचा आईच्या ममतेने सांभाळ करणार्‍या पू. (सौ.) अश्विनी पवार !

पू. ताई, मी कुठेतरी वाचले होते, ‘देव सर्वत्र जाऊ शकत नाही; म्हणून देवाने आई बनवली’; पण माझ्यासाठी ‘प.पू. गुरुमाऊली (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले) स्थूलरूपाने सर्वत्र जाऊ शकत नाही; म्हणून देवद आश्रमासाठी त्यांनी तुम्हाला पृथ्वीतलावर आणले’, असे मला वाटते.

– सौ. काव्या कुणाल चेऊलकर, भांडुप, मुंबई. (१.११.२०२३)

श्री. हृषिकेश गायकवाड

पू. (सौ.) अश्विनी अतुल पवार यांच्या चरणी श्री. ऋषिकेश गायकवाड यांनी अर्पण केलेले कृतज्ञतापुष्प  !

‘पू. ताई, तुम्ही आमच्यासाठी घेत असलेल्या कष्टासाठी कवितेच्या ८ – १० ओळीत तुमच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करणे अशक्य आहे. आपल्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत; पण तरीही कृतज्ञता व्यक्त करण्याचा प्रयत्न करत आहे.

आम्ही प्रत्येक जण गुरुदेवांच्या प्रीतीमुळे त्यांच्याकडे खेचले गेलो. साधनेत आलो. ती प्रीती तुमच्या माध्यमातून आम्हाला येथे अनुभवायला मिळते; म्हणून आम्ही साधनेचे प्रयत्न करू शकत आहोत. पू. ताई, आम्ही या स्वभावदोष आणि अहं यांच्या जंगलात दिशाहीन होतो; पण तुम्ही आम्हाला पुनःपुन्हा बाहेर पडण्यासाठी दिशा दाखवता. तुम्हाला अपेक्षित असे प्रयत्न करण्यात आम्ही पुष्कळ उणे पडतो, तरीही तुम्ही आम्हाला पुनःपुन्हा संधी देऊन तुमच्यातील प्रीती अनुभवायला देता.

गुरुदेव साधकांसाठी माता-पित्याप्रमाणे आहेत. त्याचा स्थुलातून अनुभव तुमच्या माध्यमातून आम्हाला घेता येतो. पू. ताई, साधनेतील किंवा वैयक्तिक जीवनातील कोणतीही अशी समस्या नाही की, जी तुम्हाला विचारू शकत नाही. प्रत्येक वेळी तुम्ही आम्हाला माता-पित्याप्रमाणे आधार देऊन सावरले आहे आणि प्रयत्नांच्या योग्य दिशेला नेले आहे. ‘साधनेच्या प्रयत्नांत खरा आनंद आहे’, हे अनुभवायला शिकवले. साधनेत आम्ही स्वावलंबी बनावे, यासाठी तुम्ही तत्त्वनिष्ठपणे मार्गदर्शन करून आमच्यावर कृपा करत आहात.

पू. ताई, साधनेच्या प्रवासात तुमच्यासारखा वाटाड्या आम्हाला मिळाल्याविषयी गुरुदेवांच्या चरणी कोटी कोटी वेळा कृतज्ञता व्यक्त केली, तरी अल्प आहे.

पू. ताई, गुरुदेवांना आणि तुम्हाला अपेक्षित असे साधनेचे प्रयत्न आमच्याकडून होऊ देत, अशी आपल्या चरणी प्रार्थना आहे. या शुभदिनी आपल्या चरणी केवळ कृतज्ञता !’

– श्री. ऋषिकेश गायकवाड (वय २४ वर्षे), सनातन आश्रम, देवद, पनवेल. (नोव्हेंबर २०२२)


सौ. प्रज्ञा जोशी

  || मनी दाटूनी येई केवळ कृतज्ञता ||

मनी दाटूनी येई केवळ कृतज्ञता ।
किती मधुर हास्य तुमचे ।
पाहूनी मन न भरे ।।

परत परत पहावे, पहातच रहावे ।
ऐसे ते दिव्य तेज झळके ।। १ ।।

बोल तुमचे ते प्रीतीचे ।
मार्ग दाखवती या जिवांना ।।
नयनी ते वात्सल्य भरलेले ।
आधार मिळे सर्व साधकांना ।। २ ।।

प्रत्येक वाक्य जणू ब्रह्मज्ञान ।
अंतर्मुख करी, दूर करी अज्ञान ।।
जसे मार्ग दावी श्रीकृष्ण अर्जुनास ।
तसा लाभे सत्संग तुमचा आम्हास ।। ३ ।।

माऊलीची केवळ अनुभवावी प्रीती ।
शब्द अपुरे पडती, सांगण्या तिची महती ।।
तव कृपेचा ओघ असो अखंडित, हीच असे मागणी ।
प्रयत्न करवून घ्यावे, हीच प्रार्थना तव चरणी ।। ४ ।।

वर्णू किती अन् कसे, न कळे या क्षुद्र जिवा ।
नसे ती पात्रता, नसे ती प्रगल्भता ।।
न राही मनी कुठली चिंता ।
ऐसी माऊली दिलीस तू अनंता ।। ५ ।।

मोकळ्या झाल्या सर्व वाटा ।
मनी दाटूनी येई केवळ कृतज्ञता.., केवळ कृतज्ञता.. ।। ६ ।।

– सौ. प्रज्ञा जोशी, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (नोव्हेंबर २०२२)


• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक